Tuesday, February 18, 2025
वृत्त क्रमांक 198
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड दि. 18 फेब्रुवारी :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 फेब्रुवारी चे 6 वाजेपासून ते ते 19 मार्च 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा , ज्याची चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मार्च 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000
वृत्त क्रमांक 197
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या
थेट कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 18 फेब्रुवारी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना राबविली जाणार आहे. थेट कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव नांदेड जिल्ह्यातील मांग, मातंग, समाज व तत्सम 12 पोटजातीतील तसेच मांतग समाजातील राज्य स्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त (महिला व पुरुष) व्यक्तीना व सैन्य दलातील विरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यासाठी इच्छुक अर्जदाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरील योजनेचे कर्ज अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, नांदेड येथे 20 फेब्रुवारी ते 5 मार्च 2025 पर्यत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत देण्यात येतील व स्विकारण्यात येतील, त्यानंतर आलेले अर्ज स्विकारणे बंद करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि. आर. शिंदे यांनी केले आहे.
थेट कर्ज योजनेसाठी भौतिक व आर्थिक 45 उद्दिष्ट दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मांग, मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्ष पूर्ण असावे 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसिंग रिपेरिंग, इलेक्ट्रेशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरिंग (फ्रीज, एसी, टिव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर) हार्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिग, टेलरिंग, फुड प्रोडक्ट प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन, वेल्डिंग, हार्डवेअर व सेनेटरी शॉप, प्रिंटीग, शिवणकला, झेरॉक्स, लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरिंग, सर्विसेस, मंडप डेकोरेशन क्रिडा साहित्य/स्पोर्ट शेप, ज्यूस सेंटर, क्लॉथ, रेडीमेड गारमेंट शॉप, मोटार मेकानिक रिपेअर, शेतीशी निगडित पुरकाजोड व्यवसाय इत्यादी व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वत अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावे. त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
कर्ज प्रकरणासोबत जोडावयाची कागदपत्रे:- जातीचा, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्डची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, पॅनकार्ड झेरॉक्स प्रत, तीन पासपोर्ट फोटो, व्यवसायाचे परपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडे पावती. करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, नमुना 8, लाईट बिल, टॅक्स पावती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका यांचे प्रमाणपत्र किंवा शॉप अक्ट परवाना, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र, अर्जदाराचे सिबील क्रेडिट स्कोअर 500 असावा. अर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा, प्रकल्प अहवाल, प्रकरणासोबतची सर्व कागदपत्रे स्वत: च्या स्वाक्षरीने साक्षाकिंत करावी. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
उद्दिष्टे जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णयानुसार महामंडळे दिनांक 14.11.2022 नुसार लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल. थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरणे जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजूरीसाठी शिफारस करण्यात येईल असेही महामंडळाने कळविले आहे.
00000
वृत्त क्रमांक 196
अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
नांदेड, दि. 18 फेब्रुवारी : सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने मंजुरी दिलेली आहे.
या योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरणेसाठी विद्यार्थ्यांकडून 15 फेब्रुवारी 2025 पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
तथापि सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज लवकरात लवकर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, ३,चर्च पथ,पुणे -०१ यांचे स्तरावर अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक 195
नांदेड शहरातील शुक्रवार ते रविवार पर्यंतचे आठवडी बाजार राहणार बंद
सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरतील हे बाजार
नांदेड दि. 18 फेब्रुवारी : राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा येत्या 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात पार पडणार आहेत. त्याअनुषंगाने नांदेड शहरात शुक्रवार 21, शनिवार 22, रविवार 23 फेब्रुवारी रोजी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. हे आठवडी बाजार सोमवार 24 फेब्रुवारी रोजी भरणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आदेश निर्गमीत केला आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातून जवळपास 3 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहेत. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम तसेच यशवंत कॉलेज मैदान या परिसरात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनीक शांतता भंग होऊ नये यासाठी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा आदेश काढला आहे.
