Wednesday, August 11, 2021

 

गौण खनिज वाहतुकदारांनी वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यातील सर्व गौण खनिज वाहतुकदार व वाहनचालक, मालक यांनी वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी पुणे येथील नियुक्त केलेले ॲप बेल टेक्नोलॉजीस प्रा.ली.पुणे यांच्या 8080521071 या क्रमांकावर संपर्क करावा. वाहनावर तात्काळ जीपीएस यंत्रणा बसवून घ्यावी. जीपीएस यंत्रणा न बसविलेल्या वाहनावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची गौण खनिज वाहतुक करणारे सर्व वाहनचालक, मालक यांनी नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.   

 

जिल्ह्यातील गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस यंत्रणा बसविण्याचे आदेश जारी केले आहेत. मोठया प्रमाणात अवैध खनिजाची वाहतूक होते असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री बेरात्री अवैध वाहतूक होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तसेच शहरात ट्रक, टिप्पर, हायवा इ . वाहनांनी गौण खनिज वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.

0000

 

जिल्ह्यातील 74 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 74 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,शिवाजनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर  (विजयनगर), सिडको, पौर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, येथे एकूण 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर शहरी दवाखाना रेल्वे हॉस्पिटल  एकूण 1 केंद्रावर  कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री. गुरु गोविंदसिंग जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीगनर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 17 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचेही प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय देगलूर, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव ग्रामीण रुग्णालय कंधार या 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस  दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 14 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, तर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील केंद्रावर कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध केले आहेत. ग्रामीण भागात 27 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत.तर 14प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 10 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख 73 हजार 751 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 11 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 70 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 29 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 99 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे, तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 439 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 236 एवढी झाली असून यातील 87 हजार 529 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 49 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी नायगाव तालुक्यातील मांजरम येथील 80 वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तींला सुट्टी देण्यात आली.

 

आज 49 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, किनवट कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 38, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 129, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 81 हजार 216

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 78 हजार 850

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 236

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 529

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.00 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-20

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-49

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

0000

 

व्हेंटिलेटरची नांदेड जिल्ह्यातील ही भर ग्रामीण जनतेला आत्मविश्वास देईल

- उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यासाठी 8 व्हेंटिलेटर सुर्पुद   

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महानगरामध्ये ज्या आरोग्याच्या सेवा-सुविधा उपलब्ध आहेत तशा सेवा-सुविधा ग्रामीण भागातील जनतेलाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या लाटेचे आव्हान महाराष्ट्राने सर्वांच्या सहकार्यातून पेलून दाखविले असून संभाव्य तिसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी ग्रामीण भागातही व्हेंटिलेटरची सुविधा भक्कम व्हावी यादृष्टिने काही योगदान देता येईल का याचा विचार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोणातून समाजकारणाचा भक्कम वारसा या व्हेंटिलेटरर्सच्या उपलब्धतेतून आदित्य ठाकरे यांनी वृद्धिंगत केल्याच्या भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित 8 व्हेंटिलेटर प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. 

या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.   

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याने कोविड-19 चे व्यवस्थापन चांगल्यारितीने सांभाळून दाखविले. एसडीआरएफच्या निधीमधून ग्रामीण भागासाठी रुग्णवाहिकेची उपलब्धता, ऑक्सिजनचे परिपूर्ण व्यवस्थापन ही नांदेडच्या कोविड-19 व्यवस्थापनेची शक्तीस्थळ राहिले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सेवा-सुविधा भक्कम असाव्यात यासाठी महाराष्ट्राने अधिक दक्षता घेतली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्याच्यादृष्टिकोणातून अधिकाधिक समर्थ होऊन जनतेला आस्वस्थ करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. लोकांमधील जागरुकता, स्वयंशिस्तीचे दर्शन, मास्क पासून पाळावी लागणारी त्रीसुत्री याच्या जोडिला शासनाचे सर्व नियोजन एक करुन आपण संभाव्य तिसरी लाटही समर्थपणे परतवून लावू असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शासनाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक बांधिलकिच्यादृष्टिने राज्यातील कार्यकर्तेही पुढे सरसावतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक करुन आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वयंसिद्धतेसाठी व नागरिकांच्या मनात विश्वास जागा करण्यासाठी हा उपक्रम अधिक लाख मोलाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील कोविड-19 व्यवस्थापनाविषयी सादरीकरण करुन माहिती दिली.

00000





समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...