संभाव्य आपत्तीच्या काळात यंत्रणांनी,
समन्वय, सतर्कता, तत्परतेने प्रयत्न करावेत
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
नांदेड, दि. 12 :-- आपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी एकत्रित व वेळेत
प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी
अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी दिले.
मान्सून 2020 च्या अनुषंगाने पुर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय
परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन
खल्लाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांच्यासह परिवहन, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महानगरपालिका, पोलीस, आरोग्य, कृषि, महसूल विभाग उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन आदी विभागाचे अधिकारी
उपस्थित होते.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या
उपाययोजनांचा सादरीकरणाद्वारे आढावा संबंधीत विभागाकडून घेऊन जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर पुढे म्हणाले की, पाझर तलाव, नद्या आणि पाण्याच्या साठवणुकीचे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पावसाळयात फुटु नये अथवा ओव्हरफ्लो होऊन गावांना धोका
होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या
रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी आणि ब्लिचिंग
पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा. महानगरपालिका, नगरपरिषदांनी नालेसफाई तसेच अतिक्रमण दूर करावेत. सर्व प्रमुख यंत्रणांनी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा
धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय
समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक येत्या
आठवड्यात आयोजित करुन पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी पूर्ण करावीत.
स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. शासन निर्णयाप्रमाणे
आपतग्रस्तांना योग्य मदत झाली पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या विजपातामुळे होणारे मृत्यू
कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावे. सर्व
यंत्रणांनी समन्वय ठेवावा. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिले. नगरपालिका
प्रशासनाने नाली साफसफाईचे कामकाज युध्द पातळीवर करावेत.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाबाबत व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच
संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाय योजनांची
माहिती दिली.
00000