Tuesday, January 24, 2017

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जागृती फेरीस
उत्स्फुर्त प्रतिसाद; स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न
             जिल्हाधिकारी काकाणी यांनी दिली मतदानाची प्रतिज्ञा
नांदेड दि. 25 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तत्त्पुर्वी काढण्यात आलेल्या मतदार जागृती फेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते मतदार जागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले. सायन्स कॅालेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात जिल्हाधिकारी काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली फेरीचा समारोप तसेच मतदार जागृती मोहिमेतील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. जिल्हाधिकारी काकाणी यांनी उपस्थितांना मतदानाबाबत प्रतिज्ञा दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मतदार जागृती फेरीस सुरवात झाली. जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते फेरी मार्गस्थ करण्यात आली. मनपा आयुक्त समीर उन्हाळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसिलदार पी. के. ठाकूर यांच्यासह जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव आदींची उपस्थिती होती. या फेरीत विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी आदींनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, वजिराबाद चौक, शिवाजीनगर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसर-आयटीआय चौक ते  सायन्स कॅालेज या मार्गावरून फेरी काढण्यात आली. सायन्स कॅालेजच्या पुरणमल लाहोटी सभागृहात फेरीचा समारोप झाला.
           
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की, लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रीया आणि त्यामधील मतदानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. अन्य शिक्षणाबरोबरच या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत लोकशिक्षण होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने तरुणांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वपुर्ण राहणार आहे. तरुण मतदारांनी केवळ आपल्या मतदानाच्या अधिकारापुरता विचार न करता, अवती-भवतीच्या मतदानास पात्र नागरिकांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. तंत्रज्ज्ञानाच्या वापरामुळे मतदार म्हणून नोंदणी आणि अनुषांगीक माहिती सहज सुलभ उपलब्ध होते. त्यासाठी आपलं नांदेड हे ॲपही वापरता येऊ शकते. सोशल माध्यम, माहिती तंत्रज्ज्ञानाचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठीच्या या मोहिमेतही करता येईल.
या समारोपाच्या समारंभात सुरवातीला दिपप्रज्वलन झाले. राणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या विद्यार्थींनीनी स्वागत गीत सादर केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पिनाटे यांनी प्रास्ताविक केले. नांदेड तहसील कार्यालयाने तयार केलेल्या मतदार जागृतीविषयक पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. मतदार जागृती मोहिमेंतर्गत समाविष्ट श्री गुरुगोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नाटीका प्रथम क्रमांकाची विजेते ठरली. या नाटीकेचेही सादरीकरण करण्यात आले. विविध मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार तसेच नवमतदारांना मतदान ओळखपत्रांचेही वितरण करण्यात आले. तसेच मतदार जनजागृती मोहिमेतील चित्रकला, निबंध आदी स्पर्धांतील विजेत्यांना तसेच त्यांच्या परीक्षक आदींनाही सन्मानीत करण्यात आले.
मतदार जागृतीसाठी योगदान देणाऱ्या वृत्तपत्रांची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी दैनिक उद्याचा मराठवाडाचे  उपसंपादक किरण कुलकर्णी यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंद्रे यांनी संसदीय लोकशाही प्रणालीतील मतदानाचे महत्त्व विशद केले. राजेश कुलकर्णी यांनी फेरीचे तसेच समारंभाचे सुत्रसंचालन केले. नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी आभार मानले.
000000


शासकीय वसतिगृहात पालक मेळावा संपन्न
            नांदेड, दि. 24 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नांदेड येथे नुकताच वसतिगृहातील विद्यार्थी व पालकांचा मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. बी. चव्हाण,  प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त उपप्राचार्य पी. डी. माने यांचीही यावेळी उपस्थिती होती.  
           
यावेळी विद्यार्थ्यांना प्रसिक बलखंडे, सखाराम पोहरे, राम कांबळे, विश्वजीत गायकवाड, पालक गणेश पांचाळ यांनी मनोगत व्यक्त करुन मागदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृहाचे गृहपाल गणेश भायेगावकर यांनी केले. विद्यार्थी माधव राजरपल्लू यांनी सुत्रसंचलन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसतिगृहातील कर्मचारी यु. के. गजभारे, एम. एन. फड, कैलास कांबळे, ए. बी. गायकवाड, बी. के. नरवाडे, एस. एन. कांबळे, श्रीमती आर. एल. मुद्देवाड, श्रीमती के. डी. वाघमारे यांनी संयोजन केले.