0000
वृत्त क्रमांक 194
नवोदय विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
वृत्त क्रमांक 193
राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज
छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे वेध
जालन्यात नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद
नांदेड दि. 18 फेब्रुवारी :- नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत (छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने) राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा स्पर्धेच उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व विभागीय आयुक्तासह, नांदेडचे यापूर्वीचे सर्व जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्ये्ने उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धा छत्रपती संभाजीनगर विभागाच्याावतीने घेण्यात येत आहेत.
जालण्याला नुकतेच विभागीय महसूली स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेडला महसूल विभागीय सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. आता विभागस्तरावर प्रत्येक खेळासाठी विभागाची एक चमू तयार होत आहे. त्यांचे कॅम्प लागले असून नांदेड येथे त्यांचा सराव सुरू आहे. जालन्यात परस्परांविरुद्ध खेळणाऱ्या चमू आता एक चमू बनून विभागांची लढणार आहे थोडक्यात कोकण पुणे ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती ,नागपूर अशा सहा विभागामध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लढत होणार आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी राज्यस्तरीय स्पर्धा विभागस्तरावरच विभाग अर्थात विभाग मुख्यालयी झालेल्या आहे. नांदेड मधील क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत विकासामुळे छत्रपती संभाजी नगर विभागीय क्रीडा स्पर्धा प्रथमच नांदेडमध्ये होत आहे .या आयोजनाचे नांदेडला बहुमान मिळाला आहे.
यजमान छत्रपती संभाजीनगर विभाग असून आता छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय विजयाचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे लक्ष आहे. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरु असून सर्व महसूल अधिकारी कर्मचारी क्रिडा स्पर्धाच्या तयारीसाठी कामाला लागले आहेत. नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिघजी स्टेडियम हे या क्रीडा स्पर्धासाठी सज्ज झाले आहे.
महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी मुख्य अतिथी राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, राज्यसभा सदस्य डॉ. अजित गोपछडे, लोकसभा सदस्य प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण, हिंगोलीचे लोकसभा सदस्य नागेश पाटील आष्टीकर, लातूरचे लोकसभा सदस्य डॉ. शिवाजीराव काळगे, विधान परिषद सदस्य विक्रम काळे, विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य बालाजी कल्याणकर, विधान सभा सदस्य आनंद तिडके, विधान सभा सदस्य प्रतापराव गोविंदराव पाटील चिखलीकर, विधान सभा सदस्य डॉ. तुषार गोविंदराव राठोड, विधान सभा सदस्य राजेश पवार, विधान सभा सदस्य भिमराव केराम, विधान सभा सदस्य जितेश अंतापूरकर, विधान सभा सदस्य बाबुराव कदम कोहळीकर, विधान सभा सदस्य श्रीजया चव्हाण, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची उपस्थिती राहणार आहे.
21 ,22 ,23 फेब्रुवारीला होणाऱ्या या स्पर्धा सर्व नागरिकांना बघता येणार आहे. 21 व 22 फेबुरवारीला दररोज रात्री सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहे. यामध्ये विविध कलाविष्कार बघायला मिळणार आहे.
क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुल्या आहेत. या आयोजनाचा आनंद सर्वांना घेता येईल.
जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचारी यानिमित्ताने शहरात येणार आहे त्यांची विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले दररोज या स्पर्धा संदर्भात आढावा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनाला व क्रीडा सुविधांना राज्यस्तरावर मानांकित करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. यानिमित्ताने नांदेडच्या क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांना मजबूत करण्यात येत आहे.
00000
विशेष वृत्त 192
'आम्ही असू अभिजात ' संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज !
आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत
नांदेड दि.१८ फेब्रुवारी : नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिग्गज गायकांचा सहभाग असणारे अभिजात मराठीला शब्दबद्ध करणाऱ्या दीर्घ काव्याला त्यांनी संगीताचा साज चढवला असून तमाम नांदेडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.
98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड मधून एकीकडे शेकडो साहित्यिक रवाना होत आहे. आता नांदेडसाठी आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेले 'आम्ही असू अभिजात ' हे संमेलन गीत आणखी एक आनंद वार्ता ठरले आहे.
