Friday, August 6, 2021

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित

एकाचा मृत्यू तर 6 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 961 अहवालापैकी 7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 209 एवढी झाली असून यातील 87 हजार 510 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 42 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी रामनगर किनवट येथील 72 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 657 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 5 व्यक्तीला सुट्टी देण्यात आली. 

आज 42 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृहविलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 131, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 71 हजार 858

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 69 हजार 586

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 209

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 510

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 657

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-38

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-29

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

00000

 जिल्ह्यातील 84 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 84 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शनिवार 7 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शहरी दवाखाना सिडको येथे कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पौर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.   

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 13 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय कंधार या केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे कोविशील्ड लसीचे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर ग्रामीण भागातील 43 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे 50 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 5 ऑगस्ट पर्यंत एकुण 8 लाख 58 हजार 526 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 63 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 9 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 8 लाख 72 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

सायलेज बेलर मशिन युनिट स्थापना योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :-  जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियांतर्गत विशेष घटक योजनेतून मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहकारी उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता बचतगट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांना बेलर मशीन युनिट स्थापन करण्यासाठी  अर्थसहाय्य मिळणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र संस्थेला आपले अर्ज मंगळवार 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करता येतील. 

या योजनेसाठी प्रति युनीट 20 लाख रुपये खर्चापैकी 50 टक्के 10 लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसहाय्य राहणार आहे. उर्वरीत 50 टक्के 10 लाख रुपये संस्थेचे स्वत: खर्च करावयाचे आहे. हा निधी विशेष घटक योजनेतील असल्याने योजनेसाठी जिल्ह्यात एक युनिट स्थापन करावयाचे आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 00000

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्‍सवाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जागतिक अदिवासी दिनानिमित्त सोमवार 9 ऑगस्‍ट रोजी सकाळी 10 वा. जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या महोत्‍सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या महोत्सवात सर्व प्रकारच्या रानभाज्‍या कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. कोवीड-19 च्‍या नियमांचे पालन करुन या रानभाजी महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 

या महोत्सवास आमदार बालाजीराव कल्‍याणकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्‍हा परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पदिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  वर्षा ठाकूर-घुगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. सकस अन्‍नामध्‍ये विविध भाज्‍यांचा समावेश होतो. सध्‍याच्या परिस्थितीमध्‍ये रानातील म्‍हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍या, रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या-त्‍या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. या रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती होणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी जिल्‍हयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्‍यात येणार आहे. या महोत्‍सवामधून शहरातील ग्राहकांनी थेट शेतकऱ्याकडून रानभाजी खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी केले आहे. शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात असणार आहे. हा महोत्सव सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

00000

 

मोटार वाहन नियम सुधारणा मसुदावरील हरकती / सूचना सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 सुधारणा करण्याच्या प्रारूप नियमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. याबाबत हरकती सूचना जनता / संस्थांकडून रविवार 15 ऑगस्ट 2021 पूर्वी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत.   

या नियमास महाराष्ट्र मोटार वाहन (तिसरी सुधारणा) नियम 2021 असे म्हणावे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 50 मधील उपनियम (2) ऐवजी खालील उपनियम दाखल करण्यात येईल. पुढील वाहनांच्या मालकांना अधिनियमाच्या प्रकरण चार मधील देय नोंदणी शुल्क भरण्यापासून सूट देण्यात येईल. फक्त शेतीविषयक कामाच्या वापरासाठी हेतू असणारे ट्रॅक्टरमोटर्स, रुग्णवाहिका आणि शववाहिनी आणि इतर डिझाइन केलेली मोटार वाहने जी विनामूल्य वैद्यकीय आणि इतर मदतीसाठी विशेषत वापरली जाणारी आहेत आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 2 च्या कलम  (यू) अंतर्गत परिभाषित  केलेली बॅटरीवर चालणारी वाहनाचा यात समावेश आहे.

