Tuesday, September 12, 2017

"महाराष्ट्र वार्षिकी" संदर्भ ग्रंथ
सर्वांसाठी उपयुक्त ठरेल
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 12 :- शासनाच्या विविध योजना, विभाग, मंत्रीमंडळ निर्णय, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, परंपरा, कलासंस्कृती महत्वाच्या घडामोडी यासारखी महत्वाची माहिती "महाराष्ट्र वार्षिकी 2017" या ग्रंथातून मिळणार आहे. म्हणून हा संदर्भ ग्रंथ सर्वांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज व्यक्त केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रसिद्ध केलेला "महाराष्ट्र वार्षिकी 2017" या ग्रंथाची प्रत जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांनी आज जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना भेट म्हणून दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनाही या ग्रंथाची प्रत देण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले  हे उपस्थित होते.
महाराष्ट्राची ऐतिहासिक व सांख्यिकी माहितीसह जिल्ह्यांच्या माहितीचाही या ग्रंथात समावेश केलेला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला हा संदर्भ ग्रंथ अभ्यासक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व नागरीकांना उपयुक्त ठरणार आहे, असे अशोक शिनगारे यांनी सांगितले.  
या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्राची भुमी आणि लोक, शासनाचे विभाग, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची परंपरा, राज्यातील जिल्हे, गत वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भात महत्वाच्या घडमोडी, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधीमंडळ सदस्य, संसद सदस्य, दृष्टीक्षेपात महाराष्ट्र, आदी महितीचा समावेश आहे. या ग्रंथाची किंमत 300 रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे हा ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध आहे.   
00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...