Friday, November 25, 2016

कामगारांचे पगार बँकामार्फत देण्यासाठी
खाते उघडण्यासाठी विशेष सुविधा
नांदेड शहरात दोन ठिकाणी, धनेगावातही आज विशेष व्यवस्था
नांदेड, दि. 25 :- संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे पगारही बँकाच्या माध्यमातून व्हावेत, यासाठी कामगार वर्गातील ज्या लोकांकडे बॅंकखाते नाही अशांना खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानुसार ज्या कामगारांचे  बँक खाते नाही, अशांचे खाते उघडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत उद्या शनिवार 26 नोव्हेंबर 2016 रोजी विशेष बाब म्हणून शहरात दोन ठिकाणी तर धनेगाव येथे एक अशा तीन ठिकाणी बँकामध्ये खाते उघडण्यासाठी व्यवस्था केल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. या सुविधांचा कामगार वर्गाने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालय व राज्याच्या मुख्य सचिवांकडून जिल्हा प्रशासनाला निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, सहायक कामगार आयुक्त व अन्य अधिकाऱ्यासोबत बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. त्यानुसार शनिवार 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष बाब म्हणून सुट्टीच्या दिवशीही या तीन ठिकाणी बँक अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहून खाते उघडणार आहेत. नांदेड शहरात कलामंदीर परिसरातील अॅक्सीस बँक, महावीर चौक परिसरातील पंजाब ॲण्ड सिंध बँक तर धनेगांव येथील स्टेट बँक आँफ हैद्राबाद याठिकाणी खाते  उघडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी खाते उघडण्यासाठी संबंधितांनी आपले कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र व दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे, रहिवासाचा पुरावा, तसेच आधारकार्ड आणावे लागेल. कष्टकरी जनतेने या सुविधेचा लाभ घेऊन आपले बॅंक खाते सुरु करावे. हे खाते शुन्य बॅलन्स तत्त्वावरही उघडता येणार आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.
शनिवार नंतर पुढे सोमवार 28 नोव्हेंबरपासून बँकिंग वेळेत नेहमीप्रमाणे कामगार वर्गाची खाते उघडण्यासाठी सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या कामगार वर्गानेही वेळेत खाती उघडावीत, जेणेकरून बँकेद्वारेच त्यांचे पुढील काळातील पगार देता येतील. त्यासाठी जवळच्या राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकामध्ये लवकरात लवकर खाते उघडण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000
नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात
1 हजार 182 , नगराध्यक्ष पदासाठी 127 नामनिर्देशनपत्र
नांदेड, दि. 25 :-  राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच नगरपरिषद अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात 9 नगरपरिषद व त्यांचे अध्यक्ष आणि दोन नगरपंचायती यांच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा आजचा अंतिम दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 291 तर नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 1 हजार 182 नामनिर्देशनपत्र दाखल झाली. नगराध्यक्ष पदासाठी  127 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन विभागाच्यावतीने देण्यात आली.
नगरपंचायत निवडणुकीत दाखल नामनिर्देशनपत्र नगरपंचायत निहाय पुढील प्रमाणे. नगरपंचायत माहूर- 139,  अर्धापूर- 152. नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी दाखल अर्जांची संख्या नगरपरिषद निहाय पुढील प्रमाणे.  मुदखेड- 25, बिलोली- 10, कुंडलवाडी- 09, धर्माबाद- 14, उमरी-8, हदगाव- 21, मुखेड- 15, कंधार- 11, देगलूर- 14.       
नगरपरिषद निवडणुकीसाठी त्या-त्या नगरपरिषदेतील जागांसाठी  दाखल नामनिर्देशनपत्रांची संख्या पुढील प्रमाणे.   मुदखेड- 159,बिलोली- 91,कुंडलवाडी- 113, धर्माबाद-154, उमरी-89 , हदगाव- 172,मुखेड-138,कंधार- 112, देगलूर- 154.
या नामनिर्देशनपत्राची सोमवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी सुरु होईल. त्यानंतर वैध नामनिर्देशनपत्राची यादी जाहीर करण्यात येईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार 7 डिसेंबर 2016 आहे.