00000

रेल्वे ओव्हर ब्रिज कामासाठी भोकर शहरातील रस्त्याचा पर्यायी मार्ग 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- रेल्वे ओव्हर ब्रिज कामासाठी भोकर शहरातील आंबेडकर चौक ते प्रफुल्लनगर (मुदखेड रोड) रेल्वे गेट नं. 3 पर्यंत रस्ता व वळण रस्ता 5 ऑगस्ट ते मंगळवार 10 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी प्रतिबंध केला आहे. जाण्या-येण्यासाठी पर्यायी मार्ग रस्त्याचा वापर प्रफुलनगर (भोकर-मुदखेड रोड)- सोमला नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक ते आंबेडकर चौकचा वापर करावा. 

या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही पात्र राहील, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.

000000

 जिल्ह्यात अनाधिकृत बायोडिझेल विक्री केल्यास होणार कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हयात कोणतीही व्यक्ती अनाधिकृत बायोडिझेल केंद्र चालवत असल्याचे आढळून आल्यास अशी तक्रार संबंधित तहसिलदार, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयात करावी. या तक्रारीमध्ये चौकशीअंती तथ्य आढळल्यास किंवा तसे निष्पन्न झाल्यास संबंधिताविरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदयातील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध बायोडि‍झेलची विक्री होत असल्याबा‍बत पेट्रोलपंप डिलर असोसिएशन नांदेड यांच्या निवेदनानुसार बायोडिझेल अवैध विक्रीस आळा बसावा यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी अवैध बायोडिझेल विक्रीस प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला विविध सुचना दिल्या. जिल्हयात ग्रामीण व शहरी भागात अनाधिकृतरीत्या बायोडिझेलची विक्री करताना कोणतीही व्यक्ती आढळुन आल्यास जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3/7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा असे निर्देशही देण्यात आले. 

केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार राज्यात बायोडिझेल विक्री संदर्भात सर्व समावेशक धोरण ठरवुन बायोडिझेल विक्रीस परवानगी देण्याची विनंती ऑल इंडिया बायोडिझेल असेसिएशन मुंबई यांनी शासनास केली आहे. त्यानुसार राज्यात बायोडिझेलच्या अवैध विक्रीस प्रतिबंध बसावा, बायोडिझेल उत्पादक, विक्रेता व पुरवठादार यांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे. राज्यात बायोडिझेल उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात बायोडिझेल विक्रीबाबत राज्याचे बायोडिझेल उत्पादन, साठवणूक, पुरवठा व विक्री धोरण 2021 हे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार विनापरवानगी बायोडिझेल विक्री करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेवर गुन्हा नोंद करुन दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. 

ज्यांना बायोडिझेलची विक्री करावयाची आहे त्यांनी राज्याचे बायोडिझेल उत्पादन, साठवणुक, पुरवठा व विक्री धोरण-2021 नुसार व शासनाची परवानगी घेऊन विक्री करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

00000



 

शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थीक मदत देण्यासाठी राज्यासह जिल्हयातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी, नोंद नसलेल्या खातेदार शेतकऱ्यांच्या कुटूंबातील कोणताही एक सदस्य ( जसे आई, वडील, शेतकऱ्यांचे पती / पत्नी, मुलगा व अविवाहीत यापैकी एक व्यक्ती) ज्यांचे वय 10 ते 75 वर्षापर्यंतच्या दोन व्यक्तींसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. या विमा योजनेसाठी 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीत अपघात झाल्यास त्यांच्या वारसाने अपघातापासून 45 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयास सादर करावा. 

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा शॉक आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अन्य कोणत्याही कारणाने होणारे अपघात त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अंपगत्व येते. घरातील करत्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणी निर्माण होतात. 

या विम्यापासुन मिळणारे आर्थीक लाभ व अपघाती मृत्युबाबतची माहिती याप्रमाणे आहे. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे 1 लाख रुपये याप्रमाणे राहील. विमा संरक्षणासाठी समाविष्ठ असलेले अपघात पुढीलप्रमाणे आहेत. रस्ता, रेल्वे अपघात, उंचावरून पडून मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू ,अपघाती विषबाधा, जनावरांच्या हल्ल्यांमुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यु , विजेचा धक्का, विज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचु दंश,खुन, दंगलीमुळे होणारे अपघात इ. समावेश आहे. दंगल इत्यादीमुळे होणाऱ्या अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक लाभ मिळु शकतो. 

