Wednesday, August 11, 2021

 

व्हेंटिलेटरची नांदेड जिल्ह्यातील ही भर ग्रामीण जनतेला आत्मविश्वास देईल

- उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत 

पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यासाठी 8 व्हेंटिलेटर सुर्पुद   

नांदेड (जिमाका) दि. 11 :- महानगरामध्ये ज्या आरोग्याच्या सेवा-सुविधा उपलब्ध आहेत तशा सेवा-सुविधा ग्रामीण भागातील जनतेलाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने शासनाने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा भक्कम करण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या लाटेचे आव्हान महाराष्ट्राने सर्वांच्या सहकार्यातून पेलून दाखविले असून संभाव्य तिसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी ग्रामीण भागातही व्हेंटिलेटरची सुविधा भक्कम व्हावी यादृष्टिने काही योगदान देता येईल का याचा विचार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोणातून समाजकारणाचा भक्कम वारसा या व्हेंटिलेटरर्सच्या उपलब्धतेतून आदित्य ठाकरे यांनी वृद्धिंगत केल्याच्या भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित 8 व्हेंटिलेटर प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. 

या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.   

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्याने कोविड-19 चे व्यवस्थापन चांगल्यारितीने सांभाळून दाखविले. एसडीआरएफच्या निधीमधून ग्रामीण भागासाठी रुग्णवाहिकेची उपलब्धता, ऑक्सिजनचे परिपूर्ण व्यवस्थापन ही नांदेडच्या कोविड-19 व्यवस्थापनेची शक्तीस्थळ राहिले आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सेवा-सुविधा भक्कम असाव्यात यासाठी महाराष्ट्राने अधिक दक्षता घेतली. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जे योगदान दिले आहे त्याला तोड नाही. तिसऱ्या लाटेबद्दल आरोग्याच्यादृष्टिकोणातून अधिकाधिक समर्थ होऊन जनतेला आस्वस्थ करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. लोकांमधील जागरुकता, स्वयंशिस्तीचे दर्शन, मास्क पासून पाळावी लागणारी त्रीसुत्री याच्या जोडिला शासनाचे सर्व नियोजन एक करुन आपण संभाव्य तिसरी लाटही समर्थपणे परतवून लावू असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शासनाच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक बांधिलकिच्यादृष्टिने राज्यातील कार्यकर्तेही पुढे सरसावतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक करुन आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वयंसिद्धतेसाठी व नागरिकांच्या मनात विश्वास जागा करण्यासाठी हा उपक्रम अधिक लाख मोलाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील कोविड-19 व्यवस्थापनाविषयी सादरीकरण करुन माहिती दिली.

00000





No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...