Monday, December 15, 2025

 वृत्त क्रमांक 1300

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 3 हजार 612 प्रकरणे निकाली

 साडेचौदा कोटीची तडजोड

नांदेड दि. 15 डिसेंबर :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तळमजला येथे  13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वा. राष्ट्रीय लोकअदालतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, बारअसोसिएशन  अॅड आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकील अॅड रणजित देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद  देशपांडे तसेच नांदेड येथील सर्व न्यायाधीश उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुनील वेदपाठक  यांच्या हस्ते उत्कृष्ट बाल-साहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार करतांना त्यांच्या साहित्यिक कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद  देशपांडे यांनी तयार केलेली लोकअदालतीविषयीची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड गजानन पिंपरखेडे यांनी कले. 

या लोक न्यायालयात नांदेड जिल्हयातील एकूण 13 हजार 723 प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 911 प्रकरणे निकाली निघाली व जवळपास दहा कोटी 43 लाख रूपयाचे तडजोड मुल्य मिळाले मालमत्ता थकबाकीची, पाणीपट्टीची एकूण 29 हजार 541 प्रकरणे ठेवली होती त्यापैकी 2 हजार 701 प्रकरणे निकाली निघाली व 4 कोटी 65 लाख रूपयांचे तडजोड मुल्य आहे, असे एकूण 3 हजार 612 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मूल्य 14 कोटी 49 लाख 63 हजार 436 रूपये एवढे आहे, लोक न्यायालयासाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार बांधव, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी मानले.

000000

 



राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी तारखा जाहीर


 

वृत्त क्रमांक 1299

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 

गट ड संवर्गातील 86 पदांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

नांदेड दि. 15 डिसेंबर :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या संस्थेमध्ये वर्ग- ४ (गट-ड) संवर्गातील विविध २१ संवर्गांतील एकूण ८६ पदांच्या पदभरती परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन, तांत्रिक तपासणी व सर्व संबंधित निकषांचा विचार करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. सदर अंतिम गुणवत्ता यादी सोमवार १५ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या https://www.drscgmcnanded.in अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित सर्व उमेदवारांनी अंतिम गुणवत्ता यादी या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी व पुढील निवड प्रक्रियेबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख  यांनी केले आहे.

या पदभरतीची २४ एप्रिल २०२५ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीस राज्यभरातून सुमारे 16 हजार 972 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, या पदभरती प्रक्रियेस उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता.

सदर पदभरती प्रक्रियेअंतर्गत पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा दिनांक २५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध अधिकृत परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षा प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निर्भीड व सुरळीतपणे पार पडावी यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व सी.सी.टी.व्ही. जॅमर बसविण्यात आले होते. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली.

या पदभरतीमुळे महाविद्यालय तसेच रुग्णालयातील मनुष्यबळात वाढ होणार असून, दैनंदिन प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम होईल तसेच रुग्णसेवेला अधिक गती, गुणवत्ता व कार्यक्षमता मिळण्यास मोठा फायदा होणार आहे, असेही संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

  वृत्त क्रमांक 1298

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली 

महिला बालविकास विभागाने रोखला बाल विवाह 

नांदेड दि. 15 डिसेंबर :- जिल्ह्यात बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा. जेणे करुन भविष्यातील अनिष्ठ प्रथा रोखता येतील असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शानाखाली सुरु आहे. अर्धापुर तालुक्यात एका 17 वर्षीय बालिकेचा बालविवाह होणार असल्याबाबत गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 ला प्राप्त झाली. ही तक्रार प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे व चाईल्ड हेल्प लाईनचे कर्मचारी ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले यांनी पिडीत मुलीच्या घरी गृहभेट देऊन बालिकेचा आई व नातेवाईकांचे समुपदेशन केले. मुलीच्या वयाबाबत खात्री करुन बालविवाह दुष्परीणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह बेकायदेशीर असल्याचे मुलीच्या पालकाला समजावुन सांगण्यात आले. सदर मुलीला काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बालकल्याण समिती नांदेड यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी पालकांकडून बालविवाह न करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले असुन सदरील बालविवाह रोखण्यात आला आहे. 