दावा करण्यास लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका कृषि अधिकारी पत्र व तारखेसहित (मुळ प्रत), संपुर्ण दावा अर्ज वारसदाराच्या मो. नं सहित भरलेला, वारसदाराचे नॅशनलाईज बॅक खाते पुस्तक (झेरॉक्स) (जनधनचे नको), घोषणापत्र अ घोषनापत्र ब, (अर्जदाराच्या फोटो सहित), वयाचा दाखला (मतदान कार्ड/पॅन कार्ड/ वाहन परवाना/ जन्माचा दाखला/ पासपोर्ट / शाळेचा दाखला ) सांक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडावी. सातबारा, 6 , 6 ड (फेरफार) (मुळ प्रत, मृत्यू प्रमाणपत्र (मुळ प्रत) ,(एफआयआर) प्रथम माहिती अहवाल, अकस्मात मृत्युची खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा),पोस्टमॉर्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल ), वाहन चालविण्याचा वैध परवाना, व्हिसेरा रिपोर्ट, अपंगत्वाचा दाखला व फोटो, दोषरोप पत्र, औषध उपचाराचे कागदपत्र, अपघात नोंदणी 45 दिवासाचे आत करावे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या व्यक्तीस दावा करण्यास लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. ज्या शेतकऱ्याच्या वहिती खातेधारक म्हणून नोंद आहे. त्याचा वारस म्हणुन प्रस्ताव सादर करतो आहे. त्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा, 6 ड (जुना फेरफार), शासन निर्णयानुसार अपघातासंबंधी सर्व लागणारी कागदपत्रे जशीच्या तशी, शिधापत्रिका (राशनकार्ड) वहिती धारक खातेदार शेतकऱ्याशी नाते स्पष्ट करणारी कागदपत्रे (पुरावा). 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा. विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. ली. विभागीय कार्यालय ऑफिस नं. 202 दुसरा मजला, विनर्स कोर्ट झेड के वरती, लुल्ला नगर, सहाने सुजान पार्क पुणे 411040. संर्पक- 020 26832667/ 41212222 Website : www. universalsompo.com. विमा सल्लागार ऑक्झिलियम इंश्युरन्स ब्रोकरेज प्रा.लि.प्लॉट नं/61/4 सेक्टर-28 प्लाझा हटच्या पाठीमागे, वाशी, नवी मुंबई पिन नंबर 400703. नांदेड येथील जिल्हा प्रतिनिधी नांदेड बालाजी अबादार संपर्क क्र. 9970019695 यांच्याशी संपर्क करावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

0000

 

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. 

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा जिल्ह्यातील 69 केंद्रावर येत्या बुधवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये या 69 परीक्षा केंद्रावर नवोदय चाचणी परीक्षा चालू असतांना परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्रापासून 200 मीटर परिसरात प्रवेश करता येणार नाही.  परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते सायं 5 यावेळेत परीक्षा केंद्र परिसरातील 200 मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास, मोबाईल, पेजर वापरण्यास प्रतिबंध केले आहे.

00000

 

पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय राहणार सुरु   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी उशिराने अपॉईंटमेंट मिळत असल्याने प्रतिक्षा कालावधीत वाढ होत आहे. अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन शनिवार 7 व 14 ऑगस्ट रोजी चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. 

हा कालावधी कमी करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्याच्यादृष्टीने तसेच लॉकडाऊन कालावधीतील प्रलंबित पक्क्या अनुज्ञप्ती चाचण्याचे नियमन करण्याकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 7 व 14 ऑगस्ट रोजी सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी ही अपॉईटमेंट उपलब्ध करुन दिली आहे.

0000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...