Saturday, July 11, 2020


वृत्त क्र. 637   
जास्त व्यक्तींची वाहतूक करणाऱ्या
वाहनधारकांना 76 हजार 800 रुपयाचा दंड   
नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात 8 ते 10 जुलै दरम्यान वाहतकीमध्ये परवानगी पेक्षा जास्त व्यक्तीची वाहतूक करणाऱ्या 248 वाहनधारकांकडून 76 हजार 800 रुपयांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तपासणी मोहिमेतील दोन पथकामार्फत वसूल करण्यात आला आहे.   
कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशाची जिल्हाभर कडक व काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. तसेच दोषींविरुद्ध तात्काळ कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्‍क परिधान न केल्यास व  सामाजिक अंतराचे पालन न केल्यास दंड ठोठावला जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत दिलेल्या सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे. जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, कुठल्याही प्रकारची शंका, भिती मनात न बाळगता सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000



 वृत्त क्र. 636   
कोरोनातून 3 व्यक्ती बरे तर 11 बाधित
33 वर्षाची महिला व 28 वर्षातील पुरुषाचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 11 :- कोरोनाचे जिल्ह्यातील 3 बाधित व्यक्ती आज बरे झाले असून नवीन 11 बाधित व्यक्तींची वाढ झाली आहे. आज भोकर तालुक्यातील तेलीगल्ली गांधी चौक येथील 33 वर्षाची 1 बाधित महिला व नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथील 28 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. या बाधितास उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास आणि मधुमेह इत्यादी आजार होते.
शनिवार 11 जुलै रोजी प्राप्त झालेल्या एकुण 104 अहवालापैकी 79 निगेटिव्ह तर 11 व्यक्ती बाधित आढळल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या एकुण 569 एवढी झाली आहे. आतापर्यंत 361 व्यक्ती बरे झाले असल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयात एकुण 181 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण 27 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
शनिवार 11 जुलै रोजी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 2 बाधित असे एकुण 3 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील 64 वर्षाचा 1 पुरुष, वाल्मिकीनगर येथील 44 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड बळीरामपूर दुधडेअरी येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, नांदेड टायरबोल्ड येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, भोकर येथील 33 वर्षाची 1 महिला, मुदखेड बाझार मोहल्ला येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, मुदखेड नगरपालिका परिसर येथील 45 व 30 वर्षाच्या 2 महिला, बिलोली तालुक्यातील नागणी येथील 30 वर्षाचा 1 पुरुष, कुंडलवाडी येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, देगलूर तालुक्यातील भायेगाव येथील 36 वर्षाचा एका पुरुषाचा यात समावेश आहे. या 11 बाधित व्यक्तींचा अहवाल शुक्रवार 10 जुलै रोजी उशिरा प्राप्त झाला आहे.
आज 181 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची त्यात 9 महिला आणि 7 पुरुष बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
औषधोपचार सुरु असलेल्या 181 बाधित व्यक्तींना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 58, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 54, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 25, नायगाव  कोविड केअर सेंटर येथे 7, जिल्हा रुग्णालय येथे 7, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 8, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 9 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 8 बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 11 जुलै रोजी 340 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 671,
घेतलेले स्वॅब- 8 हजार 38,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 576,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 11,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 569,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 3,
मृत्यू संख्या- 27,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 361,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 181,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या 340 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 635  
पिक कापणी प्रयोगासाठी
मोबाईल ॲपचा वापर महत्वाचा  
-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी चलवदे
नांदेड दि. 11 (जिमाका) :- पिक कापणी प्रयोगासाठी मोबाईल ॲपचा वापर करुन गावपातळीवरील पिक कापणी समितीचा सहभाग महत्वाचा आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी केले.
जिल्हयातील महसुल, जिल्हा परिषद, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषि विभागामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली पिक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण दोन सत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रक्षिणास कृषि विकास अधिकारी एस. बी. नादरे, तहसीलदार सौ. पागंरकर, तंत्र अधिकारी पी. ए. गायके यांच्या उपस्थितीत जिल्हातील प्रांत अधिकारी, निवासी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि अधिकारी (ता.कृ.अ), कृषि पर्यवेक्षक (सांख्यिकी ), कृषि अधिकारी (पं. स.) कृषि विस्तार अधिकारी (जि.प.) यांची उपस्थिती होती.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी प्रशिक्षणार्थींना पिक कापणी प्रयोगाबाबत सविस्तर माहिती दिली.  पिक कापणी प्रयोगाद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीचे महत्व यावेळी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जास्त होत असल्याने हे प्रशिक्षण तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  
00000


वृत्त क्र. 634  
जिल्ह्यात संचारबंदीच्या अनुषंगाने
सुधारीत व अतिरिक्त निर्देश निर्गमीत  
नांदेड दि. 11 (जिमाका) :- कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्री पासून ते 20 जुलै 2020 च्या मध्यरात्री पर्यंत जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हाभर संचारबंदी लागू केली आहे. निर्गमीत 10 जुलै रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने यात अतिरिक्त निर्देशाचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केला आहे.
या बाबींना सकाळी 7.00 ते 10.00 या कालावधीतच परवानगी
आठवडी बाजार व भाजीपाला / फळ मार्केट बंद राहतील. भाजीपाला व फळे विक्री करणारे विक्रेते यांना एका ठिकाणी न थांबता हातगाडीवर गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सुरक्षा नियमाचे पालन करीत घरपोच विक्री करता येईल. दुध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दुध विक्री करता येणार नाही. त्यांना गल्ली, कॉलोनी, सोसायटीमध्ये जाऊन घरपोच विक्री करता येईल. जार वॉटर सप्लायर्स यांना सामाजिक अंतराचे पालन करत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. घरगुती गॅस घरपोच सेवा देण्यात यावी. त्याकरिता गॅस वितरक कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असेल. या बाबींना सकाळी फक्त 7.00 ते 10.00 या कालावधीतच मुभा राहील.
ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध
नांदेड जिल्ह्यातील सर्व बँकेचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज बँकेत उपस्थित राहून करु शकतील. त्याव्यतिरिक्त बँकेत शासकिय कार्यालयाचे बँकेशी निगडीत शासकिय व्यवहार चालू राहतील परंतू इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध केला आहे.
याचबरोबर मान्सुन संबंधित कामे पुर्ण करण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून उक्त कामे चालू ठेवण्यास मुभा राहिल. कोणतेही खाजगी दुचाकी, तिनचाकी, चारचाकी व इतर वाहनाद्वारे व्यक्तींना प्रवासास बंदी राहिल. परंतू अत्यावश्यक वैद्यकिय कारणासाठी तसेच परवानगी प्राप्त असलेल्या राज्याअंतर्गत, अंतरराज्य प्रवासाच्या वाहतुकीस मुभा राहिल. सदर अतिरिक्त व सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...