0000

 वृत्त क्रमांक 1297

नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार

मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद 

नांदेड दि. 15 डिसेंबर :- जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सुधारित सार्वत्रिक निवडणुक-2025 च्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी व मतमोजणी दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत.  हे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत, अशा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्ट, 1862 चे कलम 5 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन निर्गमीत केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदानाच्या दिवशी व रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिनांकास आदेशात नमुद केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतक्षेत्रात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेशीत केले आहे. 

शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाणाची नावे निरंक आहेत. तर रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार भरणाऱ्या ठिकाण बिलोली, धर्माबाद, मुदखेड, किनवट या नगरपरिषदेचा यात समावेश आहे. देगलूर, हदगाव, नगरपंचायत हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुखेड, उमरी, भोकर, लोहा या नगपरिषद निरंक आहेत. या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरणारे सर्व आठवडी बाजार हे सोमवार 22 डिसेंबर 2025 या रोजी भरविण्यात यावेत. हा आदेश 11 डिसेंबर 2025 रोजी निर्गमीत करण्यात आला आहे.

00000


दि. 15 डिसेंबर, 2025

पत्रकार परिषद निमंत्रण

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्त पत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्हा

 

महोदय, 

मौ. माळेगाव यात्रा ता. लोहा येथील श्री. खंडेरायाची यात्रा दि. 18 डिसेंबर 2025 पासून सुरु होत असून, जिल्हा परिषद, नांदेड व पंचायत समिती, लोहा यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमाच्या प्रसिध्दीसाठी जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची उद्या मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

 तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.   

पत्रकार परिषद दिनांक :-    16.12.2025(मंगळवार)

वेळ                          :-   दुपारी 3.00 वा.

स्थळ                        :- कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड

   

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

            नांदेड

१३ डिसेंबर 2025

  वृत्त क्रमांक 1296

कुस्ती, पशु व कृषी स्पर्धांच्या बक्षिसात भरीव वाढ – आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर

कलावंतांचा सन्मान करण्यात येणार  यात्रेत स्वच्छतेवर भर

नांदेड, १३ डिसेंबर:- दक्षिण भारतातील ग्रामीण भागात भरणाऱ्या मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेचे वैभव अधिक वाढविण्यासाठी यावर्षी कुस्ती, कृषी व पशु स्पर्धांच्या बक्षीस रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.

माळेगाव येथे आज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी नरवटे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, यात्रा सचिव डी.बी. गिरी, अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, गटविकास अधिकारी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यंदा कुस्ती, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्पर्धांसाठी जवळपास ५० लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या फळपिके व मसाला पिक स्पर्धेत गटात प्रथम बक्षीस ७ हजार, द्वितीय ६ हजार, तृतीय ५ हजार  रुपये तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागात लाल कंधारी ब्रिड चॅम्पियन नर व मादी गटासाठी प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये, देवणी नर व मादी गटासाठी प्रत्येकी ७१ हजार रुपये तसेच लाल कंधारी स्पर्धेत नर व मादी गटासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. या विभागासाठी एकूण ११ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे असे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

माळेगाव यात्रा कुस्तीसाठी प्रसिद्ध असून, यंदा कुस्ती स्पर्धेच्या बक्षिसात प्रत्येकी १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तर तृतीय ४१ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. लोकनाट्य मंडळांना प्रत्येकी ७१ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. शंकरपट स्पर्धेत प्रथम ६१ हजार, द्वितीय ५१ हजार, तृतीय ४१ हजार रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. 

यात्रेदरम्यान येणाऱ्या विविध कलावंतांचा सन्मान करण्यात येणार असून, यात्रा प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

माळेगाव यात्रेसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेला २ कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व इतर मंत्र्यांना यात्रेचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी दिली.

यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, वीजपुरवठा व पाणीपुरवठा सुरू असून आमदार निधीतून दोन डीपी, २५ पोल व हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. तलाव फुटल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा व स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना माळेगाव यात्रेचे महत्त्व समजावे यासाठी जिल्हाभरातील शाळांच्या सहली आयोजित करण्याच्या सूचनाही आमदारांनी दिल्या.