00000000
न्यायसहायक विज्ञान जागृती सप्ताहाचे
30 जानेवारी पासून आयोजन
नांदेड, दि. 24 :- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोमवार 30 जानेवारी 2017 ते गुरुवार 2 फेब्रुवारी 2017 या कालावधीत न्यायसहायक विज्ञान जागरुकता सप्ताह आयोजित केला आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विधी शाखेतील पदवीत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय तथा विद्यापीठामार्फत या प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपसंचालक प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा गृह विभाग नांदेड  यांनी केले आहे.
या कालावधीत प्रयोगशाळेची कार्यपद्धती पाहता यावी याकरीता ही प्रयोगशाळा पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अभियोक्ता व विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी शाखोतील पदवीत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थी इत्यादी यांच्याकरीता खुली राहणार आहे. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नांदेड हे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील गुन्हे विश्लेषणास मदत करणारी प्रयोगशाळा आहे. ही प्रयोगशाळा अभ्यास पूर्ण विश्लेषण अहवाल कमी वेळेत तपासणी यंत्रणांना उपलब्ध करुन देण्यास प्रयत्नशील असते.  प्रयोगशाळा एकवर्षापासून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जुनी इमारत दूसरा मजला वजिराबाद नांदेड येथे कार्यरत आहे.

000000
राष्‍ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज
विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन
नांदेड शहरात जागृती रॅली, कार्यक्रम
            नांदेड, दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्यानुसार दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हास्तरावरील कार्यक्रम म्हणून बुधवार 25 जानेवारी 2017 रोजी रॅली व त्यानंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून रॅलीस प्रारंभ होईल व त्यानंतर सकाळी नऊ वाजता सायन्स कॅालेज येथे कार्यक्रम होईल , असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
            जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणेच यंदाही या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. सर्व तालूका मुख्‍यालय तसेच सर्व मतदान केंद्रावरही हा दिवस साजरा करण्‍यात येणार आहे.
            राष्‍ट्रीय मतदार दिवसाच्‍या निमीत्‍ताने जिल्‍हा स्‍तरावर मुख्‍य कार्यक्रम सायन्‍स कॉलेज नांदेड येथे नऊ वाजता वाजता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मनपा आयुक्त समीर उन्‍हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी मुका.अधिकारी पद्माकर केंद्रे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आदी प्राध्‍यापकही उपस्थित राहतील. तत्त्पुर्वी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून मतदार जागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. ही रॅली जिल्‍हाधिकारी कार्यालयापासून निघून सायन्‍स कॉलेज येथे पोहोचेल.  या रॅलीमध्‍ये विविध क्रीडा संघटना, संस्था आदी सहभागी होणार आहेत. या मतदार जागृती कार्यक्रमातही उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
राष्‍ट्रीय मतदार दिवसाच्‍या अनूषंगाने मागील तीन आठवडयात युवा मतदारांसाठी जिल्‍हयात विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले होते. युवा मतदारांचा सहभाग वाढावा यादृष्‍टीने जिल्‍हयातील अनेक महाविद्यालयात मतदान यंत्राचे प्रात्‍यक्षिकही दाखविण्‍यात आलेले आहे. युवा मतदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे.     
मतदान केंद्रावर बीएलओ उपस्थित राहणार
             दरम्यान, जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रावर राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. यासाठी जिल्‍हयातील BLO त्‍यांना नेमून दिलेल्‍या केंद्रावर उपस्थित राहतील. नवीन नोंदणी केलेल्‍या मतदारांना, दुरुस्‍तीसाठी आणि स्‍थलांतरासाठी अर्ज केलेल्‍या मतदारांना मतदार ओळखपत्रांचे (EPIC) वाटप करण्‍यात येणार आहे.

00000000
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी ध्वजवंदनाचा
मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदानावर
नांदेड, दि. 24 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 26 जानेवारी 2017 रोजी वजिराबाद परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 9.15 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बॅग किंवा तत्सम वस्तू आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पूर्वी किंवा 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ, आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.

000000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 23  :- जिल्ह्यात शनिवार 4 फेब्रुवारी 2017  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील निवडणुका, राष्ट्रीय सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात रविवार 22 जानेवारी ते शनिवार 4 फेब्रुवारी 2017 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
000000


 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...