Wednesday, August 9, 2017

शासकीय वसतीगृहातील  
प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ
नांदेड दि. 9 :-  शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज वसतीगृहातील गृहपालाकडे सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.   
अर्ज करण्याची मुदतवाढ पुढील प्रमाणे राहील. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रविवार 20 ऑगस्ट 2017 पर्यंत. बारावी नंतरच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका अभ्यासक्रमातील प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी गुरुवार 24 ऑगस्टपर्यंत तर व्यावसायीक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सोमवार 28 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत. प्रवेश हे गुणवत्ता व आरक्षणावर आधारीत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता आदी सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. अधिक माहितीसाठी संबंधीत शासकीय वसतीगृहातील गृहपालांकडे संपर्क करावा, असेही आवाहन केले आहे.

000000
विद्यार्थ्यांनी तंबाखू पदार्थांपासून दूर रहावे
- डॉ. गुंटूरकर
नांदेड दि. 9 :-  निकोटीनयुक्त तंबाखू हे मानवी आरोग्यास  घातक असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून  निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटुरकर यांनी केले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत महाविद्यालयाजागतिक मौखिक, डोके, मान व चेहरा कर्करोग दिन व सप्ताहच्या अनुषंगाने कर्करोग विषयी जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. त्यावेळी डॉ. गुंटुरकर बोलत होते.  
जिल्हा कार्यक्रम अधिकारी  डॉ. दीपक हजारी व दंत शल्यचिकित्सक डॉ. किरण घोडजकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना चित्रफितीच्या माध्यमातून तंबाखू व तंबाखुजन्य सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाबद्दल  मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्याच्या विविध शंकांचे निरसन  करण्यात आले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव, एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. बोकडे, कार्यक्रमधिकारी संगीता घुगे, जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक सुवर्णकार, प्रकाश आहेर व सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

000000
वाचन संस्कृती संवर्धनासाठी
"शाळा दत्तक योजना" स्तुत्य उपक्रम
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 9 :- मानवी जीवनात वाचनाचे महत्व मोठे असून  समृध्द परिपूर्ण जीवनासाठी वाचना शिवाय उपाय नाही. भविष्यातील उत्तम नागरिक घडविण्यासाठी शालेय मुलांना वाचनाची गोडी लावणे आवश्यक आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयातील सार्वजनिक वाचनालयांनी सुरु केलेला "शाळा दत्तक योजना" हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात  "शाळा दत्तक योजने" च्या द्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटने, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळांबरोबर वाचन, लिखाण व शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात वाचन संस्कृतीची चळवळ निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे. शाळेकडून हा उपक्रम चांगला राबविला जाईल यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालकांचा सहभाग आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये चित्ररुपी पुस्तकांद्वारे वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन वाचनालयांनी शाळांनी ही योजना अविरतपणे चालू ठेवावी. जेणेकरुन मुलांना ग्रंथ ग्रथांना वाचक मिळणे सोपे जाऊन यातून एका निकोप समाजाची निर्मिती होईल. वेगवेगळ्या संकल्पनेतून प्रत्येकांनी वाचनाचे महत्व जपले पाहिजे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वाचनालय हे मोठे स्थान आहे. पालकांच्या वाचनातून मुलांमध्येही वाचनाची आवड निर्माण होते. ग्रंथालय, शाळांनी विद्यार्थ्यांकडून वाचनाबरोबर लिखाण करुन घ्यावे. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांचाही सहभाग घ्यावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रास्ताविकात सहाय्यक ग्रंथालय संचालक श्री. गाडेकर म्हणाले की,  मराठवाड्यात हा पहिला उपक्रम नांदेड जिल्ह्यातून सुरु करण्यात येत आहे. वाचकांपर्यंत माहिती, ज्ञान देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शाळा, ग्रंथालयातून पुस्तकांची देवाण-घेवाण केली जावी. सर्वांच्या सहकार्यातून नांदेड जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सावंत यांनी शालेय मुलांना वाचनाकडे वळवून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विभिन्न उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनीही वाचन करण्याची गरज असल्याचे सांगितले. ॲड. गंगाधर पटने यांनी वाचन चळवळीला सहकार्य र्णपणे लाभणे आवश्यक आहे. वाचनालयांनी विविध वाचकोपयोगी उपक्रम राबवून लोकाभिमूख होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. निर्मलकुमार सुर्यवंशी बसवराज कडगे यांचीही याप्रसंगी समायोचित भाषणे झाली.
सुरुवातील ग्रंथालयशास्त्राचे जनक द्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमेला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचन संस्कृती जोपासणारे बसवराज कडगे यांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सत्कार केला. सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल हुसे यांनी तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, संगत प्रकाशनचे जयप्रकाश सुरनर, संजय पाटील, गजानन कळके, उमेश जाधव हाळीकर, सुभाष पुरमवार, दशरथ सुकणे, कपाटे महाराज, शिवाजी सुर्यवंशी, सुभाष पाटील, बालाजी नारलावार, कुबेर राठोड, यशवंत राजगोरे, बालाजी पाटील, उध्दव रामतीर्थकर, ज्योतीराम राठोड नवनाथ कदम आदीसह जिल्हयातील वाचनालयाचे शाळेचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कर्वे, अजय वट्टमवार, कोंडिबा गाडेवाड, आरती कोकुलवार, बाळू पावडे, रघुवीर श्रीरामवार, सोपान यनगुलवाड आदीने सहकार्य केले.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...