Wednesday, March 18, 2020


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यात सोमवार 30 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 16 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 30 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000


कोरोना व्हायरसचा धोका :
राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिलला ;
इतर कायदेविषयक शिबीर रद्द
नांदेड दि. 18 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन 11 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोकअदालत 25 एप्रिल रोजी आयोजीत करण्याचे कळविले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारे सर्व कायदेविषयक शिबीरे, कार्यक्रम व मोबाईल व्हॅन इत्यादी कार्यक्रम पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचे कळविले आहे. 
मुंबई राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याकडून 11 एप्रिल रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांनी दिली आहे.  
000000


कोरोना विषाणू नियंत्रणासाठी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
कामकाजाबाबत आवाहन
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणू नियंत्रणसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येत्या 31 मार्च पर्यंत अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, वाहनांची पुर्ननोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, परवाना संबंधी, वाहन नवीन नोंदणीचे कामे करण्यात येतील. वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद आदी कामे करण्यात येणार नाहीत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध कामानिमित्त मोठया प्रमाणात अभ्यागतांचे येणे-जाणे असल्यामुळे गर्दी जमा होते, त्यामुळे कोरोना व्हायरस प्रसार होण्याची संभावना कमी करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या परिपत्रकान्वये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कळविले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथे  31 मार्च पर्यंत शिकाऊ अनुज्ञप्त्यासाठी घेतलेल्या अर्जदारांचे अपॉईंमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेडयूल करण्यात येईल. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्ती 31 मार्च पूर्वी संपणार आहे अशा अर्जदारांची पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व पक्की अनुज्ञप्तीचे अपॉईंटमेंट पुढील महिन्यामध्ये रिशेडयुल करण्यात येणार आहेत. जिल्हयातील सर्व कॅम्प कार्यालय 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज
-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन
नांदेड दि. 18 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासन विविध माध्यमातून जनजागृती करीत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
कोरोनाप्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  शासकीय वैद्यकीय महावि‍द्यालय अधिष्‍ठाता डॉ. चंद्रकांत मस्‍के, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले, रेल्वे स्थानक, विमानतळ, खाजगी बसस्थानक 24 तास तत्पर ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक साधन सामग्रीसह आरोग्य तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहेत. कोरोना संदर्भात शिक्षक, अशा कार्यकर्त्या यांच्यावतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी सज्ज असून आवश्यक त्या सुचना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना यावेळी देण्यात आल्या. 
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...