Saturday, September 2, 2023

 वृत्त 

फ्रेंच राज्यक्रांती एवढाच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा महत्त्वाचा

- ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव 

इतिहासाच्या आपल्या गावातील पाऊलखुणा नव्या पिढी पर्यंत पोहचण्यासाठी हा जागर

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

▪️महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- फ्रेंच राज्यक्रांती व हैदराबाद मुक्तिसंग्राम यात खूप सामन्य आहे. शेवटची राजसत्ता फ्रेंच राज्यक्रांतीने उलथवून टाकली. इकडे भारताला स्वातंत्र्य मिळूनही निजामाची राजसत्ता तशीच होती. ती राजसत्ता हैदराबाद अर्थात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याने भारतातील शेवटची राजसत्ता उलथवून टाकत लोकशाहीच्या मूल्यांना प्रवाहित केले. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये राजसत्ता नष्ट करायची होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जुलमी राजा नष्ट करायचा होता, असे नि:संदिग्ध प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उमरी येथे कै. गिरीशभाऊ गोरठेकर सांस्कृतिक सभागृहात स्मरण इतिहासाचे या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून आयोजित या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, तहसिलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, गटविकास अधिकारी मारोती जाधव, मुख्याधिकारी प्रियंका टोंगे व गावातील ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्तीच्या लढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या, हुतात्मांच्या बलिदानाने, संघर्षाने आपण स्वतंत्र झालो. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले परंतु मराठवाडा निझामाच्या जोखडातून मुक्त झाला नाही. यासाठी मराठवाड्यातील विशेषत: 16 जिल्ह्यातील सामान्य माणसाला खूप मोठा शांतीच्या मार्गाने तर काही ठिकाणी सशस्त्र लढा द्यावा लागला. या लढयात 18 पगड जातीच्या लोकांचा सहभाग होता. स्त्रियांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होते, असे डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. 

अनेक महिलांनी पहिल्यांदाच प्रत्यक्ष हातात शस्त्र घेतले. अनेकजणी तुरुंगात गेल्या. हैदराबाद मुक्तीसंग्राम लढा अधिक तीव्र करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक अडचण भासत होती. त्यातूनच उमरी बँक ॲक्शन घटनेचा प्लॅन उमरखेड कॅम्प मध्ये तयार झाला. सर्व गावाच्या समोर भरदिवसा स्वातंत्र्य सैनिकांनी उमरी स्टेट बँकेवर हल्ला करुन बँक लुटली. या लुटीचे वैशिष्ट असे की यात एका पैशाचा देखील गैरवापर झाला नाही. या रकमेचे ऑडिट झाले. उमरी बँक ॲक्शन हे स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रामाणिकपणाचे प्रतिक असून मराठवाडा मुक्तीच्या लढ्यातील ही घटना मुकूटमणी म्हणावी लागेल. उमरी यादृष्टीनेच अधिक महत्त्वाचे आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात उमरीच्या भुमीचे योगदान मोठे असल्याचे डॉ. देव यांनी सांगितले. 

1942 ला उमरी परिसरात लोकजागरणाचे काम सुरु झाले. सामान्य माणूस जागरुक होवून स्वातंत्र्य लढयात सहभागी झाला. हैदराबाद राज्याच्या प्रशासनात अडचणी निर्माण करुन हैदराबादच्या राजाला भारतात विलीन होण्यासाठी भाग पाडणे हा स्वातंत्र्य सैनिकांचा उद्देश होता. यात दळणवळणाची साधने नष्ट करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, स्त्रियांनी पोटाला बांधून शस्त्रास्त्रे पुरविणे, पोलीस स्टेशनवर हल्ला करणे, रेल्वे स्टेशन ताब्यात घेणे अशा अनेक घटनांना सामोरे जाताना अनेकांनी प्राणांतिक संघर्ष केला. शेवटी पोलीस कारवाई करुन मराठवाडा निझामाच्या तावडीतून मुक्त झाला, असे डॉ. प्रभाकर देव यांनी स्पष्ट करून लढ्यातील अनेक घटनाक्रमांना उजाळा दिला. 

इतिहासाच्या आपल्या गावातील पाऊल खुणा

नव्या पिढी पर्यंत पोहचण्यासाठी हा जागर

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यातून स्वातंत्र्याचे मोल नव्या पिढीपर्यंत पोहचेल. आपल्या शहरात घडलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना अशा कार्यक्रमातून अत्यंत प्रभावीपणे प्रवाहित होतात. इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकापातळीवर आम्ही कार्यक्रम आयोजित करत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उमरी, कै. गिरीशभाऊ गोरठेकर इंग्लिश स्कुल, मॉर्डन इंग्लिश स्कूल, उमरी या शाळेच्या विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीताचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या कार्यक्रमात उमरी बँक ॲक्शनचा देखाव्याचे हुबेहुब सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणात उमरी बँक लुटीची रोमहर्षक घटना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभी राहीली. या देशभक्तीवरील सादरीकरणाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी तर आभार गटशिक्षण अधिकारी उमरी यांनी मानले.

00000

छायाचित्र : सदा वडजे, नांदेड








  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...