काल राज्याचे राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेल्या 'आम्ही असू अभिजात ', या मराठी भाषेच्या गौरवगीताला संगीताचा साज चढविण्याचे काम त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे या गीताचे पार्श्वगायन सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे,सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी केले आहे.या गीताचे संगीत संयोजन प्रथमेश कानडे, ध्वनिमुद्रन मन्मथ मठपती, ध्वनि मिश्रण आदित्य देशमुख यांनी केले आहे.
हे गीत संगीत, पार्श्वगायन, लेखन सादरीकरण या सर्वच कसोटीवर आगळे वेगळे सिद्ध होत आहे. या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे.
त्यामुळे या गाण्याचा व्हिडिओ देखील लक्षवेधी ठरला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्त होण्याच्या घटना क्रमावर आधारित हे गीत असून कवी अमोल देवळेकर यांनी 10 अंतऱ्याचे हे दीर्घकाव्य मराठीच्या अभिजात दर्जाचा गौरव करताना लिहिले आहे. संदर्भाचे सुनियोजित सादरीकरण या गीतातून होत आहे.
दरम्यान, आयोजकांनी काल या गीताचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करताना संगीतकार आनंदी विकास यांना सन्मानाने या साहित्य संमेलनाला आमंत्रित केले आहे. साहित्यप्रेमी नांदेडकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
00000
विशेष लेख /
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ
बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा
भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे.
भाषा कुठून येते ? आपण ' मातृभाषा ' असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते.ते वाढत जाते , तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला ( औरंगाबाद ) राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत , तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे , याचा जणू विसरच पडतो आणि ' मेथी क्या भाव है ? ' असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सहजपणे विचारतो !
प्रश्न भाषेचा असल्याने आणि भाषा ही मूलतः वैयक्तिक असल्याने काही व्यक्तिगत अनुभव नमूद करायला हवेत.साधारण पस्तीस वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या मित्राने मला बजावले होते की , पुण्यात रिक्षावाल्याशी हिंदीत बोलायचे नाही ! हिंदीत बोलणारा माणूस पुण्यातील नाही म्हणजे नवखा आहे , असे रिक्षावाल्यांच्या लगेच लक्षात येते आणि मग त्यातील एखादा जवळच्या अंतरासाठी दूरचा रस्ता जवळ करू शकतो असे त्या मित्राचे सांगणे होते.दुसरा अनुभव दिल्लीतील.तेथे राहणारे माझे एक आप्त मला म्हणाले की त्यांच्या परिचयाच्या अन्य मराठी माणसांच्या तुलनेत माझी हिंदी चांगली आहे. या आप्तांना चांगल्या वाटलेल्या माझ्या हिंदीचे कारण माझे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील वास्तव्य म्हणजे माझा परिसर हे आहे.वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणारे प्रा. वसंतराव कुंभोजकर विद्यार्थ्यांना सांगत की , मराठी शब्दोच्चारांवर लक्ष द्यायला हवे. हिंदीत ' ण ' नाही पण मराठीत तो आहे आणि त्याचा उच्चार ' न ' पेक्षा वेगळा आहे ! ही सगळी उदाहरणे भाषेचे परिसराशी असलेले नाते सांगणारी आहेत. कोणतेही व्याकरण शिकण्यापूर्वी भाषा आत्मसात करण्याची मानवी क्षमता नैसर्गिक असल्याचे भाषाशास्त्रज्ञ सांगतात.
परिसरात माणसं असतात तशी माध्यमं असतात. आज तर माध्यमांचे प्रकार आणि त्यांची संख्या वाढती आहे.ही सारी माध्यमं आपल्या समोर आणून ठेवणारा मोबाईल आपल्या तर नेहमीच हाती असतो. त्याने आपला जणू सारा परिसरच व्यापला आहे. यातील बराच भाग आभासी असतो आणि तो खऱ्याखुऱ्या परिसरापासून आपल्याला नेहमी दूर नेतो , हेही लक्षात घ्यावे लागते. आपला परिसर माध्यमांनी व्यापलेला असल्याने माध्यमांच्या भाषेचा विचार करावा लागतो.