चौकट

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी यात्रेच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्यात आले असून तलाव परिसरात सहा जीव रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच सहा फिरती व दहा दुरुस्त केलेली सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव डी.बी. गिरी यांनी केले. या बैठकीला विविध खात्यांचे विभाग प्रमुख, मंदिर समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

००००







दि.१२ डिसेंबर 2025

  वृत्त क्रमांक 1295

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  


नांदेड दि. 12 डिसेंबर : नांदेड जिल्ह्यात 13 डिसेंबर 2025 चे 6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 13 डिसेंबर 2025 चे सकाळी  6 वाजेपासून ते 27 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील.  

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000


जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

नांदेड दि. 12 डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त 10 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा कारागृहात मानवी हक्काबाबत बंद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. व्यंजने, विधी सेवा प्राधिकरणाचे ए.व्ही. सराफ, एच.व्ही.संतान, श्रीमती शितल गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संपत हामु आढे, तुरुंगाधिकारी श्रेणी-२ व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीप कुमार डोंगे, अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वाकरे, महाराष्ट्र राज्य पुणे चे विशेष पोलीस महानिरीक्षक व कारागृह व सुधार सेवा योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

00000




क्रीडा सप्ताहानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

क्रीडा सप्ताहात जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे

नांदेड दि.१२ डिसेंबर :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धांचे वेळापत्रक

12 डिसेंबर 2025

क्रीडा सप्ताह उद्घाटन व बास्केटबॉल स्पर्धा

सांय. 4.30 वा. जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल कोर्ट, नांदेड

संपर्क : श्री. विष्णु शिंदे - 9767047525


13 डिसेंबर 2025

व्हॉलीबॉल स्पर्धा, सकाळी 7.30 वा.

महात्मा फुले हायस्कूल, विजयनगर, नांदेड

श्री. कवुटकर – 9763469298


स्केटिंग स्पर्धा सांय. 4.30 वा.

जिल्हा क्रीडा संकुल, स्केटिंग रिंक, नांदेड

श्री. इम्रान खान – 9975200071


14 डिसेंबर 2025

कराटे स्पर्धा, सांय. 5 वा. पावडे मंगल कार्यालय परिसर, नांदेड

आकाश भोरे – 7841864287

राज्य रस्सीखेच स्पर्धा

14 ते 16 डिसेंबर 2025, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कौठा


15 डिसेंबर 2025

जिम्नॅस्टिक्स स्पर्धा, सांय. 4 वा.

किरण स्पोर्ट्स अकॅडमी, बांधकाम नगर, नांदेड. लक्ष्मण फुलारी – 8888827620


बॅडमिंटन स्पर्धा

सांय. 4 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड

महेश वाखरडकर – 9960052344


16 डिसेंबर 2025

खो-खो स्पर्धा

सकाळी 7 वा. तालुका क्रीडा संकुल, सिडको, नांदेड

राज्य रस्सीखेच स्पर्धा (दुसरा टप्पा)


16 ते 17 डिसेंबर 2025


17 डिसेंबर 2025

रग्बी स्पर्धा

सकाळी 7.30 वा.

मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय, भोकर


बेसबॉल स्पर्धा

सांय. 7 वा. डी. बी. कॉलेज, भोकर

बालाजी गाडेकर – 9921855097


18 डिसेंबर 2025

टेबल टेनिस स्पर्धा

सांय. 5 वा. जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड

हनमंत नरवाडे – 9604866253


क्रिकेट स्पर्धा

सकाळी 8.30 वा.

इंदिरा गांधी मैदान, स्टेडियम परिसर, नांदेड. सुनील यादव – 9420455556


फुटबॉल स्पर्धा

सांय. 5.00 वा. इंदिरा गांधी मैदान, स्टेडियम परिसर, नांदेड

अथर कुरेशी – 8600357361


लॉन टेनिस स्पर्धा

सकाळी 7 वा. नांदेड क्लब, स्नेहनगर

शरद कानडजे – 9158740456


समारोप कार्यक्रम

सांय. 4 वा. (18 डिसेंबर 2025)

वरील वेळापत्रकानुसार  जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी क्रीडा सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक)

