Tuesday, July 4, 2023

 शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 4 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांच्या अधिनस्त नांदेड, बिलोली, धर्माबाद, भोकर, मुखेडदेगलूर, हदगांव, उमरी, अर्धापूर, नायगांव येथील मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बी.एस.दासरी यांनी केले आहे. 

 

इयत्ता आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी 12 जुलै 2023 पर्यंत संबंधीत वसतिगृहातील गृहपाल यांचेकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत. इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी प्रथम वर्षात व पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडे 31 जुलै 2023 पर्यंत प्रवेश अर्ज भरून सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी, असे समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 


नांदेड (जिमाका) दि. 4 :- नांदेड जिल्ह्यात 13 जुलै 2023 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 जुलै 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

बाल विवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांची सक्षम कार्यवाही आवश्यक*

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 

·         जिल्हा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- बाल विवाह थांबविण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागानी जिल्हा कृती आराखड्यानुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखून कार्यवाही करण्यावर भर दिला पाहिजे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात बाल विवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी देवयानी यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. कागणे, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे,  बाल विवाह निर्मूलन प्रकल्पाचे नंदू जाधव व विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

बाल विवाह थांबविण्यासाठी तालुका व ग्रामीण पातळीवरील यंत्रणाचा सहभाग महत्वाचा आहे. बालविवाह थांबविलेल्या मुलींच्या मनोगतावर आधारीत चित्रफितीची निर्मिती करुन ती लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बाल विवाहामुळे शिक्षण थांबलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.  

बाल विवाह जास्त होण्याचे प्रमाण असलेल्या भागात मोठ्याप्रमाणात जनजागृती आवश्यक आहे. येत्या 15 ऑगस्टला ग्रामसभेत बालविवाह निर्मूलनाबाबत ठराव तसेच ग्रामपंचायत कार्यालयात  बाल विवाह निर्मूलनाबाबत बोर्ड लावावेत अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधित विभागांना दिल्या.  तसेच येत्या काळात याबाबत लवकरच जिल्हास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बालविवाह निर्मुल माहिती पोस्‍टरचे अनावर जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्हा कृती आराखड्यानुसार येत्या दोन महिन्याच्या कालावधीत बाल विवाह निर्मूलनासाठी संबंधित विभागांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत यावेळी माहिती दिली. बाल विवाहाला आळा बसण्यासाठी वेळ प्रसंगी कडक कार्यवाही करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले. बाल विवाह निर्मूलन प्रकल्पाचे नंदू जाधव यांनी बाल विवाह निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

000






  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...