कोणे एकेकाळी ( हा कोणे एकेकाळ फार लांबचा नाही ! ) माध्यमांचे विश्व म्हणजे दैनिके , नियतकालिके , आकाशवाणी आणि दूरदर्शन असे होते. ( आकाशवाणी आणि दूरदर्शन हे शब्द रेडिओ आणि टेलिव्हिजन या शब्दांचे मराठी प्रतिशब्द नव्हेत.पण माध्यमांनी त्या अर्थाने ते रूढ केले आहेत. ' झेरॉक्स ' हा शब्दही असाच रूढ झाला आहे. मागच्या पिढीत वनस्पती तुपासाठी ' डालडा ' हा शब्दही असाच रुढ झाला होता.) जेव्हा माध्यमाचे विश्व मर्यादित होते , तेव्हा त्यांच्यातील स्पर्धाही मर्यादित होती. ( माणसाची झोप ही आमची प्रतिस्पर्धी आहे , असे म्हणणाऱ्या ' नेटफ्लिक्स ' चा काळ तेव्हा कल्पनेतही नव्हता !) एकूण जीवनाला आजच्या सारखी गती नव्हती. ' सर्वात आधी आणि सर्वांच्या पुढे ' हा आजचा जीवनमंत्र तेव्हा माध्यमांनी स्वीकारलेला नव्हता. तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतके गतीमान नव्हते आणि त्याच्या गतीची मर्यादा स्वीकारली गेली होती.माध्यमे तंत्रज्ञानप्रधान नव्हती.तेथे काम करणारे आणि वाचक ( ग्राहक नव्हे !) महत्वाचे होते.वाचकांची जडणघडण आपण करू शकतो , ही भूमिका तेव्हा रूढ होती म्हणूनच काही दैनिके राशिभविष्य छापत नव्हती. काही दैनिके आसाम ऐवेजी असम , पंतप्रधान ऐवेजी प्रधानमंत्री , मध्यपूर्व ऐवेजी पश्चिम आशिया , उत्तरपूर्व ऐवेजी इशान्य असे शब्द जाणीवपूर्वक उपयोगात आणत.त्या काळातील भाषा ही बहुतेकवेळा प्रमाणभाषेशी नाते सांगणारी होती. मराठी शब्द कटाक्षाने वापरण्याकडे कल होता.आज एका बाजूला कम्प्युटर हा शब्द वापरला जातो आणि त्याच वेळी डेटा या शब्दासाठी विदा हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि यात विसंगती आहे , असे कोणालाही वाटत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांना अनुक्रमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे रूढ झालेले शब्दही वापरले जात नाहीत. काही वेळा मुख्य न्यायाधीश आणि सरन्यायाधीश असा फरक केला जात नाही. दिनांक ऐवजी तारिख , सप्ताह ऐवेजी आठवडा असे सोपे शब्द रुजवण्यासाठी प्रयत्न झाले , याचा आता विसर पडला आहे. हे घडत आहे याची अनेक कारणे आहेत. वर्तमानपत्रांच्या जगात पूर्वी बातमी असो की लेख , ते संपादकीय संस्कार केल्यानंतरच पुढे पाठवले जात. वार्ताहर , मुख्य वार्ताहर ,उपसंपादक , मुख्य उपसंपादक , वृत्तसंपादक...अशा पायऱ्या तेव्हा केवळ नामाभिधानासाठी अस्तित्वात नव्हत्या तर त्यांची स्वतंत्र कार्ये निर्धारित होती.आज ही पदं अस्तित्वात आहेत पण त्यांची दैनंदिन कार्ये बदलेली दिसतात. हा बदल तंत्रज्ञानातील बदलासोबत आला.तंत्रज्ञान गती आणि स्पर्धा घेऊन आले. त्याने माध्यमांचे स्वरूप बदलले. मुद्रितशोधक हद्दपार झाला.बातमीदार असो की लेखक , तोच त्याच्या मजकूराचा अनेकदा उपसंपादक ठरू लागला. जी दैनिके वेगळी जिल्हा पाने देतात , त्या पानांत या स्थितीचे प्रतिबिंब सहज दिसते.याचा परिणाम भाषेवर झाला. काहींनी नव्या पिढीशी नाते जोडायचे म्हणून त्या पिढीच्या भाषेशी नाते जोडण्याचा व्यावहारिक आग्रह धरला.त्याला कधी तात्विक रूप दिले. त्यातून भाषेचे रूप आणखी पालटले. महानगरातील भाषेत जशी इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ झालेली असते तशीच भाषा दैनिकातून डोकावू लागली. महानगरात राहणारी नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते.त्याच पिढीतील प्रतिनिधी आज वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात.मग वटहुकूम आणि शासन निर्णय , विधेयक आणि कायदा यात फरक केला जात नाही. मराठीत क्रियापदांचे अनेकवचनी रूप असते , आदरार्थी अनेकवचन उपयोगात आणण्याची पद्धत आहे अशा बाबींचा विसर पडतो.
