Tuesday, January 14, 2025

 वृत्त क्रमांक 52

बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय


माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल तिकीट उपलब्ध करण्याचे निर्देश

नांदेड दि. 14 जानेवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश मंडळाने दिले आहे.

शाळेत हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावर शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी देण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे . हॉल तिकीट अर्थात प्रवेश पत्र उपलब्ध करून देताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक प्राचार्य यांचा शिक्का उमटून स्वाक्षरी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
हॉल तिकीट संदर्भातील सर्व सूचना मुख्याध्यापक प्राचार्य यांना करण्यात आल्या असून यासंदर्भात कोणतीही अडचण असल्यास शाळेतून दूर करण्याबाबत मंडळांनी स्पष्ट केले आहे . हॉल तिकीट मध्ये काही दुरुस्ती हवी असल्यास ती देखील करण्याची व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. ऐनवेळी प्रवेश पत्र गहाळ झाल्यास डुप्लिकेट प्रवेश पत्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येणार आहे. 10 जानेवारी पासून प्रवेश पत्र लिंक द्वारे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
मोठ्या महानगरामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी परीक्षेच्या एक दिवस आधीच आपल्या सेंटरची माहिती करून घ्यावी. त्यामुळे दुसऱ्या दिवशी धावपळ होणार नाही. तसेच परीक्षेच्या दिवशी घरून निघणे ते सेंटर पोहोचणे याचे योग्य नियोजन करावे. किमान तासभर आधी सेंटरवर पोहोचण्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
0000

वृत्त क्रमांक 51

15 जानेवारी ऑलिपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा

आज जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार
नांदेड दि. 14 जानेवारी :- महाराष्ट्रात महान खेळाडू व स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिंम्पीक पदक विजेते खाशाबा जाधव यांचे क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदान विचारात घेता व त्यांच्या स्मृतीना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी 2025 हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी 4 वाजता पिपल्स कॉलेज मैदान, जिल्हा क्रीडा संकुल नांदेड व जिल्ह्यातील विविध शाळा येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरीची दखल घेवून जिल्ह्यातील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील खेळाडूं, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना करणे आणि जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्हृयात दरवर्षी 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह तसेच महान क्रीडापटू दिवंगत मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेचे 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर सन 1952 मध्ये हेलसिंकी, फिनलंड येथील ऑलिंपिंक स्पर्धेत स्वंतत्र भारताचे पहिले वैयक्तीक ऑलिपिंक पदक कास्य पदक जिंकणाऱ्या महान कुस्तीपटू दिवंगत खाशाबा जाधव यांच्या राज्यासोबतच देशाचा गौरव वाढविणाऱ्या कामगिरीस सातत्याने उजाळा मिळावा तसेच त्यातून राज्याच्या विद्यमान व नवीन खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांचा जन्मदिन राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी शासनाकडे होत होती. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री यांनी ऑलिंपिंकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
00000

 वृत्त क्रमांक 50

राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडास्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराची सांगता व राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेची जय्यत तयारी
नांदेड दि. 14 जानेवारी :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व नांदेड जिल्हा हौसी बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 9 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे संपन्न झाले आहे.
या खेळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी,2025 या कालावधीत नांदेड येथे संपन्न होणार असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभाग होणार आहे. या संघाची जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली आहे. यासाठी क्रीडा मार्गदर्शक मुले संघासाठी ज्ञानेश काळे (सातारा) व मुली संघकरीता आनंदा कांबळे (नांदेड) हे आहेत तर संघव्यवस्थापक म्हणुन डॉ. राहुल श्रीरामवार व श्रीमती शिवकांता देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या संघात पुढील प्रमाणे खेळाडूंचा समावेश असून यामध्ये 19 वर्षे मुले- शुभम धोत्रे (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (परभणी), निखील माने (पुणे), शिवराज शिंदे (पुणे), अदित्य गवळी (जळगांव), प्रज्वल पाटील (कोल्हापूर), दक्षरामटेके (यवतमाळ), सार्थकगावडे (मुंबई), तौफिकशाहू (अमरावती), रणवीरजाधव (पुणे), युवराजमांडकर, विशालजारवाल (छ.सं.नगर), सक्षमपवार (सातारा), आदित्य चव्हाण (नांदेड), संस्कार संकपाळ (सांगली), उदयरेटवडे (पुणे) तर 19 वर्षे मुलीच्या संघात – दुर्वा भोंगळे (पुणे), रत्नमाला चौर (बीड), संस्कृती कुंभार (सांगली), अक्षदा महाजन (जळगांव), पंकजा चौर (बीड), सानिका नलवडे (पुणे), मानसी पाटील (जळगांव), स्मृती सांगळे (पुणे), रोहीणी नवटक्के (लातूर), अनिशा देवकर (पुणे), अमृता शिंदे (जालना), अनुष्का पुल्लरवार (नागपूर), श्रृध्दा गावडे (पुणे), श्रध्दा कांबळे (पुणे), तन्वी फलफले (पुणे), राणी जाधव (नांदेड) या खेळाडूंचा समावेश आहे.

