– जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
· जिल्ह्यात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी
· मागील वर्षी आपत्ती निर्माण झाली त्याठिकाणावरचे प्रश्न तात्काळ सोडवा
· जिल्ह्यातील धोकादायक होर्डीगमुळे आपत्ती निर्माण होणार नाही यांची काळजी घ्या
नांदेड दि. 16 :- दरवर्षीच्या मान्सून पेक्षा यावर्षीचा मान्सून जास्त प्रमाणात दर्शविला असला तरी जिल्ह्यात संभाव्य काळात आपत्ती निर्माण होणार नाही यांची खबरदारी यंत्रणानी घ्यावी. त्यासाठी सर्व आपत्ती व्यवस्थापनासंबंधीची कामे 31 मे 2024 पूर्वी करण्यावर भर द्यावा. प्रभावी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व विभागानी प्रभावी संपर्क व योग्य समन्वय ठेवून कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विद्युत, अग्निशमन, जलसंपदा, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षी ज्या भागात आपत्ती निर्माण झाली होती त्याठिकाणचे प्रश्न यंत्रणानी सर्वेक्षण करुन प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा. तसेच आरोग्य विभागाने पावसाळयात अचानक उदभवणाऱ्या रोगराई व संसर्गजन्य आजार याबाबत दक्ष राहून औषधी साठा व पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडर उपलब्ध करुन ठेवावे. नांदेड शहरातील नालेसफाई, गटार दुरुस्ती, नाल्यातील गाळ काढण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या नद्या व या नद्याच्या उपनद्या यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील पूरप्रवण गावाची संख्याही मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 337 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावातील शासकीय यंत्रणानी विशेषत: गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना परस्परात समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपत्ती निवारणासाठी अडचण निर्माण होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील लहान-लहान नाले, तलाव, कॅनाल यामध्ये गाळ, कचरा, झाडे, झुडपे वाढल्यामुळे पूरपरिस्थती निर्माण होवून आपत्तीची परिस्थिती निर्माण होवू शकते त्यामुळे पावसाळयापूर्वी हे कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
.jpeg)

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील धोकादायक व बेकायदेशिर होर्डींग काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी मनपा, नगरपरिषद, नगरपालिका यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळयात होर्डीगमुळे कोणतीही आपत्ती ओढवणार नाही किंवा हानी होणार नाही यांची काळजी संबंधित यंत्रणेनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
गोदावरी नदीवर पूर नियंत्रणासाठी असलेली महत्वाची ठिकाणे व त्या-त्या ठिकाणावरुन अतिवृष्टी झाल्यास पूर वहणाचा कालावधी हा संबधीत अधिकाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियत्रंण कक्ष कार्यान्वित करुन त्यावर जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करुन या समित्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाचे अद्ययावत आराखडे तयार करुन आपत्ती निवारणाबाबत नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारी औषधे, पाण्यातून होणारे आजार लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडर, स्वच्छतेच्यादृष्टीने नगर/महानगर पालिका क्षेत्रातील नाले सफाई, वीज वितरणात अडथळा होणार नाही यादृष्टीने आपतकालिन व्यवस्थापन या बाबीवर त्यांनी भर देवून सर्व यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन बाबत सविस्तर सादरीकरण केले.
0000