००००००

१२ डिसेंबर 2025

   वृत्त क्रमांक 1294

जलतारा चळवळीमध्‍ये मध्ये उत्कृष्‍ट काम केलेल्या अधिकारी,कर्मचारी,संस्‍थाचा कॉफी विथ कलेक्टर उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी यांचे हस्‍ते सन्‍मान  

नांदेड,१२ डिसेंबर:-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून पावसाच्या पाण्‍याचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी जाहीर केले आहे. या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ विविध गावामध्ये करण्‍यात आला आहे. “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या पावसाळी जलसंधारणाच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने संपूर्ण जिल्‍ह्यात हा जिल्‍हा प्रशासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी शक्य तितके शेतात मुरवून भूजलपातळी वाढविणे, जमिनीची धूप कमी करणे, जमिनीची पोत सुधारून उत्पादन क्षमता वाढवून नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी सर्वात जास्‍त जलतारांची कामे करण्यार्‍या अधिकारी/कर्मचारी व सीएसओ प्रतिनिधी यांना प्रत्‍येक पंधरवड्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या सोबत Coffee with Collector कार्यक्रम साठी आमंत्रित करण्यात आले होते.

सर्वप्रथम ज्या अधिकारी/कर्मचारी व सीएसओ प्रतिनिधी यांनी उत्‍कृष्‍ठ कामे केले त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचा सोबत कॉफी घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत

➢ ग्रामपंचायत विभागातून ग्रामरोजगार सेवक धोंडु पाटील व  एस. यु. मोरे, ग्राम पंचायत अधिकारी ग्रा.पं. लालवंडी ता. नायगांव, लिपिक कम संगणक चालक ज्ञानेश्‍वर कयापाक, तांत्रिक सहायक शिवहार कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी उकंडराव पवार, कृषी अधिकारी शिवराम मुंडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्‍वर टाकरस पंचायत समिती किनवट यांनी उत्‍कृष्‍ट काम केल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करण्‍यात आले.

➢ कृषी विभागातून कृषी सहायक श्रीमती यु. आर. कवटीकवार, मंडळ कृषी अधिकारी दशरथ शिंदे, सहायक कृषी अधिकारी गोविंद बामनपल्‍ले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी उत्‍कृष्‍ट काम केल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करण्‍यात आले. 

आज कॉफ़ी विथ कलेक्टर या उपक्रमा अंतर्गत उत्‍कृष्‍ट काम करणारे अधिकारी/कर्मचारी व CSO प्रतिनिधी यांनी कश्या पद्धतीने काम केले, काम करतांना काय अडचणी आल्‍यात व त्या कश्या पद्धतीने सोडवून कामे करण्‍यात आलीत अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.

सदर उपक्रमा अंतर्गत पाणी फाऊंडेशनची टिम ही उपस्थित होती. पाणी फाऊंडेशन चे प्रविण काथवटे यांनी सर्वांना फार्मर कप बाबत माहिती देऊन सादरीकरण केले. त्‍याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र येथील श्रीमती डॉ. माधुरी रेवणवार यांनी शेतीस लागवड खर्च कमी करून उत्‍पादनात वाढ करण्‍यासाठी शेतउपयोगी तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विज्ञान केंद्रामध्‍ये नवनवीन प्रात्‍यक्षीकास भेट देण्‍याबाबत माहिती देउन सादरीकरण केले.

 या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसिलदार जयशंकर इटकापल्‍ले, तालुका कृषि अधिकारी प्रशांत कासराले, नोडल अधिकारी चेतन जाधव, MIS समन्‍वयक रूपेश झंवर, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे Coffee with Collector अमांत्रित अधिकारी/कर्मचारी वसीएसओ प्रतिनिधी, पाणी फाऊंडेशन टिम, संपूर्ण जिल्हा नरेगा टिम कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहून उपक्रमा विषयी आनंद व्‍यक्‍त करून अधिक काम करण्‍याबाबत उत्साह व्यक्त केला.

 ०००००








  वृत्त क्रमांक 1300 राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 3 हजार 612 प्रकरणे निकाली   साडेचौदा कोटीची तडजोड नांदेड दि.   1 5 डिसेंबर :-   महार...