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन 15 जानेवारी या राज्य क्रीडा दिनाचे औचीत्य साधुन राष्ट्रीय शालेय बेसबॉल (19 वर्षेमुले-मुली) क्रीडास्पर्धा सन 2024-25 चे आयोजन 14 ते 18 जानेवारी,2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज व सायन्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारत देशातील विविध राज्यातून जवळपास 700 ते 750 खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक, पंच, सामनाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आयोजन समिती, राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा अभिजीत राऊत यांचे अध्यक्षतेखाली विविध समिती गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्पर्धा आयोजन- नियोजन समिती, खेळाडू स्वागत समिती, निवास व भोजन समिती, मैदान, तांत्रीक, वाहतूक, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त, स्थानिक पर्यटन, सांस्कृतीक कार्य समिती, स्वच्छता व इतर समिती गठीत करण्यात आली असून स्पर्धेची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेचा उदघाटन 15 जानेवारी,2025 रोजी सकाळी 10 वा. पिपल्स कॉलेज नांदेड येथे बाबा बलविंदरसिंघजी, व राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांचे हस्ते होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र व नांदेडकरांसाठी एक मेजवानीच राहणार आहे. तरी या स्पर्धेकरीता जिल्हयातील जास्तीत-जास्त खेळाडू व क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
00000




 वृत्त क्रमांक 49

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 जानेवारी :- मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो.
त्यानुसार मराठी भाषा विभागाने यावर्षी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तसेच त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा करणे अनिवार्य आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने दिनांक 14 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कार्यक्रमांचे आयोजन करावे. राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये / सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. या पंधरवडयात केलेल्या कार्यक्रमांचे अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.
0000

  वृत्त क्रमांक 48

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदानासाठी मुख्याध्यापकांना महाडिबीटी द्वारे अर्ज भरण्याचे आवाहन 

नांदेड दि. 14 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यातील सामान्य शाळेत इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळणेसाठीचे अर्ज मुख्याध्यापकांनी महाडिबीटी प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. 

शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत पूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडिबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करुन आलेली आहे. यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये सामान्य शाळेतील इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. यासाठी शाळास्तर मुख्याध्यापकांनी युजर आयडी-pre_school Udise no_ principal पासवर्ड- pass@123  याप्रमाणे दिला आहे.

00000

  वृत्त क्रमांक 47

नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईलमध्ये रोजगाराच्या संधी 

• इच्छुकांनी संकेतस्थळावर नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन

                                                                                                                                                                          नांदेड दि. 14 जानेवारी :-  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नांदेड जिल्ह्यातील उमेदवारांना इस्त्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.                                        

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या 25 ते 45 वर्षे वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवाराकडे (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजीओ थेरपी, नर्स असीस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बी.एस्सी नर्सींग, पोस्ट बी.एस्ससी नर्सींगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. 

नांदेड जिल्ह्यातील इस्त्राईलला नोकरीसाठी जाणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे 

00000

  वृत्त क्रमांक 52 बारावीच्या मुलांसाठी यावर्षी हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध ; शिक्षण मंडळाचा निर्णय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून हॉल ति...