कोणतीही भाषा स्थिर असू शकत नाही आणि भाषेने अन्य भाषांमधील शब्द स्वीकारण्यास काही प्रतिबंध असू शकत नाही.पण असे शब्द स्वीकारताना आपल्या मूळ भाषेला रजा देण्याची गरज नाही.बँकेला बँक म्हणावे पण चेक साठी धनादेश हा शब्द सर्वांना समजतो ना ?
आपल्या भाषेविषयी मराठी माणूस जागरूक नाही , ही विदारक वस्तुस्थिती आहे. मागे नगरला ( आजचे अहिल्यानगर ) साहित्य संमेलन झाले तेव्हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य म्हणाले होते की , कलकत्ता शहरात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहायचे असेल तर बंगाली भाषा शिकावीच लागते.पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही.येथे पिढ्यानपिढ्या राहणारी माणसं मराठी नव्हे तर त्यांची मातृभाषा आणि हिंदी / इंग्रजी बोलत राहू शकतात.राहतात.
असे म्हणतात की ही विदारक वस्तुस्थिती ते सांगत होते तेव्हा सभामंडपातील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते
आपल्याकडील माध्यमात याच अवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे. त्यामुळे अनेकदा माध्यमातून कानी पडणारी किंवा वाचनात येणारी मराठी ही अनेकदा मराठी वळणाची राहिलेली दिसत नाही. त्यातून मग ' धन्यवाद ' मानतो ' / ' मानते ' यासारखे शब्दप्रयोग रूढ होतात. आभार मानले जातात आणि धन्यवाद दिले जातात हे लक्षात घेतले जात नाही.
आपल्याकडे दूरचित्रवाणीचा झपाट्याने विस्तार होत असताना एका मान्यवरांनी असे लिहिले होते की , पाश्चात्य देशात ' मुद्रण संस्कृती ' रुजल्यानंतर तेथे टेलिव्हिजन आला.आपल्याकडे मुद्रण संस्कृती रुजण्यापूर्वीच टेलिव्हिजन आला आणि विस्तारत असून त्याचे काही दुष्परिणाम संभवतात.भाषेच्या बाबतीत हे दुष्परिणाम आपण आता अनुभवत आहोत.
मुद्रीत माध्यम हे शब्दप्रधान आहे. नभोवाणीचे माध्यम शब्दच आहे. टेलिव्हिजनचे माध्यम कॅमेरा आहे. लिहिले जाणारे शब्द आणि टिपले जाणारे दृश्य यात अंतर असणार हे उघड असले तरी ते माध्यमांचा परस्परांवर परिणाम होऊ नये म्हणून आवर्जून लक्षात घेणे फार आवश्यक आहे. क्रिकेटच्या सामन्याचे दूरचित्रवाणीवरून होणारे थेट प्रक्षेपण , नभोवाणीवरून त्याच सामन्याचे प्रसारित होणारे धावते वर्णन आणि त्याच सामन्याचा दुसऱ्या दिवशी प्रसारित होणारा वृत्तांत यात फरक असणे स्वाभाविक आहे.असाच फरक या तीन माध्यमातून येणाऱ्या अन्य बाबींबद्दल असायला हवा. बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा यात असणाऱ्या फरकाची जाणीव ठेवणे ही प्राथमिक गरज आहे.आपल्याकडे जेव्हा एखाद्या महत्वाच्या घडामोडीचे तपशील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवले जातात तेव्हा कॅमेरा त्याचे दृश्य टिपण्याचे काम त्याच्या यांत्रिक क्षमतेने आणि वेगाने करीत आहे , मानवी तोंडातून निघणारे शब्द त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत याचा निवेदकांना / बातमीदारांना विसर पडलेला दिसतो. वर्तमानपत्रातही हे घडत असल्याचे हल्ली अनुभवास येते.