Friday, February 14, 2025


 

 #मॅट्रिकपूर्वशिष्यवृत्तीयोजना





मराठीतून विचार, मराठीतून व्यवहार ! शिक्षण, व्यवसाय आणि प्रशासनात मराठीला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या ! अभिजात भाषा म्हणून जबाबदारी वाढलीय ! 🏆 #उत्सवअभिजातमराठीचा #मराठीअभिमान






मराठीतून विचार, मराठीतून व्यवहार ! शिक्षण, व्यवसाय आणि प्रशासनात मराठीला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या! अभिजात भाषा म्हणून जबाबदारी वाढलीय ! 🏆 #उत्सवअभिजातमराठीचा #मराठीअभिमान

🔥🎊 #मराठी साहित्य संमेलन – एक ऐतिहासिक पर्व! पुस्तकांचे प्रदर्शन, चर्चासत्रे, विचारमंथन आणि कवी संमेलन – २१-२३ फेब्रुवारी, दिल्लीमध्ये मराठीच्या वैभवाचा सोहळा! 🏆🚀 #उत्सवअभिजातमराठीचा #नांदेड #मराठीभाषा









 

वृत्त क्रमांक 182

नांदेड, यवतमाळसह पाच विमानतळांचे लवकरच हस्तांतरण ; जिल्हास्तरावर उद्योग भवन उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत 

नांदेड दि. १४ फेब्रुवारी : नांदेड येथील विमान सेवा आणखी तत्पर व सुकर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मुंबई विमानतळावरची वाढती गर्दी लक्षात घेता. पार्किंग समस्या ही सोडविणे शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे नांदेड, यवतमाळ सह पाच विमानतळाचे लवकरच शासन खाजगी कंपनीकडून स्वतःकडे हस्तांतरण करणार आहे,अशी माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत हे शुक्रवारी नांदेड व परभणीच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी उद्योग भवनात विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी नांदेड विमानतळ व तेथील सुविधांबद्दल विस्तृत चर्चा केली.नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयी-सुविधांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती विमानतळ लवकरच खासगी कंपनीकडून काढून घेतले जाणार आहेत. खाजगी कंपन्यांना देण्यात आलेल्या नोटीसांचा कालावधी देखील पूर्ण होत आला आहे. लवकरच एमआयडीसीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नांदेडसह लातूर, यवतमाळ, सोलापूर आणि अमरावती हे विमानतळ कंपनीकडून काढून घेण्याबाबत त्यांना नोटीस दिल्या आहेत. त्या नोटीसांचा कालावधीदेखील संपुष्टात आला असून, लवकरच सदर विमानतळ हे एमआयडीसीकडे हस्तांतरित केले जातील. त्यानंतर तिथे नाईट लँडिंगसह अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नियमित देखभाल, दुरुस्तीसह उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना प्रस्तावित आहेत. यामध्ये प्रामुख्याने चार्टर विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

दावोसच्या जागतिक परिषदेला त्यांनी यशस्वी परिषद संबोधले. जवळपास पंधरा हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहेत. त्यातून नांदेडमध्ये एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्योगांना चालना देण्यासाठी सर्व जिल्ह्यांत उद्योग भवन उभारणार असून, औद्योगिक वसाहतीमध्ये पाणी, रस्ते, पथदिवे अशा भौतिक सुविधा देण्यासाठी प्राधान्य देत आहोत. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही. नांदेडसाठी ३८ कोटी, परभणीसाठी २९ कोटी तर हिंगोली जिल्ह्याला १६ कोटी रुपये दिले आहेत.

तालुकास्तरावर एमआयडीसीला प्राधान्य

उद्योग, व्यवसायाला चालना मिळावी यासाठी तालुकास्तरावर एमआयडीसी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या धोरणानूसार मारतळा, बिलोली, मुखेड, धर्माबाद येथील एमआयडीसी तर वसमत येथे ड्राय पोर्ट लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. ड्रायपोर्टसाठी १०० हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचेही काम लवकरच सुरू होईल.नव्याने उभारण्यात येणाऱ्या सर्वच औद्योगिक वसाहतींमध्ये २० टक्के जागा लघु उद्योगांसाठी आरक्षित असेल, असेही त्यांनी सांगितले.

 सांगलीत उपकेंद्र उभारणार 

देशात सांगली आणि वसमत परिसरात हळदीचे सर्वाधिक उत्पन्न होते. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून वसमत येथे उभारलेल्या हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र सांगली येथे व्हावे, अशी सांगली येथील हळद उत्पादकांसह उद्योजकांची मागणी होती. त्यानुसार हेमंत पाटील यांच्याशी चर्चा झाली असून, आगामी काळात सांगली येथे उपकेंद्र उभारले जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

व्यापार उद्योग समिट घेणार 

नांदेड येथील विमानतळा सारख्या काही प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर या भागात मोठे उद्योग यावे यासाठी व्यापार व उद्योग जगतातील मान्यवर कंपन्याचा सहभाग असणारी व्यापारी परिषद घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 जिल्हास्तरीय समिती सक्रिय करणार 

मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करण्यावर भर राहिल. यासाठी जिल्हास्तरवर जिल्हाधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याचे सांगीतले. जिल्हास्तरीय समितीमार्फत मराठी भाषा संवर्धनाचे उपक्रम सुरू असल्याने त्यांनी सांगितले. समिती आणखी सक्रिय करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी त्यांनी विभागाचा आढावा घेतला यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, खादी ग्रामोद्योग व विश्वकर्मा उद्योग योजनांच्या संदर्भात आढावा घेतला. योजना राबविताना बँकांनी अडथळे आणू नये अशी सूचना त्यांनी केली. तसेच कोणतेही प्रकरण प्रलंबित ठेवू नका व अंमलबजावणीचा टक्का शंभर टक्के असावा,असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी व्यापार उद्योग समूहातील विविध संघटनांशी त्यांनी चर्चा केली.

आढावा बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ.आनंद पाटील बोंढारकर , एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे कार्यकारी अभियंता श्री गव्हाणे, जिल्हा उद्योग केद्रांचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांच्यासह विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

0000





  वृत्त क्रमांक 181

आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचा किनवट, माहूर दौरा 

नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे किनवट जि. नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी  11 वा. यवतमाळ येथून मोटारीने विश्रामगृह किनवट येथे आगमन व लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध आदिवासी संघटना सोबत बैठक व चर्चा. दुपारी 12 वा. एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट येथील कर्मचारी व अधिकारी लाभार्थी यांचेसोबत बैठक व आढावा. स्थळ:- उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे पत्रकार परिषद. दुपारी 3.30 वा. संघ कार्यालयास सदिच्छा भेट. दुपारी 4.30 वा. माहूरगड येथे जगंदबामाता दर्शन व भेट. सायं 5.30 वा. यवतमाळकडे प्रयाण करतील.

00000

विशेष वृत्त अ.भा, मराठी साहित्य संमेलनाची नांदेडकरांमध्ये उत्सुकता बोलक्या प्रतिक्रियांमधून मराठी भाषेबद्दल व्यक्त झाल्या भावना

 विशेष वृत्त 180

अ.भामराठी साहित्य संमेलनाची नांदेडकरांमध्ये उत्सुकता

बोलक्या प्रतिक्रियांमधून मराठी भाषेबद्दल व्यक्त झाल्या भावना


नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल नांदेडकरांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवकथाकरांपासून तर मराठीच्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा अभिमान आहे. नांदेडच्या मुलखातून मोठ्या संख्येने मराठी साहित्यिक दिल्लीच्या संमेलनात सहभागी होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उत्सव अभिजात मराठीचा हा उपक्रम सुरू केला आहे .
या अंतर्गत माध्यमांच्या सर्व आयुधातून दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया खास मराठीप्रेमी वाचकांसाठी..

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी साहित्यिकलेखकवाचकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. नवोदीत कवीकथाकार, कांदबरीकारलेखक यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.


मराठी भाषेला जागतीक कीर्ती मिळावीजगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष व्हावायासाठी हे साहित्य संमेलन महत्वाचे ठरणार आहे. यासाठी अनेक साहित्यिकलेखकप्रकाशक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.


या साहित्य संमेलनात साहित्य, भाषा आणि संस्कृती यांचे चिंतन होणार असूनविविध चर्चासत्रेपरिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नांदेड येथील प्रसिध्द साहित्यिकप्रकाशकलेखक यांनी आपल्या प्रतिक्रीया व शुभेच्छा दिल्या आहेत.

 
सावित्रीबाई फुले महिला अध्यापक महाविद्यालयसिडको येथील सहाय्यक प्राध्यापक आम्रपाली रामराव भद्रे यांनी मराठी माणसाने मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना मराठीतूनच शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या पाल्यांना मराठी कवी संमेलने, कार्यक्रमांना आवर्जून नेले पाहिजे. यामुळे मुलांमध्ये मराठी भाषा अधिक वृध्दींगत होईल आणि त्यांना आवड निर्माण होईल. मराठी भाषा अधिक संवर्धित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी व्यक्त केले.




श्री. निर्मलकुमार सुर्यवंशी, प्रकाशक, निर्मल प्रकाशन :- मी नांदेड येथून मागील 50 वर्षापासून मराठी वाडमयीन 800 पुस्तके प्रकाशित केले आहेत. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. तो मिळणे ही बाब आमच्या सारख्या मराठी भाषिकांना आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. पुणे व इतर शहरातून अनेक प्रकाशक 98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणार असून जिल्हा पातळीवरुनही अनेक प्रकाशकलेखकसाहित्यिक दिल्लीला जाणार आहेत. नांदेड येथील निर्मल प्रकाशनही याठिकाणी जावून स्टॉल लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.


श्री. राम तरटेग्रामीण कथाकार :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीला आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे मराठी भाषिकलेखकवाचकांना ऐतिहासिक ठरणार आहे. हे संमेलन नवोदित साहित्यिकासाठी एक नवी वाटचाल किंवा त्याला प्रस्थापित होण्यासाठीचा एक नवा मार्ग असणार आहे. या साहित्य संमेलनामुळे नवोदित कविकथा कांदबरीकार लेखकांना एका व्यापक व्यासपीठ मिळूनएका नवीन युगाला सुरवात होणार आहे असे मत ग्रामीण कथाकार राम तरटे यांनी व्यक्त केले.

