महत्वाचे वृत्त क्रमांक 406
जागतिक वारसा दिनाच्या पर्वावर चालुक्यकालीन येरगी व होट्टल येथे कार्यक्रम
हेरिटेज वॉक आणि भारत नाट्यमचे सादरीकरण
नांदेड दि.१८ एप्रिल : मागे दगडात कोरलेल्या चालुक्य शिल्पशैलीच्या विविधांगी रेखीव कलाकृती आणि त्यापुढे भरतनाट्यमशैलीत हेरिटेज वॉक, अशा आयोजनात आज जागतिक वारसा दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्वोत्तम प्राचीन कलाकृती असणाऱ्या येरगी येथे विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.आपल्या वारसाबद्दलच्या या जनजागृती कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पूरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय नांदेड विभाग, ग्रामपंचायत कार्यालय येरगी, तालुका देगलूर तसेच जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा दिनाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज सकाळी सहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या दीप्ती शंकरराव उबाळे यांच्या मार्गदर्शनातील भरतनाट्यम चमूने प्रथम येरगी ग्राम व नंतर होट्टल येथील या जगप्रसिद्ध वारशापुढे आपले अप्रतिम सादरीकरण केले.
या ठिकाणच्या सर्व मंदिराच्या परिसरात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्रांमध्ये आवड असणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हेरिटेज वॉक घेण्यात आला.येरगी गावामध्ये प्रभात फेरीसारखे या हेरिटेज वॉकचे स्वागत झाले. अनेक क्षेत्रातील मान्यवर यावेळी सहभागी झाले होते. यावेळी महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.पुरातत्त्व विभागाचे समन्वयक कामाजी डक, पुरातत्त्व विषय तज्ञ सुरेश जोंधळे,वास्तुविशारद कासार पाटील,नायब तहसीलदार मकरंद दिवाकर,कलाशिक्षक गजानन सुरकुटवार व नंदगिरीचे किल्लेदार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
होट्ट्लचे वैशीष्टय
चालुक्य शिल्पशैलीचा अप्रतिम अविष्कार म्हणजे होट्टल. चालुक्य शिल्पशैलीचा वारसा देगलूर तालुक्यातील होट्टल या चालुक्य नगरीने जोपासलेला आढळतो. इसवीसणाच्या अकराव्या शतकात कल्याणीच्या चालुक्यांचा प्रभाव नांदेड परिसरावर होता. तेव्हाची पोट्टलनगरी म्हणजे आजचे होट्टल हे गाव.त्यांच्या राज्यातले महत्त्वाचे ठाणे.
या ठिकाणी अकराव्या, बाराव्या व तेराव्या शतकातले चार शिलालेख सापडले आहेत. त्या काळातला अप्रतिम कलाविष्कार पाहायचा तो इथल्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवरील कलादालनातून. सिद्धेश्वर मंदिर गावच्या पश्चिमेला असून मंदिराची रचना ताराकृती आहे. समोर मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूस अर्ध मंडप आहे. मधोमध कलात्मक सभा मंडप आहे. येथील नदी मंडपात असलेल्या शिलालेखावरून या मंदिराची प्राचीन रचना लक्षात येते. हा शिलालेख सहाव्या विक्रमादित्याच्या काळातील आहे. शिलालेखाच्या माध्यमातून त्या काळातील ऐतिहासिक संदर्भ कळतात.
दगडात कोरलेल्या शिल्पातून ज्यांना कविता सुचवू शकतात. अशा अभ्यासू पर्यटकांना, लिपीच्या अभ्यासकांना हजार आठशे वर्षांपूर्वीचे संस्कृत भाषेतले कन्नड व मराठी लिपीत कोरले गेलेले अनेक शिलालेख या परिसरात आपल्याकडे खेचून नेतात. चालुक्य काळातील सर्वात मोठे हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन, नांदेड मध्ये झाले आहे. येरगी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ,येरगी चालुक्यकालीन सांस्कृतिक झरा, या कॉफीटेबल बुकची निर्मिती केली. अशा प्रकारे वारसा जपणारी येरगी ही भारतातील पहल करणारी पहिली ग्रामपंचायत आहे.नांदेड जिल्ह्यात चालुक्यकालीन 40 शिलालेख आहेत. एकूण शिलालेखन पैकी चार शिलालेख येरगी येथे पाहायला मिळतात.
0000