Wednesday, September 4, 2019


वृ.वि.2362
दि.4सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त :

वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी
उलाढाल मर्यादा आता ४० लाख रुपयांची
- सुधीर मुनगंटीवार
करदात्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची होणार बचत!
मुंबई, दि. 4 : वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत वस्तू पुरवठादार व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी उलाढाल मर्यादा यापूर्वी २० लाख रुपये इतकी होती ती आता १ एप्रिल २०१९ पासून वाढवून ४० लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. उलाढाल मर्यादा वाढविल्याने लहान व्यापाऱ्यांना कर अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च या दोन्ही गोष्टींमध्ये बचत झाली आहे, अशी माहिती वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सोपी नोंदणी प्रक्रिया
वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत नोंदणीची प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन आणि सोपी आहे. नोंदणी करताना करदात्यांना अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना नोंदणी, दुरुस्ती, अथवा नोंदणी रद्द करण्यासाठी कर विभागात प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर साधारणत: ३ दिवसात व्यापाऱ्यांना नोंदणी दिली जाते. उलाढाल मर्यादा न ओलांडलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत स्वत:ची नोंदणी करता येऊ शकते.
या सुटसुटीत व्यवस्थेमुळेच महाराष्ट्रात १५ लाखांपेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत स्वत:ची नोंदणी करून घेतली आहे. ही संख्या भारतातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त असल्याचेही वित्तमंत्री यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवा कर प्रणालीत जर वेगवेगळ्या राज्यातून व्यापार होत असेल तर राज्यासाठी एक नोंदणी घेणे आवश्यक आहे. व्यापारी व उद्योगांकडून एकाच राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगळ्या नोंदणीची मागणी झाल्याने आता त्यांना ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आल्याचे वित्तमंत्री म्हणाले.
नोंदणी केल्यामुळे करदाता अधिकृतपणे त्यांच्या ग्राहकाकडून कर गोळा करू शकतो व त्याच्या नोंदित ग्राहकांना या कराची वजावट उपलब्ध होऊ शकते. त्याचप्रमाणे करदाता खरेदीवर दिलेल्या  कराची वजावट घेऊन त्याच्या पुरवठ्यावरील कराचा भरणा करू शकतो.
००००


वृ.वि.2363
दि.4सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त :