 

या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला अधिकाधिक जागतिक दर्जा मिळावा. जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोषगजर व्हावाजागतिक पातळीवर किर्ती मिळावी. याबाबत ग्रामीण कथाकार राम तरटे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरु होता. तो संघर्ष आता संपुष्टात आला. मराठी भाषेतील विद्वानलेखकांनीसाहित्यिकांनी यासाठी सातत्याने दिल्लीपर्यत पाठपुरावा केला. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून सन्मान मिळाला आहे.


 
नारायण शिंदेलेखक :- नांदेड मधील ज्येष्ठ साहित्यिक लेखक नारायण शिंदे यांनी दिल्लीत होणाऱ्या संमेलनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला असून तो केंद्र शासनाने दिला आहे, आणि त्याच ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत विशेष आनंद आहे. 98 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नांदेड येथून अनेक साहित्यिक जाणार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जे यश मिळालेले आहे हे यश या संमेलनाच्या सहभागामधून वृध्दींगत होणार आहे. कै. यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक महामंडळे स्थापन केली. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची आठवण केली जाईल असे मत नारायण शिंदे यांनी व्यक्त केले. या संमेलनाला येणाऱ्यांना मराठी भाषिक ग्रंथ पाहाण्यास व वाचण्यास उपलब्ध होणार आहेत. एकूणच नांदेड मधील मराठी साहित्यिकांमध्ये दिल्लीच्या साहित्य संमेलना बद्दल उत्सुकता दिसून येत आहे.


00000

 

  वृत्त क्रमांक 179

राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेची नांदेडमध्ये जय्यत तयारी

कसून सराव, मैदानाचे अद्यावतीकरण, व्यवस्थाचे नियोजन
नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या जय्यत तयारीला नांदेडमध्ये सुरू झाली आहे एकीकडे महसूल विभागातील कर्मचारी आपले काम सांभाळून मैदानी तयारी करत आहे तर दुसरीकडे अडीच हजारावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन कामाला लागले आहे क्रीडा विभागाने मैदानाच्या अद्यावतीकरण केले असून जिल्हा व महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत आहे.
नांदेड येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्यावतीने राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन श्री. गुरु गोबिंदसिंघ जी स्टेडियम येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.


या क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धांना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, नोंदणी मुद्रांक महानिरीक्षक, जमाबंदी आयुक्त पुणे, सर्व अपर आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर, कोकण, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक या महसूल विभागातील तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग आणि जमाबंदी आयुक्त, पुणे अशा 7 विभागातील जवळपास दोन ते अडीच हजार पुरुष व महिला खेळाडू उपस्थित राहणार आहेत.



यामध्ये संचलन, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबाल, फुटबॉल, खो-खो, रिले, महिला थ्रो-बॉल आणि जलतरण या सांघिक खेळ प्रकाराचा समावेश आहे. तसेच बुद्धीबळ, कॅरम, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस, 100,200,400 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा, भाला, थाळी फेक, रिंग टेनिस आणि 45 वर्षावरील 3 कि.मी.चालणे इत्यादी वैयक्तिक 82 प्रकारच्या खेळातील मैदानी सामने श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडीयम, इंदिरा गांधी मैदान, पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज या मैदानावर तर जिल्हा क्रीडा संकुल आणि महानगरपालिकेच्या इनडोअर हॉल मध्ये इनडोअर प्रकारचे तसेच कै.शांताराम सगणे या जलतरणिकेमध्ये सर्व जलतरणाचे सामने होणार आहेत. मैदानी खेळाव्यतिरिक्त सर्व 7 विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी 6 ते 10 वा.दरम्यान करण्यात आले आहे. उत्कृष्ट गायन, अभिनय, वैयक्तिक नृत्य, वेशभूषा, नक्कल, वादक, निर्मिती, दिग्दर्शक, कलाप्रकार, निवेदक, नाटीका इत्यादी कला प्रकारचा समावेश आहे.
नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची जय्यत तयारी जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अपर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर यांचे सनियंत्रणात आणि निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व संघटनांचे पदाधिकारी हे या स्पर्धेच्या तयारीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तसेच नांदेड येथील महसूल अधिकारी, कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव करीत आहेत. या सरावासाठी ते मैदानावर सकाळ, संध्याकाळ सराव करीत आहेत.
00000

वृत्त क्रमांक 178

 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून आरोग्यविषयक सर्वेक्षण

राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती गोळा

नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- नांदेड जिल्हयात अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी  सर्वेक्षणासाठी घरी येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सर्व कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून करण्यात आले आहे.  

भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर 'कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चया विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील 365 दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सदर पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय / दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबांची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब आणि 'मागील 365 दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे. तरी सर्व संबंधित कुटूंबियांनी, नागरिकांनी या सर्वेक्षणाला परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

#गुणवत्ताशिष्यवृत्ती #नांदेड