Wednesday, December 26, 2018


महा-रेशीम अभियानाचे उद्घाटन संपन्न
तुती लागवडीसाठी नोंदणी करावी  
नांदेड दि. 26 :- महा-रेशीम अभियान 2019 हे 15 ते 29 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत असून सन 2019-20 तुती लागवड नाव नोंदणीचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आला.
सन 2019-20 साठी नवीन तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवार 29 डिसेंबर पूर्वी ऑनलाईन नोंदणी करुन जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी शुल्क जमा करावी. या अभियानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे संपर्क साधावा.

00000


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन
31 डिसेंबर पर्यंत नवोपक्रम सादर करावीत   
नांदेड दि. 26 :- नवोपक्रमशील शिक्षक, अध्यापकाचार्य, पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी आपले नवोपक्रम www.maa.ac.in/innovation2018-19 या लिंकवर सोमवार 31 डिसेंबर 2018 पर्यंत नवोपक्रम ऑनलाइन सादर करावीत, असे आवाहन प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नांदेड यांनी केले आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षण क्षेत्रात तसेच प्रत्येक मुल प्रगत व्हावे यासाठी शिक्षक नवनवीन प्रयोग करीत आहेत. विद्यार्थी व शाळांच्या विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण प्रयोग नवोपक्रशील शिक्षक करीत आहेत. शिक्षकांच्या या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांचे नावोपक्रम राज्यातील इतर शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यस्तरावर नवोपक्रम स्पर्धा 2018-19 चे आयोजन करण्यात येत आहे.
यावर्षी पूर्व प्राथमिक स्तर ते उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांबरोबरच पर्यवेक्षकीय अधिकारी तसेच विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती यांच्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2018-19 ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था श्रीनगर नांदेड येथे विभाग प्रमुखाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुकीसाठी
दुसरे प्रशिक्षण, मतदान प्रक्रिया, मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटप
नांदेड दि. 26 :-  नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुकीसाठी 25 डिसेंबर रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब भवन नांदेड येथे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. तसेच 71 मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप व मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
या प्रशिक्षणात नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व चंद्रपुर जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी हे उपस्थित होते.
मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी करण्याबाबतचे प्रशिक्षण उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी दिले. तसेच मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रियेचे साहित्य वाटपाबाबत महत्वाच्या सुचना दिल्या.
000000


नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ
निवडणुकीसाठी मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी मतदारांना सुचना
नांदेड दि. 26 :-  नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ निवडणुकीसाठी शुक्रवार 28 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. मतदारांना मतपत्रिकेद्वारे मतदान करतांना आवश्यक असणाऱ्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत.
या निवडणुकीचे मतदान शुक्रवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. मतदारांना मतपत्रिकेद्वारे मतदान करता येणार असून यासाठी आवश्यक सुचना पुढील प्रमाणे राहतील. बाणफुलीचा शिक्का वापरुन उमेदवाराच्या नाव व चिन्हासमोरील रकान्यात मतदार मत नोंदवू शकतील. एका मतदारास जास्तीत जास्त तीन मते देता येतील. एक निशाणी म्हणजे एक मत असेल. उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकापेक्षा अधिक निशाणी नोंदवू नयेत. एकूण तीन पेक्षा अधिक मते नोंदवू नयेत. या सुचनांची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असेही आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळ
निवडणुकीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी
नांदेड दि. 26 :- नांदेड शिख गुरुव्दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्यनिवडणूक 2018 साठी शुक्रवार 28 डिसेंबर 2018 रोजी नांदेड जिल्ह्यातील 28 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये नांदेड जिल्ह्यातील 28 मतदान केंद्रांवर अधिकृत व्यक्तीं व्यतिरीक्त इतर कोणासही निवडणूक केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शिखधर्मीय मतदारांना मतदानाच्या दिवशी सर्व ठिकाणी फक्त किरपाण बाळगण्याची परवानगी असेल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने केले आहे.
000000



दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 26 :- नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अपचलनगर साहिब मंडळाचे तीन सदस्य निवडणुकीसाठी शुक्रवार 28 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार 29 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने मतदान व मतमोजणी हद्दीत दारु विक्री बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना काढला आहे.
नांदेड शहर महानगरपालिका व नांदेड शहराच्या परिसरातील वाजेगागव व धनेगाव ग्रामपंचायत हद्दीत मतदान दिवस 28 डिसेंबर रोजी सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत तर मतमोजणीच्या दिवशी 29 डिसेंबर रोजी मतमोजणी संपेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
निवडणुकीची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनूचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी मतदान होत असलेल्या ठिकाणची सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

राज्‍यात आणि  जिल्‍हयात येणा-या दिवसात तापमान घसरुन
थंडीच्‍या लाटेची शक्‍यता निर्माण होवु शकते.

      नांदेड, दि. 26 :-  भारतीय हवामान खाते, यांनी येणा-या दिवसात थंडीमध्‍ये वाढ होऊन तापमान खाली येण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे. थंडीच्‍या लाटेवर करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपायोजना राष्ट्रीय आपत्‍ती व्यवस्‍थापन प्राधिकरण यांच्‍याकडुन सूचविण्‍यात आलेल्‍या आहेत. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण नागरीकांना आवाहन  करते की थंडीच्‍या कालावधीत गरम कपडे वापरावे आणि काम न असता थंडीत बाहेर जाण्‍याचे टाळावे. आपल्‍या परिसरात एकटे राहणारे व्‍यक्‍ती अथवा वृध्‍द नागरीक यांची काळजी घ्‍यावी. रॉकेलचे स्‍टोव अथवा कोळश्‍याची शेगडी तापमान वाढविण्‍यासाठीवापराल्‍यास त्‍याचा धुर घरात कोंडु नये व योग्‍यरित्‍या बाहेर निघेल याची काळजी घ्‍यावी. योग्‍य आहार घ्‍यावा आणि थंडीचा त्रास जास्‍त वाटल्‍यास वैदयकिय उपचार वेळेवर घ्‍यावे. नागरीकांना विनंती आहे  की त्‍यांनी त्‍यांच्‍या घरातील निकामी किंवा जुने कपडे, गरम कपडे आणि पांघरुन फुटपाथ,बसस्‍टॅंड, मंदीर परिसर, इत्‍यादी ठिकाणी राहणा-या गरजु बेवारस लोकांना उपलब्‍ध करुन दयावे.
00000



माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक


नांदेड, दि. 26 :-  आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट या नवीन मशीनचा वापर मतदानासाठी करण्यात येणार आहे. या नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राबाबत नांदेड जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे उपस्थितीत माध्यम प्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बचत भवन येथे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनद्वारे कसे मतदान केले जाते याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.
या मशीनच्या वापरामुळे मतदारांनी ज्या उमेदवाराला मत दिले त्याचा अनुक्रमांक, त्यांचे नाव व चिन्ह ही माहिती सात सेंकदापर्यंत मतदाराला दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले आहे याची खात्री करुन घेता  येणार आहे. यामुळे कोणत्याही शंकेला वाव राहणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी पत्रकारांना यंत्राबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी माध्यम प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान करुन माहिती घेतली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दिपाली मोतियळे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, नायब तहसिलदार अश्विनी जगताप, तहसील कार्यालयाचे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती मोहिमेचे पथक तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी, संपादक, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.
000000


पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड, दि. 26 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शुक्रवार 28 डिसेंबर रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय, फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात रायटर सेफग्राऊंड प्रा. लि. मुंबई, धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, नवभारत फलर्टिलायझर प्रा. लि. औरंगाबाद, सिपेट एमआयडीसी औरंगाबाद या कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
एटीएम ऑपरेटर, सिटी बायकर, ऑफीसर रिपेरटर्स ऑफीस कॉल सेंटर, ड्रायव्हर, ट्रेनी ऑपरेटर, फिल्ड ऑफीसर, ट्रेनी या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी कार्ड व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे, असे आवाहन सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...