Saturday, November 9, 2019


स्वच्छ भारत मिशनअंतर्गत
विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश 
नांदेड, दि. 9 :- येत्या 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन ते 19 नोव्हेंबर (जागतीक शौचालय दिन) या कालावधीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी निर्गमित केल्या आहेत. दिलेल्या सुचनेनुसार संबंधित विभागाने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहेत.
मा. पंतप्रधान यांनी 2 ऑक्टोंबर 2014 रोजी राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशन घोषित केले आहे. यात सार्वजनिक आस्थापनांच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता, घर व गावातील परिसर स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची बांधणी, अंगणवाडी व शालेय स्वच्छता गृहाची बांधणी, तसेच उघड्यावरील शौचाची प्रथा बंद करणे याबाबी महत्वपूर्ण आहेत. निर्मल ग्राम, निर्मल तालुका घोषित करण्याच्या कार्यक्रमामध्ये याबाबी महत्वपूर्ण आहेत. या उपक्रमात निबंध स्पर्धा घेणे, भित्तीचित्र स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छ परिसर, स्पर्धाचे तसेच 14 नोव्हेंबर रोजी स्वच्छ शाळा व स्वच्छ अंगणवाडी दिवस. 15 नोव्हेंबर रोजी स्वच्छ परिसर (मैदाने इ.). 16 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक स्वच्छता व बाल आरोग्य. 17 नोव्हेंबर रोजी स्वच्छ अन्न. 18 नोव्हेंबर रोजी स्वच्छ पिण्याचे पाणी. 19 नोव्हेंबर रोजी शौचालय आयोजन करण्यात यावे. 
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बाल स्वच्छता मिशन राबविण्याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय भारत सरकार यांनी राज्यांना सुचित केले आहे. बालकांना स्वच्छतेचे संदेश, हात धुणे व प्रचार प्रसिद्ध करीता महत्वाचे दूत म्हणून या मोहिमेत सहभागी करुन घ्यावयाचे आहे. बालकांना या मोहिमेमध्ये सहभागी करुन घेण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्यास आपले गाव, तालुका व जिल्हा निर्मल होण्यामध्ये महत्वाची भुमिका बालके बजावू शकतात. बाल दिन 14 नोव्हेंबर ते जागतीक स्वच्छतागृह दिन 19 नोव्हेंबर पर्यंत ही मोहिम राबवायची आहे. त्यामध्ये बालकांना लघवी व शौचाला जाणेकरीता घर, शाळा, एसटी स्टँड, बस थांबे, यात्रास्थळे, उपहारगृह, प्रेक्षणीय स्थळे, आठवडी बाजार, मैदाने सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता गृह उपलब्ध करुन देणे व वेळेवर स्वच्छता गृह उपलब्ध होणे या बालकांच्या हक्कांची त्यांना जाणीव करुन दयावयाची आहे. या उपक्रमाच्या कालावधीत विषयनिहाय जबाबदार अधिकारी निश्तिच करण्यात आले आहे, अशा सुचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. 
000000


"राष्ट्रीय शिक्षा दिवस" 11 नोव्हेंबरला
नांदेड, दि. 9 :- मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जयंती दिवस 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात शनिवार 11 नोव्हेंबर रोजी "राष्ट्रीय शिक्षा दिवस" अल्पसंख्याक विभागाच्या शासन परिपत्रकानुसार साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
00000


ईद ए मिलाद निमित्त मिरवणूक
रविवार 24 नोव्हेंबर रोजी निघणार
नांदेड दि. 9 :- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त नांदेड शहरात मरकज-ए-मिलाद कमिटीच्यावतीने निजाम कॉलनी पासून मिरवणूक काढण्यात येणार होती. परंतू मा. सर्वोच्च न्यायालयाने आयोध्या येथील रामजन्मभुमी व बाबरी मस्जिद संदर्भात दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने नांदेड शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी मरकज-ए-मिलाद कमिटीने पुढाकार घेऊन सर्व जमात सोबत चर्चा करुन रविवार 10 नोव्हेंबर 2019 रोजीची मिरवणूक पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेतला व त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत येऊन त्यांनी त्यांचा निर्णय जिल्हादंडाधिकारी व पोलीस अधीक्षक नांदेड यांना कळविला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
0000







श्री गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जन्म जयंतीनिमित्त भारतीय सांस्कृतीक संबंध परिषद (विदेश मंत्रालय भारत सरकार) यांच्यावतीने जगाच्या विविध भागातून 40 युवा शिख बांधवांचे आज दुपारी 3 वा. श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्यासमवेत विदेश मंत्रालयाचे संचालक नर्मताकुमार, त्यांचे अधिकाऱ्यांचे आगमन झाले.  त्यानंतर त्यांनी सुप्रसिध्द श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार संजय बिरादार, नायब तहसिलदार विजयकुमार पाटे यांची उपस्थिती होती.


