Thursday, June 7, 2018


तंबाखू दुष्परिणामाबाबत जनजागृती
रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद  
नांदेड, दि. 7 :- तंबाखूमुळे समाजातील मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाच्यावतीने रॅली काढण्यात आली.
जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी पाळला जातो. जिल्हात 31 मे ते 6 जून 2018 या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तंबाखू विरोधी दिवस व सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून रॅलीत शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. एच. के. साखरे, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. अर्चना तिवारी, जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. प्रदीप बोरसे तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.   
000000


विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या
वाहनांनी तपासणी करुन घ्यावी
- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना
        नांदेड,दि. 7 :- शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयामार्फत वाहनाची तपासणी करुन घ्यावी. तपासणी न केलेल्या वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी राहणार नाही. याची वाहनधारक व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे. समितीची बैठक श्री. मीना यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. 
शालेय मुलांची वाहतुकीसाठी नोंद झालेली स्कूल बस वाहने हे स्कूल बस नियमावलीतील सुरक्षाविषयक तरतुदीचे पालन करतात किंवा नाही याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनाचा क्रमांक, वाहन धारकाचे नाव, त्यांचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक आदी माहितीची नोंद ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 
00000


 दहावी परीक्षेचा निकाल
आज ऑनलाईन जाहीर होणार  
        नांदेड,दि. 7 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मंडळामार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार शुक्रवार 8 जून 2018 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  
इयत्ता दहावी मार्च 2018 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावरुन उपलब्ध होईल व माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईल फोनवरुन Bsnl 57766 या MHSSC<space><seatno>and send to Short 57766 मोबाईल ऑपरेटरद्वारे उपलब्ध होतील. तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येईल. यासंदर्भात आवश्यकता असल्यास माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह शनिवार 9 जून ते सोमवार 18 जून 2018 पर्यंत विहीत शुल्क भरुन अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी शनिवार 9 जून ते गुरुवार 28 जून 2018 पर्यंन्त विहीत शुल्क भरुन अर्ज करता येईल.
मार्च 2018 परीक्षेमधील उत्तर पत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहीत नमुन्यात, विहीत शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेतंर्गत पुन:श्च परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार मार्च, 2018 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ठ होवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये म्हणजेच जुलै-ऑगस्ट 2018 व मार्च 2019 अशा दोनच संधी उपलब्ध राहतील, असे पुणे राज्य मंडळ प्र.सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000000


विजा चमकतांना झाडाखाली थांबू नका   
मुसळधार पाऊस / अतिवृष्टीची इशारा
नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
नांदेड, दि. 7 :-  भारतीय हवामान खात्याने राज्यात 6 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल असून 7 ते 11 जून या कालवधीत राज्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी या कालावधीत सावधगिरी बाळगावी व विजा चमकतांना झाडाखाली थांबू नका, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शेतात काम करणाऱ्या व्यक्तींनी व नागरिकांनी विजा चमकत असतांना झाडाझाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन काळजी घ्यावी. स्थानीक प्रशासनास सतर्क राहण्याचे व वेळोवेळी कुठल्याही प्रकारची गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयांना विनाविलंब कळविण्याचा सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. याबाबत दूरध्वनी क्र 02462-235077, फॅक्स क्र. 238500, निशुल्क क्रमांक 1077 वर संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.
00000




राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे 
अध्यक्ष अरुण देशपांडे यांचा दौरा
नांदेड,दि. 7 :- राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण वसंतराव देशपांडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 10 जून 2018 रोजी पुणे येथून पुणे-नांदेड एक्सप्रेसने सकाळी 6 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण व मुक्काम. सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या ग्राहक कार्यकर्ता वर्गास उपस्थिती.
सोमवार 11 जून 2018  रोजी सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे अन्न आयोगाची बैठक. सकाळी 11.15 ते 3.30 वाजेपर्यंत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व सक्षम अधिकारी व सर्व अशासकीय सदस्य, नांदेड जिल्ह्यातील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व तालुकास्तरीय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, वैध मापन शास्त्र अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद, कृषी, शिक्षण व आरोग्य खात्याचे अधिकारी, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष यांचे खाजगी सचिव यांचेसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक व चर्चा. सायंकाळी 4 ते 4.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद. सायं 5 ते  रात्री 8.30 वाजेपर्यंत ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह येथे बैठक व चर्चा. रात्री 10 वा. नांदेड येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
0000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...