तपशिलाच्या पसाऱ्यात नेमकेपणा हरवून जातो.हा माध्यमांचा परस्परांवर होत असलेला परिणाम आहे.असाच परिणाम मांडणीतही होत असल्याचे अनुभवास येते. छोट्या पडद्यावर एकाच वेळी निवेदक / वार्ताहर दिसतो , त्यांचा ज्यांच्याशी संवाद सुरू असतो तेही दिसतात , जे काही दाखवले जात आहे , त्याच्याशी निगडीत शब्दांकन दिसत असते , ' स्क्रोल ' सुरू असतो , कोपऱ्यात तपमान वगैरे दिसत असते.हे सारे रंगीत असते. वर्तमानपत्रातही मांडणीत अनेकदा अशी गर्दी दिसते.तेथे पुरेसे अंतर राखणारी कोरी जागा अर्थपूर्ण ठरते याचा विसर पडत चाललेला आहे.
आपल्याकडे वाहिन्या बहुभाषक असणे अपरिहार्य आहे.त्याचेही भाषेवर दुष्परिणाम होत आहेत. हिंदीत ' खुलासा ' हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो , त्या अर्थाने तो मराठीत उपयोगात आणला जात नाही. पण हल्ली हा ' खुलासा ' मराठीत ऐकू येत असला तरी तो हिंदीतील आहे , हे लक्षात घ्यावे लागते ! अशी किती तरी उदाहरणे देता येतील. हल्ली लहान मुलं त्यांच्या संभाषणात खूप हिंदी शब्द वापरत असतात.त्याचा उगम ते पाहतात त्या ' कार्टुन शो ' मध्ये आहे. आपल्याकडील लग्नसमारंभातील मराठीपण जसे हळूहळू हरवत आहे , तसेच भाषेचेही होत आहे ! कौटुंबिक नात्यातील मराठी संबोधने बाजूला पडत असून भाऊजी या शब्दाची जागा जिजाजी , मेहुणा या शब्दाची जागा साला या शब्दांनी घेतली आहे.
एकेकाळी वर्तमानपत्रांनी परिभाषेत भर घातली.आता व्यवहारात रूढ झालेले मराठी शब्द बाजूला सारून तेथे इंग्रजी / हिंदी शब्दांचा उपयोग सुरू आहे , याचा पदोपदी अनुभव येतो.
एकीकडे माध्यमातील नवी पिढी कार्यक्षम आणि तंत्रस्नेही असल्याचा अनुभव येत असतानाच त्यांचा मराठी शब्दसंग्रह मर्यादित होत असल्याचे जाणवते.याचे कारण या पिढीत मराठी साहित्याचे वाचन कमी झाले आहे , हे असावे.
इंग्रजी माध्यमातून होणारे शिक्षण , बहुभाषक परिसरात संपर्कासाठी सहजपणे उपयोगात आणली जाणारी हिंदी , माध्यमांना आलेले तंत्रज्ञानप्रधान व्यवसायाचे रूप , उसंत न देणारी वाढती स्पर्धा या आणि अशा काही कारणांमुळे आजच्या माध्यमात दिसणारी भाषा विचित्र रूप धारण करीत आहे. माध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम लक्षात घेता माध्यमांकडून उपयोगात आणली जाणारी भाषा महत्वाची ठरते. ती निष्कारण कठीण , बोजड नको तशीच स्वतःचे अस्तित्व सहजपणे विसरणारीही नको.ती पुढे जाणारी , स्वागतशील हवी आणि तिचे नाते तिच्या मुळांशी हवे.
राधाकृष्ण मुळी
निवृत्त संचालक
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
लातूर जिल्ह्यातील बालसाहित्य लातूर जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची ओळख करुन द्यावयाची झाली तर या जिल्ह्यातील बाललेखकांची, कवींची लेखनी सकस आण...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...