Friday, June 7, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 7 :- जिल्ह्यात 23 जून 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 9 जून 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 23 जून 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


शासकीय तंत्रनिकेतच्यावतीने
मुख्याध्यापकांचा मेळावा संपन्न
नांदेड दि.7 :- तंत्रशिक्षण संचालनालय, शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड शिक्षण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा आज कुसूम सभागृहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उपशिक्षणाधिकारी गिरीष आळंदे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे हे होते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांनी जागतिक स्तरावर आजही अभियांत्रिकी क्षेत्रातच रोजगार जास्‍त प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले . तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अभियांत्रिकी पदविका शिक्षण महागडे नसल्याचे सांगितले.
शिक्षणाधिकारी श्री. कुंडगीर यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेशाची माहिती घेवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सुचना दिल्या. शाळा लवकरच सुरु होणार असून त्याबाबतचे नियोजन करण्याबाबत त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना सांगितले. दहावीनंतर पदविका प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे सादरीकरण समन्वयक प्रा. ए. बी. दमकोंडवार व डॉ. एस. एस. चौधरी यांनी केले.
प्रवेशाच्या अनुषंगिक माहिती उपप्राचार्य पी. डी. पोपळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. ए. ए. जोशी यांनी व प्रास्ताविक विभाग प्रमुख आर. एम. सकळकळे यांनी तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख एस. एम. कंधारे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहन केली. यावेळी जिल्हाभरातून चारशेहून जास्तीत जास्त मुख्याध्यापक उपस्थित होते.
00000


गुटखा विक्री कारवाईत
19 हजार रुपयाचा साठा जप्त
नांदेड, दि. 7 :- प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आदी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी नांदेड शहरातील तरोडा बु येथील शिवाजी सखाराम गवळी (वय 28 वर्षे) या व्यक्तीच्या ताब्यातून 3 हजार 20 रुपयाचा साठा जप्त केला आहे. तसेच इतवारा येथील मोहमद जुबेर गुलाम ताहेर (वय 35 वर्षे) या व्यक्तीच्या ताब्यातून 16 हजार 494 रुपयाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे अन्न सुरक्षा कायदा व भादवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे यांनी सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर, यांच्या मार्गदर्शनाखाली केली. प्रतिबंधित अन्नपदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकाविरुध्द यापुढे नियमित कार्यवाही घेण्यात येणार आहे.  असे अन्नपदार्थ कोणीही छुप्या, चोरटया पध्दतीने विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन नांदेड यांच्याकडून करण्यात येत आहे. प्रतिबंधीत अन्नपदार्थाचे संदर्भात या प्रकरणात अन्नसुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत कमीतकमी 6 वर्षाची कारावास व 5 लाख रुपयाचा द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतुद आहे.
00000


दहावी परीक्षेचा आज निकाल 
       नांदेड दि. 7 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल आज शनिवार 8 जून 2019 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन मंडळाचे संकेतस्थळ www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com वर प्रसिद्ध होणार आहे. 
मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. माहितीची प्रिंट आऊटही घेता येणार आहे. निकाल बीएसएनएल मोबाईल एसएमएससेवेद्वारे MHHSC <space> <seat no> टाइप करुन 57766 या नंबरवर पाठवून निकालाविषयी माहिती घेता येईल. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांख्यिकी माहिती www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
000000


शासकीय ईबीसी वसतीगृहातील
प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु
नांदेड, दि. 7 :- शासकीय ईबीसी मुलांचे वसतीगृह मालेगाव रोड तथागत नगर नांदेड येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 8 वी, 11 वी, पदवी प्रथम वर्षे कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी नूतन प्रवेश तसेच वर्ग 9 वी, 10 वी, 12 वी, पदवी द्वितीय आणि तृतीय व पदवीत्तर द्वितीय वर्षे पुर्नप्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज 11 ते 30 जून 2019 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून मागविण्यात येत आहेत.
अर्जासोबत वार्षिक परीक्षेच गुणपत्रक सन 2018-19 या वर्षाचे वार्षिक उत्पन्नाचे तहसिलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्राच्या सत्यप्रती साक्षांकित करुन प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज व नियमावली कार्यालयीन वेळेत 11 ते 30 जून पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात मिळतील. या कालावधीत संपूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रांसह स्विकारले जाणार आहेत.
प्रवेश अर्जाची किंमत 10 रुपये असून अर्ज विद्यार्थ्यांने समक्ष घेऊन जावेत. विद्यार्थ्यांची प्रवेशाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वसतीगृह नियमीत सुरु होईल. वसतीगृहात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. शासनाकडून वसतीगृहास निवासाची, भोजनाची विनामुल्य सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश दिला जातो. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 20 टक्के जागा राखीव आहेत. या वसतीगृहात प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 30 जून 2019 ही असून या तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. चूक किंवा अपूर्ण माहितीचे अर्ज तसेच कागदपत्रांची पूर्तता न केलेले अर्ज स्विकारले जाणार नाही याची संबंधीत विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन गृहप्रमुख शासकीय ईबीसी वसतीगृह नांदेड यांनी केले आहे.
वसतीगृहातील प्रवेशासाठी एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे. माध्यमिक विभाग (8,9 ,10 वी)- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 32, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 8, खुला संवर्गासाठी- 6, राखीव- 2. उच्च माध्यमिक विभाग ( 11 12 वी )- 40 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 23, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 17, खुला संवर्गासाठी- 14, राखीव- 3. वरिष्ठ महाविद्यालय विभाग (पदवी/पदव्युत्तर)- 20 जागा, पूर्नप्रवेशाच्या जागा- 13, नुतन प्रवेशाची विद्यार्थी संख्या- 7, खुला संवर्गासाठी- 6, राखीव- 6 याप्रमाणे रिक्त जागेचा तपशिल आहे.
000000


महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा
नांदेड, दि. 7 :- राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून), कृषि व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार 8 जून 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
शनिवार 8 जून 2019 रोजी मुंबई येथून हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 वा. कळका हेलिपॅड ता. कंधार जि. नांदेड येथे आगमन व वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जाहिर सत्कार व मातोश्री द्रोपदाबाई गायकवाड पाटील सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- कळका ता. कंधार जि. नांदेड. दुपारी 1.30 वा. कार्यक्रम स्थळ येथून कळका हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.45 वा. कळका हेलिपॅड जि. नांदेड येथे आगमन व हेलिकॉप्टरने डिगसळ ता. कळंब जि. उस्मानाबादकडे प्रयाण करतील.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...