Friday, June 1, 2018


बारावी फेरपरीक्षेच्या; ऑनलाईन प्रवेशअर्ज वेळापत्रक जाहीर
       
            मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुन:परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेरपरीक्षा जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscborad.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर भरावयाची आहेत.
 बारावी फेरपरीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरणे आवश्यक आहे.

शुल्क प्रकार
विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख
नियमित शुल्क
सोमवार, दि.04/06/2018 ते बुधवार, दि.13/06/2018
गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि.18/06/2018
सोमवार, दि. 25/06/2018
विलंब शुल्क
गुरुवार, दि. 14/06/2018 ते सोमवार, दि. 18/06/2018
मंगळवार, दि. 19/06/2018 ते शुक्रवार, दि. 22/06/2018


सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
        श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2018 व फेब्रुवारी-मार्च 2019 अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.
       लातूर व कोकण विभाग वगळून इतर विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क बँक ऑफ इंडियात मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन बँक ऑफ इंडियाच्या चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर विभागीय मंडळाच्या कक्षेतील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी एच.डी.एफ.सी. बँक (HDFC Bank) आणि कोकण विभागीय मंडळाच्या कक्षेतील शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी ॲक्सिस बँक (AXIS Bank) या बँकेत मंडळाच्या जमा खात्यात शुल्क जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
       ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी-मार्च 2019 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल.
       नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे.
       उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर 2018 मध्ये घेतली जाणार नाही याची विद्यार्थी, पालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
       आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.
0000


महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर

         
नवी दिल्ली, १ : केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) अंतर्गत महाराष्ट्रातील १५ शहरांतील गरिबांसाठी १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत.
केंद्रीय गृह निर्माण व नगर विकास मंत्रालयाच्या केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीच्या ३४ व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील १५ शहरातील गरिबांसाठी  ६४३ कोटींची गुंतवणूक आणि  केंद्राच्या २०१ कोटींच्या सहाय्यासह १३ हजार ५०६ घरे मंजूर करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील या शहरांचा समावेश
राज्यातील पुणे जिल्हयातील पिंपरी वाघिरे, वाघोली आणि म्हाळुंगे तसेच शिरुर तालुक्यातील वाढु, हवेली तालुक्यातील वेळू व वडगाव .
अकोला जिल्हयातील अकोट, चंद्रपूर शहर, नांदेड जिल्हयातील नांदेड वाघाळा, नाशिक जिल्हयातील मालेगाव, सातारा शहर, नाशिक शहर, सोलापूर शहर, अहमदनगर जिल्हयातील राहता, कर्जत आणि पाथर्डी तसेच उस्मानाबाद शहर या शहरांमध्ये वर्ष २०१७-१८ साठी एकूण १३ हजार ५०६ घरे मंजूर झाली आहेत.  
 या बैठकीत ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक व २ हजार २०९ कोटींच्या अर्थ सहाय्यासह देशभरातील १० राज्यांच्या ३७०  शहरांसाठी १ लाख ५० हजार  घरे मंजूर करण्यात आली आहेत.
0000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नांदेड, दि. 1 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 4 जून 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
000000

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त दिली तंबाखू विरोधी शपथ
         
 नांदेड, दि. 1 :- जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर उपस्थित होते. जागतिक तंबाखू नकार दिन 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. 
          यावेळी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईकांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. डी. एल. मिर्झापुरे, डॉ. अर्चना तिवारी यांचे सहकार्य मिळाले.
00000


खरीप हंगाम 2018 :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभागासाठी 24 जुलैपूर्वी अर्ज करावेत
कृषि कार्यालयाचे आवाहन   
नांदेड, दि. 1 :- खरीप 2018 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 24 जुलै 2018 पूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले.  
या योजनेंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार असून ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. नांदेड जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ व कापूस या पीकांचा समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै 2018 अंतिम दिनांक आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
 पीक
विमा संरक्षीत रक्कम रुपये / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता ( रुपये )
भात
37,000/-
740/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
31,500/-
630/-
मुग
18,900/-
378/-
उडीद
18,900/-
378/-
सोयाबीन
42,000/-
840/-
तीळ
23,100/-
462/-
कापुस
42,000/-
2,100/-

या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असून खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित केला आहे. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...