Sunday, August 7, 2022

 किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे

भूमि अभिलेख विभागाकडून घरोघरी तिरंगाचा जागर

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- भूमिअभिलेख विभाग नांदेड व उपअधिक्षक भूमिअभिलेख किनवट यांनी आदिवासी किनवट तालुक्यातील मौजे भिमपूर येथे घरोघरी तिरंगा अभियानाबाबत गावकऱ्यांशी सुसंवाद साधून जनजागृती केली. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. पी. सेठिया यांनी पुढाकार घेऊन भूमी अभिलेख कार्यालयाकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही अनोखी कृतज्ञता व्यक्त केली. भिमपूर गावातील महिलांना त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात तिरंगाची भेट दिली.

000000  

 फिरत्या वाहनाद्वारे रोघरी तिरंगा

अभियानाच्या प्रचारास शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- घरोघरी तिरंगा मोहिमेच्या प्रसारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने फिरत्या वाहनाद्वारे नांदेड महानगरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली असून या वाहनाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वाहनाद्वारे दृकश्राव्य माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत घरोघरी तिरंगाबाबत अचूक संदेश पोहचण्यास मदत होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, विकास माने, तहसीलदार किरण अंबेकर,नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी, काशीनाथ डांगे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी व काही प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

0000



 नांदेड जिल्ह्यात 34 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 273 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, माहूर 15, लोहा 2,किनवट 5,धर्माबाद 2, उमरखेड 1  तर ॲटीजन तपासणीद्वारे हदगाव 1 असे एकूण 34 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 309 एवढी झाली असून यातील 1 लाख 515 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 102 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 5  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 20 असे एकूण 25  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 75, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 23, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 102 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 14 हजार 406
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 93 हजार 700
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 309
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 515
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.29 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 04
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-102
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम    

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता मुंबई येथून विमानाने श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने गुरूद्वाराकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 11.50 वाजेपर्यंत हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे राखीव. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत गोदावरी अर्बन बँकेस भेट. (संदर्भ खासदार हेमंत पाटील). दुपारी 12.40 ते 1.15 वाजेपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी. दुपारी 1.15 ते 1.45 वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथील मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 2.30 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. हिंगोली येथून नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

 दहावी व बारावी 2023 परीक्षेसाठी खाजगीरित्या

प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज करावीत 

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक इयत्ता बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

त्यानुसार फेबुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी पुढे नमूद केलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.

 

इयत्ता दहावी व बारावी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा शुक्रवार 29 जुलै ते बुधवार 24 ऑगस्ट 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. सोमवार 1 ऑगस्ट  ते शुक्रवार 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑलनाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मुळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीची एक छायाप्रत, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे याप्रमाणे तपशील आहे. 

 

खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी ते इयत्ता बारावीसाठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. संकेतस्थळ इयत्ता दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in , इयत्ता बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in हे आहे.

 

विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत) नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्यांला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. खाजगी विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. इयत्ता दहावीसाठी 1 हजार रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क, इयत्ता बारावीसाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क + शंभर रुपये प्रक्रिया शुल्क राहिल.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्यांच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यम निहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल. त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यामापन करावयाचे आहे. 

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता व त्यांने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल. त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक / तोंडी श्रेणी परीक्षा द्यावयाच्या आहेत. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. 

 

इयत्ता दहावी व बारावी- 2023 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने जसे डेबिट कार्ड, क्रिडिट कार्ड, युपीआय, नेट बँकिंगद्वारे भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. ही पोचपावती स्वत:जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात. तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्यांला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची ( उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन:श्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या / प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय, संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी. ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 020-25705207/25705208/25705271 वर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...