न्याय आपल्या दारीचा लाभ घ्या
कायदेविषयक सेवा दिनाच्या पुर्वतयारीची बैठक संपन्न
            नांदेड दि. 9 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दि. अ. धोळकिया यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडच्या कार्यालयात सचिव आर. एस. रोटे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक सेवा दिनांच्या पुर्वतयारीबाबत बैठक संपन्न झाली.
जिल्हयात व नांदेड तालुक्यात 9 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत ना.ल.सा. च्या मार्गदर्शक सूचनानुसार दोन आठवड्यांसाठी कायदेविषयक सेवा दिन वडगाव, पुनेगाव, वाडीपुयड, वाजेगाव, विष्णुपूरी, असदवन, पांगरी, वसरणी, असरजन, खडकुत, महादेव पिंपळगाव, सागवी (बु), सोमेश्वर राहाटी, सुगाव, चुगाव, वाघी, नाळेश्वर, पुयनी, पासदगाव, बोंढार, तरोडा (बु), तरोडा (खु) व इतर गावे तसेच नांदेड शहर येथे साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल विधीज्ञ समाजसेवक व एम.एस.डब्लुचे विद्यार्थी हे नागरीकांना घरोघरी जावुन कायदेविषयक मार्गदर्शन व सहाय्य  करणार आहेत. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या काही कायदेविषयक अडीअडचणी असतील तर त्यानी संबंधीतांकडुन मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. एस. रोटे यांनी केले आहे.
00000


कायदा, सुव्‍यवस्‍थेच्या अनुषंगाने मदत कक्ष
नांदेड दि. 9 :-  आयोध्‍या येथील रामजन्‍म भूमि- बाबरी मस्‍जीद विवादीत जागे संदर्भात मा. सर्वोच्‍च न्‍यायालय दिल्‍ली यांचेकडून 9 नोव्हेंबर 2019 रोजी निकालाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेल्‍या अहवालानुसार नांदेड जिल्‍हयात कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नसल्‍याने  जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत प्रतिबंधात्‍मक आदेश पारित करण्‍यात आला आहे. तसेच याद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयात आपतकालीन नियंत्रण कक्ष स्‍थापीत असून ज्‍याचा दुरध्‍वनी क्रमांक 02462- 235077 हा आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्‍यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी  केले आहे.
00000


वाहतूक मार्गात शनिवारी बदल
नांदेड दि. 9 :-  रामजन्‍मभुमी-बाबरी मस्‍जीद या प्रकरणी मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्याअनुषंगाने कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी, राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासणे व सर्व सामान्‍य नागरीकांचे हित लक्षात घेवून शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून,पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केली आहे.  
वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग -आय.टी.आय.ते वजीराबाद मार्केट ते सोनु कॉर्नर पर्यंत हा रस्‍ता वाहतूकीस पुर्णपणे बंद. फुले मार्केट ते शिवाजीनगर कडे येणारा रस्‍ता पुर्णपणे बंद. शिवाजी पुतळाकडून वजीराबादकडे येणारा रस्‍ता पुर्णपणे बंद. तिरंगा चौक ते वजीराबाद चौकाकडे येणारा रस्‍ता पुर्ण पणे बंद. मिलगेटकडून बसस्‍थानक ST ओव्‍हर ब्रिजकडे येण्‍यासाठी रस्‍ता बंद हा रस्‍ता अॅक्‍सीस बॅकेजवळ बंद. डॉक्‍टर लाईनकलामंदीर जवळील रस्‍ता व डॉक्‍टर लाईन राज ऑप्‍टीकल जवळील रस्‍त्‍याने पुढे मुख्‍य रस्‍त्‍यावर येण्‍यासाठी रस्‍ता बंद. गोकुळनगर कडुन ST ओव्‍हर ब्रिज कडुन पुढे व वजीराबाद कडे जाण्‍यास रस्‍ता बंद.

वाहतूकी करीता पर्यायी मार्ग-  ज्‍यांना आय.टी.आय कडून वजीराबाद, जुना मोंढा, सिडको, हडको यायचे असेल त्‍यांनी आय.टी.आय.ते अण्‍णाभाऊ साठे चौक-चिखलवाडी-भगतसिंग चौक-जुना मोंढा-नवीन पुल-कौठा चौकी या मार्गाचा वापर करावा. ज्‍यांना सिडको, हडको ते आय.टी.आय., अण्‍णाभाऊ साठे चौक, राज कॉर्नर, नमस्‍कार चौक, आनंदनगर, इत्‍यादी भागाकडे यायचे असेल तर त्‍यांनी कौठा चौकी ते जूना मोंढा-भगतसिंग चौक-कविता रेस्‍टॉरंट-हिंगोली गेट-अण्‍णाभाऊ साठे पुतळा-किंवा कौठा चौकी ते रविनगर- गोवर्धन घाट-तिरंगा चौक ते लालवाडी-गणेशनगर अशा मार्गाचा वापर करावा. जुना मोंढा ते वजिराबाद येणारी वाहतूक ही सोनू कॉर्नर ते तिरंगा चौक अशी राहील.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 33  नुसार जिल्‍हा दंडाधिकारी यांना त्‍यांच्‍या क्षेत्रात लोकांच्‍या सोयीकरीता रहदारीचे विनियमन करण्‍याचा अधिकार प्रदान आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 अन्वये अधिकाराचा वापर करुन जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी विनंती केल्‍यानूसार शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी रामजन्‍मभुमी -बाबरी मस्‍जीद या प्रकरणी मा. सर्वोच्‍च न्‍यायालय आपला निकाल जाहीर होत असल्‍याने कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राखणे, राष्‍ट्रीय एकात्‍मता जोपासणे व सर्व सामान्‍य नागरीकांचे हित लक्षात घेवून वाहतूकीच्‍या मार्गात बदल करुन पर्यायी मार्गाचा वापर करण्‍या बाबत अधिसूचना प्रसिध्‍द केली आहे.
            ही अधिसुचना शनिवार 9 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8 ते रात्री 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहिल त्यानंतर ही अधिसुचना रद्द समजण्‍यात यावी, असे अधिसुचनेत नमूद केले आहे.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...