आपसमेळ योजनेखाली पुरवठादारांसाठी
वार्षिक मर्यादा १.५ कोटी रुपये
- सुधीर मुनगंटीवार
वस्तू आणि सेवा कर प्रणालीत लहान-मध्यम आणि
लघु उद्योगांसाठी अनेक सकारात्मक निर्णय
मुंबई, दि. 4 : शासनाने आपसमेळ योजनेखाली पुरवठादारांसाठी वार्षिक मर्यादा १ कोटी रुपयांहून १.५ कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. आपसमेळ योजनेचा लाभ फक्त वस्तुंच्या पुरवठा करणाऱ्यांना मिळतहोता (उपहारगृह सेवा वगळता) परंतु वस्तूंच्या पुरवठ्याबरोबर जे पुरवठादार काहीप्रमाणात सेवांचाही पुरवठा करत होते त्यांना नवीन सुधारणेनुसार आर्थिक उलाढालीच्या १० टक्के किंवा ५ लाखांपर्यंतच्या सेवा पुरवठ्यासाठीही आपसमेळ योजनेचा लाभ देण्यात आला आहे.  या योजनेत करदात्यांना करभरणा त्रैमासिक करावयाचा असून वार्षिक एकच विवरणपत्र दाखल करण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सध्या उपलब्ध असलेल्या आपसमेळ योजनेसाठी पात्र नाहीत आणि ज्यांची वार्षिक उलाढाल  ५० लाखांपेक्षा कमी आहे अशा सेवा पुरवठादारांना ६ टक्के जीएसटी दराने (तीन टक्के सीजीएसटी आणि ३ टक्के एसजीएसटी) कर भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.वस्तू आणि सेवा कर प्रणालीअंतर्गत वस्तुंचा पुरवठा करणाऱ्या ज्या व्यापाऱ्यांची वर्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यापाऱ्यांना नोंदणी दाखला घेण्यापासून आणि कर  भरण्यापासून सुट देण्यात आली आहे.  राज्यातील कित्येक लहान करदात्यांना फार मोठा लाभ झाला आहे.
५ कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना मासिक विवरणपत्राऐवजी तिमाही विवरणपत्र दाखल करण्याची पर्याय देण्यात आला आहे.  या तरतूदीमुळे विवरणपत्र दाखल करण्याची नवीन व सुलभ प्रणाली लवकरच अस्तित्वात येणार आहे.
एकाच राज्यात एक नोंदणी दाखला घेण्याऐवजी व्यवसायाच्या वेगवेगळ्या ठिकाणांकरिता नोंदणी दाखले घेण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे. ज्या करदात्यांनी ऐच्छिक नोंदणी दाखला घेतला आहे त्यांना नोंदणी दाखला घेण्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत तो रद्द करण्याची तरतूद यात आहे.
जीएसटीआर-३बी, जीएसटीआर-१ यामध्ये उशीरा विविरणपत्र दाखल केल्यास लागणाऱ्या विलंबशुल्काची रक्कम रु. २० ते ५० पर्यंत कमी करण्यात आली आहे. विलंब शुल्काची रक्कम जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत कमी करण्याची तरतूद यात आहे.
वस्तू आणि सेवा कर कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या वर्षात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विवरणपत्र भरण्यास विलंब लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीच्या विलंब शुल्कामध्ये पूर्णत: सूट देऊन व्यावसायिकांवरचा भार कमी केला आहे.
१.५ कोटी वार्षिक उलाढाल असणाऱ्या लहान करदात्यांसाठी जीएसटीएनकडून विनामूल्य लेखा व बीजक सॉफ्टवेअर प्रदान करण्यासाठी विभागाने अशी सेवा देणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. २०१७-१८ या वर्षाकरिता इनपुट टॅक्स क्रेडीट घेण्याची मर्यादाही शासनाने ३० एप्रिल २०१९ पर्यंत वाढवली होती. अनोंदित करदात्याकडून वस्तू  आणि सेवांचा पुरवठा घेतला तर करदात्यास प्रत्यावर्ती कर भरावा लागत  होता, शासनाने हा कर आता पूर्ण रद्द केला असल्याचेही स्पष्ट केले. 
वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना शासनाने  सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणींचे निराकरण केले असून या उद्योगांच्या विकासासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले असल्याचेही ते म्हणाले.
००००


वृ.वि.2364
दि.4सप्टेंबर, 2019
विशेष वृत्त
नीलक्रांती योजनेतून सव्वातीन लाख मच्छीमारांना विमा
मुंबई, दि. 4: मत्स्यव्यवसायाचा एकात्मिक विकास, मत्स्योत्पादनात वाढ तसेच मच्छिमारांचे कल्याण या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या नीलक्रांती योजनेद्वारे सुमारे 3 लाख 24 हजार मच्छिमारांना विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. मागील तीन वर्षात नीलक्रांती योजनेमध्ये 53 कोटी 21 लाख रुपयांचा प्रत्यक्ष खर्च करण्यात आला आहे.
          नीलक्रांतीं योजनेमुळे मत्स्यव्यवसायाला चालना मिळाली असून या योजनेअंतर्गत 4 हजार 613 लाभार्थींना लाभ देण्यात आला. पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी 218 लाभार्थींना 2 हजार 605 पिंजरे वाटप करण्यात आले. 2 हजार 664 मच्छिमारांना सुरक्षिततेची साधणे (डिस्ट्रेस अलर्ट ट्रान्समीटर- डीएटी) पुरविण्यात आली. 1 हजार 769 लाभार्थींना बचत-नि-मदत योजनेचा लाभ देण्यात आला.
          तीन वर्षात 1200 लाभार्थींना मत्स्यव्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. नीलक्रांती योजनेंतर्गत नौका व जाळीवाटप, भारतीय प्रमुख  कार्प मत्स्यबीज उत्पादन केंद्र, बर्फ कारखाना, मत्स्यखाद्य कारखाना, नवीन मत्स्यतळी बांधकाम, ऑटो रिक्षासह शितपेटी, मोटर सायकलसह शितपेटी, घरकुल बांधकाम आदी योजनांनाही अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे.
००००
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि. 4.9.2019


राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री
डॉ. रणजित पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 4 :- राज्याचे गृह (शहरे), विधी व न्याय, संसदीय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 
गुरुवार 5 सप्टेंबर 2019 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दिवसभर नांदेड येथील विविध स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायं 6 वा. नांदेड येथून देवगिरी एक्सप्रेसेने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000
वृत्त क्र. 636
शेतकऱ्यांसाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 4 :- जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कापुस पिकात गुलाबी बोंडअळीसाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत आणि 5 टक्के निंबोळी अर्क किंवा प्रोफेनोफॉस 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकांवर उंटअळ्या, तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळी व चक्रीभुंग्यासाठी स्पायनोटोरम 11.7 एससी 9 मिली किंवा क्लोरेंनट्रानिलीप्रील 18.5 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
थुगाव येथील सोयाबीन पिकाची पाहणी
नांदेड  उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयांतर्गत तालका कृषि कार्यालय नांदेड येथे आज             नांदेड तालुक्यातील थुगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषि सहाय्यकाच्या प्राप्त  पत्रानुसार तालका कृषि अधिकारी विनायक सरदेशपांडे , कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ  एम जी कल्याणकर, मंडळ कृषि अधिकारी पि. एस पाटील, कृषि सहाय्य श्रीमती व्ही.आर. मोरताडे यांनी संयुक्त सोयाबीन पिकाची पाहणी केली.
या पाहणीमध्ये पुढील प्रमाणे पिक परिस्थिती आढळून आली. मौ. थूगाव, सुगाव, बोरगाव, पिंपळगाव को, नाळेश्वर येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेटी दिल्या, सोयाबीन पिक शेंगा भरण्याच्या  अवस्थेमध्ये आहे. पिकावर मोठया प्रमाणत तंबाखुवरील पाने खाणारी अळी (Spodopetra litura) या किडीचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्याचे आढळून आले. उंटअळी शेंगा पोखरणारी अळी या अळीचा सुध्दा  प्रादूर्भाव झाल्याचे आढळून आले. ज्यामुळे सोयाबीन पिकाचे पाने पूर्णपणे अळीने खाल्ल्याने पानाची चाळणी झाल्याचे आढळून आले. तसेच शेंगात अळीने कुरतडून छिद्र पाडल्याचे प्रमाण ही मोठया प्रमाणात दिसून आले. काही शेतातील पिकाची मोठया प्रमाणात आर्थिक वाढ झाल्यामुळे किडिमुळे शेंगाचे प्रमाण अत्यल्प आढळून आले. किडीची तीव्रता खूप मोठया प्रमाणात असल्याचे दिसून आले. जमिनीवर,बांधावर, रस्त्यावर इतर पिकावर आळंयाचा मोठया प्रमाणात संचार असल्याचे आढळून आला.
      सोयाबीन पिकावर पडणाऱ्या विविध महत्वाच्या किडीपैकी लष्करी अळी किवा तंबाखुवर पाने खाणारी अळी ही एक प्रमुख किड आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत या किडीचा प्रादूर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. या किडीची अळी आवश्यता साधारण 11 ते 20 दिवसापर्यत पूर्ण होते. या दरम्यान अळी 5 आवस्थेतून जाते यामधील पहिल्या 2 अवस्था पिकाच्या पानाचा हरितद्रव्याचा भाग खरडून खातात पुढ अवस्था पानाच्या शिरामधील भाग मोठया प्रमाणात खातात पानाची चाळणी करतात यासोबतच अळी ,फुले, पाते शेंगावरही नुकसान करुन आपली उपजिवीका करते.
        शेतकरी बंधुनी त्वरित पुढील उपाय योजना करुन होणारे नुकसान टाळावे. कामगंध सापळयाचा प्रति एकर पाच प्रमाणे वापर करावा. प्रोफेनोफॅास 50 टक्के प्रवाही 20 मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  शेतकरी बंधुनी तात्काळ उपाय योजना करावे असे आवाहन आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी  केले आहे. 
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...