Saturday, December 21, 2019

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

     नांदेड,दि.21:- शासकीय तंत्रनिकेतन,, नांदेड या संस्थेत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे तर्फे यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या अध्यापकांकरिता दिनांक 16 डिसेंबर ते 20 डिसेबर 2019 दरम्यान एक आठवडयाचा प्रशिक्षण कार्यक्रम सॉलिड मॉडेलिंग व ऍ़डीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग   या विषयावर आयोजित करण्यात आला होता. उद्‌घाटक म्हणून श्री. गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी  व अध्यक्षस्थानी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. गोरक्ष व्ही. गर्जे हे  होते.
औद्योगिक जगतात होणाऱ्या बदलांना यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्ये आत्मसात करणे हे अध्यापकांसाठी अत्यावश्यक आहे, आणि त्यासाठी असे प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त असल्याचे प्रतिपादन डॉ. जोशी यांनी केले तंत्रनिकेतनमधील यंत्र अभियांत्रिकी विभाग सातत्याने असे उपक्रम राबवत असल्यामुळे सदर उपक्रमांचे डॉ. जोशी यांनी कौतुक केले.
सुधारित अभ्यासक्रम परिणामकारकपणे राबविण्यासाठी व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी शिक्षकांनी अद्यावत असणे आवश्यक आहे, नव्हे तर ही काळाची गरज आहे, अशी भूमिका संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष व्ही. गर्जे हयांनी मांडली.
म. रा. तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई  यांच्यातर्फे प्रायोजित या प्रशिक्षणास राज्याच्या विविध भागातून 30 अधिव्याख्यात्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमामध्ये विविध शैक्षणिक व औद्योगिक अस्थापनामधील या विषयांतील तज्ञांची व्याख्याने व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
मुख्य समन्वयक म्हणून विभाग प्रमुख श्री. राजीव सकळकळे व कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. संतोष चौधरी व श्री. सुर्यकांत कुलकर्णी हयांनी जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता श्री. उश्केवार श्री. अन्नमवाड,श्री. चव्हाण, श्री. देशट्टीवार श्री. कदम, कुलमंत्री डॉ. डक व अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. 
0000



मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 21 :- मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी, 2020 या कालावधीत मराठी भाषा सवंर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यतील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालय, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये आदी सर्व संस्थांनी 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करावा. मराठी भाषा विभागाचे शासन परिपत्रक  दि. 3 डिसेंबर, 2019 मध्ये नमूद केल्यानुसार कार्यक्रमाचे आयोजन करुन कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.

00000


सुशासन दिन 25 डिसेंबरला 

नांदेड दि. 21 :- माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर हा  सुशासन दिन  म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी त्या दिवशी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे 
जिल्हा प्रमुख व अधिनस्त कार्यालयांनी या सुशासन दिनाच्या निमित्ताने सेवा प्रशासनास उपयुक्त अशा बाबीसंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. जसे माहितीचा अधिकार प्रशिक्षण. प्रशासनातील उत्कृष्ट संकल्पनांचे सादरीकरण, सेवाविषयक प्रशिक्षण इ., तणाव मुक्ती व्यवस्थापन, सेवा हमी कायद्याची अंमलबजाणी, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
000000 

उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणी 15 जानेवारी , 2020 मुदत
     नांदेड,दि.21:- केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हंगाम 2019-20 मध्ये हमीभावाने उडीद, सोयाबीन खरेदी करण्याकरिता शेतकरी नोंदणीची मुदत दि. 15 डिसेंबर, 2019 वरुन दिनांक 15 जानेवारी , 2020 पर्यंन्त वाढविण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवांनी ऑनलाईन नोंदणी करावी व हमीभाव खरेदी केंद्रावर उडीद, सोयाबीन विक्री करुन हमी भावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
000
शेरुसिंघ उर्फ शेरा पि.दलबिरसिंघ खैरा प्रकरणाशी संबंधीत
कांही साक्ष पुरावे असल्यास 21 जानेवारी रोजी सादर करावेत
--- उपविभागीय अधिकारी, नांदेड
     नांदेड,दि.21:- जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍या आदेशानुसार पो.स्‍टे.अर्धापूर गु.र.नं.287/2019 क.307 भा.द.वि.सह क.3/25, 27(2) भारतीय हत्‍यार कायदा पोलीस अधिकारी यांनी केलेल्‍या  गोळीबारात मयत शेरुसिंघ उर्फ शेरा पि.दलबिरसिंघ खैरा, रा.माळटेकडी नांदेड यांच्‍या मृत्‍युची दंडाधिकारीय चौकशी करणे बाबत उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांना आदेशीत केले आहे.
प्रस्‍तुत प्रकरणात श्री. पांडुरंग दिगांबर भारती, सहा.पोलीस निरीक्षक स्‍थानिक गुन्‍हे शाखा नांदेड व त्‍यांचे सोबत पो.कॉ.तानाजी येळगे ब.नं.1601 पो.कॉ.मोतीराम पवार ब.नं.3160 पो.कॉ.शेख कलीम ब.न.3081 सर्व नेमणुक स्‍थानिक गुन्‍हे शाखा नांदेड असे दिनांक 04.11.2019 रोजी14.30 वाजताचे सुमारास पोलीस स्‍टेशन भाग्‍यनगर नांदेड गु.र.नं.350/2019 क.392,506,34 भादवि सह कलम 3/25 भारतीय हत्‍यार कायदा या गुन्‍हयातील पाहिजे असलेला आरोपी मयत शेरसिंघ उर्फ शेरा पि.दलबिरसिंघ खैरा रा.माळटेकडी नांदेड ता.जि.नांदेड याचा शोध घेत असता मौ.येळेगाव शिवारात अमरसिंघ चुंगीवाले यांचे शेतातील आखाडयात उभ्‍या असलेल्‍या एका पांढ-या रंगाच्‍या  टाटा सफारी गाडीतुन पोलीसांना पाहुन गाडीतुन उतरुन त्‍याने देशी बनावटीची पिस्‍टल हातात घेऊन पो.कॉ.येळगे च्‍या दिशेने पिस्‍टलने एक गोळी फायर केली त्‍याच क्षणी दुसरी गोळी सहा.पोलीस निरीक्षक पांडुरंग दिगांबर भारती यांचेवर फायर करीत असतानाच त्‍यांनी स्‍वतःचे आत्‍मसंरक्षणार्थ व पो.कॉ.तानजी येळगे यांच्‍या प्राण वाचवण्‍यासाठी केलेल्‍या गोळीबारात शेरसिंघ उर्फ शेरा पि.दलबीरसिंघ खैरा हा जखमी झाला होता. सदर आरोपीचे प्राण वाचविण्‍यासाठी त्‍यास तात्‍काळ पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. शासकीय रुग्‍णालय विष्‍णुपूरी नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी यांनी शेरसिंघ उर्फ शेरा पि.दलबिरसिंघ खैरा यास दिनांक 04 डिसेंबर, 2019 ला तपासुन सदर आरोपी मरण पावल्‍याचे घोषीत केले. सदर मृत्‍युचा तपास श्री. अभिजीत फस्‍के, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग नांदेड (शहर) यांचेकडे सोपविण्‍यात आला आहे.
     प्रकरणात मा.जिल्‍हाधिकारी नांदेड  यांचे आदेश क्र.2019/आरबी-1-डेस्‍क-2-टे-(4)दं.चौकशी-प्र.क्र.54 दिनांक 21 नोव्‍हेंबर 2019 अन्‍वये पो.स्‍टे.अर्धापूर हद्दीत शेरसिंघ उर्फ शेरा पि.दलबिरसिंघ खैरा रा.माळटेकडी नांदेड यांच्‍या मृत्‍युच्‍या घटनेची दंडाधिकारीय चौकशी करणेसाठी उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांना आदेशीत केले आहे.
ज्‍या कोणास वर नमुद केलेल्‍या प्रकरणाशी संबंधी काही सांगावयाचे असल्‍यास किंवा साक्ष पुरावे नोंदवावयाचे असल्‍यास त्‍यांनी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड यांचे कार्यालयात त्‍यांचे समक्ष दिनांक 21 जानेवारी, 2020 रोजी दुपारी 04 वा.आपले म्‍हणने मांडावे व साक्ष पुरावे सादर करावेत.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...