0000000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा रविवार 27 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून सोमवार 26 डिसेंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

000000
दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी सुधारीत तारखा जाहीर
            नांदेड दि. 25 :-   राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेमार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेस नियमित प्रविष्ठ होणारे विद्यार्थी पूनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करण्यासाठी सुधारीत तारखा पुढील प्रमाणे आहेत. नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची मुदत सोमवार 28 नोव्हेंबर 2016 तर विलंब शुल्कासह मंगळवार 29 नोव्हेंबर 2016 ते सोमवार 5 डिसेंबर 2016 या कालावधीत.
            मंगळवार 29 नोव्हेंबर 2016 ते बुधवार 7 डिसेंबर 2016 या कालावधीत शाळांनी परीक्षा शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये प्रिंटींग करावी. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. शासन निर्णयानुसार ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करण्यात यावी. इयत्ता 10 वीचे अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. नोंदणी देखील केलेली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल, असे विद्यार्थ्यांने प्राचार्य, मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही. तसेच माध्यमिक शाळांची बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे आवाहन राज्य मंडळाच्यावतीने लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

000000
दहावी, बारावी परीक्षांचे शुल्क भरण्यास
मूदतवाढ देणार, ऑनलाईन अर्ज मुदतीत भरावेत
            नांदेड दि. 24 :-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे  यांचेमार्फत फेब्रुवारी-मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज 29 ऑक्टोंबर 2016 पर्यंत स्विकारण्यात आलेले आहेत. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज विलंब शुल्कासह 28 नोव्हेंबर 2016 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.
            नुकत्याच 500 व 1 हजार रुपयांच्या चलनी नोटा बंद झाल्याने फेब्रुवारी-मार्च 2017 साठी इयत्ता 12 वी व 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरताना अनेक अडचणी येत असल्याचे काही शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटना यांनी मंडळाच्या व शासनाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तातडीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शुल्क जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व विद्यार्थी व संबंधीत पालक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी प्रथम दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी रक्कम उपलब्ध नसली तरी प्रथम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरुन ती मंडळाकडे सादर करावा. अशा विद्यार्थ्यांचे शुल्क प्रत्यक्ष मंडळाकडे जमा करण्यासाठी मंडळामार्फत मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा कालावधी स्वंत्रपणे म्हणजेच अर्ज भरण्यासाठी निर्धारीत केलेला कालावधी संपल्यानंतर कळविण्यात येईल.
            उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता  12 वीसाठी बहुतांश अर्ज व निर्धारित परीक्षा शुल्क शाळांकडे, मंडळाकडे यापुर्वीच जमा केलेले आहे. त्यासाठी वेगळी मुदतवाढ देण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप चलनी नोटाअभावी परीक्षा शुल्क व अर्ज भरलेली नाहीत अशा विद्यार्थ्यांची अर्ज संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी तातडीने भरु ती विभागीय मंडळाकडे सादर करावीत व नंतर परीक्षा शुल्क जमा करुन घ्यावे. अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क उशीराने जमा करण्यासाठीचा कालावधी मंडळामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
            याप्रमाणे सर्व संबंधित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करुन सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज वेळेत भरली जातील याबाबत दक्षता घ्यावी. कोणताही विद्यार्थी परीक्षा शुल्काअभावी ऑनलाईन अर्ज भरण्यापासून म्हणजेच पर्यायाने परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाच्यावतीने लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

00000000
समाज कल्याण कार्यालयात
संविधान दिन साजरा
नांदेड, दि. 25 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये भारतीय संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करुन आज संविधान दिन साजरा करण्यात आला.   या कार्यक्रमास समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, विशेष अधिकारी, (शानिशा) एम.बी.शेख तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत  महामंडळातील, बार्टीचे सर्व समन्वयक, तालुका समन्वयक कार्यालयातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.
           या कार्यक्रमानंतर भारतीय संविधान याविषयावर 50 गुणाची वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी जिल्हयातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले. स्पर्धेस मोठया प्रमाणात जिल्हयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शिक्षक उपस्थित होते.

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...