Monday, January 8, 2024

 वृत्त क्र.  28

 

महासंस्कृती महोत्सवाला लोकाभिमूखतेची

जोड देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         महासंस्कृती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील कलावंताचा निर्धार

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महासंस्कृती महोत्सव हा एकात्मता, सामाजिक सौहार्द यासह आपल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा महोत्सव आहे. हा महोत्सव नावारूपास आणणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या कलांच्या सादरीकरणासाठी विशेष राखीव वेळेद्वारे अधिकाधिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊ, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती इ. बाबी जनसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाला लोकाभिमूख करण्यासह स्थानिक कलावंतांच्या याबाबत काही सूचना असल्यास त्या नियोजनाच्यादृष्टिने समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आज बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते.

 

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सुरेश जोंधळे, ज्येष्ठ शाहीर रमेश गिरी, बापु दासरी, नाट्यकर्मी लक्ष्मण संगेवार, जयंत वाकोडकर, आनंदी विकास, विजय निलंगेकर, राधिका वाळवेकर, डॉ. राम चव्हाण, मंजूर हाश्मी, डॉ. वैशाली गोस्वामी, ॲड गजानन पिंपरखेडे, डॉ. विद्या झिने, डॉ. बालाजी पेनूरकर, चित्रकार कविता जोशी, वसंतराव बारडकर, विजय होकर्णे, दिनेश कवडे, शिवाजी टाक, मिना सोलापूरे आदी उपस्थित होते.

 

महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे तसेच शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम यासह पोवाडा, भारुड, गोंधळगीत इ. सारखे लोककलेतील विविध प्रकार समाविष्ट असणार आहेत. स्थानिक दुर्मिळ व लुप्त होत चाललेल्या लोककला, संस्कृती, विविध स्थानिक महोत्सव/सण/कार्यक्रम आणि देशभक्ती गीत याबाबत बैठकीत सहभागी कलावंतांनी मौलिक सूचना केल्या. बैठकीचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले.

00000









 वृत्त क्र. 27

 

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्‍या प्रारूप आराखड्यास मान्यता

 

नांदेड (जिमाका), दि. 8 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2024-25 च्‍या अनुक्रमे रु. 426.00 कोटी, रु.163.00 कोटी व रु.45.52 कोटी असा एकूण रु.634.52 कोटीच्‍या प्रारूप आराखड्यास तसेच जिल्‍हा विकास आराखड्यास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

 

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत माहे डिसेंबर 2023 अखेरपर्यंतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना) सन 2023-24 अंतर्गत पुनर्विनियोजन प्रस्‍तावास बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृहात आयोजित नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थिती दिली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व सर्व विभागाचे प्रमुख हे प्रत्यक्ष हजर होते. खासदार सुधाकर श्रंगारे, आमदार राजेश पवार, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश अंतापूरकर, विभागीय आयुक्‍त कार्यालयाचे उपायुक्त किरण गिरगावकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.

 

केंद्र व राज्य सरकारच्या जिल्ह्यात अतिशय चांगल्या वैशिष्ट्यपूर्ण योजना गोरगरीब सर्वसामान्यांसाठी सुरू आहेत. यात व्हिजेएनटी यांच्यासाठी मोदी आवास योजना, आरोग्य, कृषि आदी विविध क्षेत्रात असलेल्या या वैविध्यपूर्ण योजनांच्या पाठीमागे सर्वसमावेशकतेची भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. हर घर नल से जल या योजनेद्वारे जिल्ह्यात 1 हजार 234 योजना जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत. 30 मोठ्या योजना महाराष्ट‍्रजीवन प्राधिकरण पूर्ण करीत आहे. जिल्हा परिषदेने आजवर 299 योजना युद्धपातळीवर पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरीत योजना शासनाच्या निकषानुसार तात्काळ पूर्ण करण्याबाबतची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आणि भौगोलिक क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. दिवसेंदिवस कुठे अतिवृष्टी, कुठे वादळवारे असे आपत्तीचे प्रमाण व आव्हाने वाढत आहेत. यामुळे विद्युत सेवा-सुविधेपासून सर्वच विभागांवर मोठ्या परिणाम होतो. नुकत्याच झालेल्या नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी, वादळ वाऱ्यामुळे अनेक गावातील विद्युत पोल उन्‍मळून पडले. याच्या कामासाठी जिल्ह्याच्या विस्ताराप्रमाणे अधिक आर्थिक तरतूद व्हावी व गती मिळावी याबाबत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आग्रही मागणी केली.

 

महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून नांदेड-बिदर या रेल्वे योजनेला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्राने यासाठी साडेसातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामुळे आता नांदेड-वर्धा रेल्वेच्या उपलब्धतेनंतर विदर्भातून थेट बिदर पर्यंत मधला मार्ग विकसीत होणार असल्याने याचा लाभ नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्याला अधिक होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील या मार्गाचे सुमारे 75 टक्के काम होत असून महाराष्ट्र शासनाने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार राम पाटील रातोळीकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याला मान्यता दिली.

 

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विविध विषय मांडून लक्ष वेधले. मुखेड सारख्या कोरडवाहू क्षेत्रात जे काही तलाव होते ते गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झाले आहेत. काही तलाव फुटले आहेत. याच्या दुरूस्तीसाठी तात्काळ निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी आमदार तुषार राठोड यांनी केली.

 

जिल्हा विकास आराखडा अंतर्गत थेट परकीय गुंतवणूकीमध्ये राज्याला दुसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर नेणे, भारताच्या सकल उत्पन्नामध्ये राज्याचे योगदान 15 टक्के वरुन 20 टक्क्यावर नेणे, शाश्वत विकास ध्येयामध्ये राज्याला 9 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर नेणे सर्व 16 शाश्वत विकास ध्येयांमध्ये राज्य फ्रन्टरनर किंवा त्यापेक्षा वरच्या श्रेणीत नेणे. ही चार प्रमुख उद्दिष्ट निश्चित करण्यात आली असून राज्याच्या परिष्टपुर्तीसाठी "बॉटमअप" दृष्टीकोन वापरुन आर्थिकवाढ व राज्याच्या सकल उत्पन्नासाठी उत्प्रेरक म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक असल्‍याने नांदेड जिल्ह्यात प्राथमिक क्षेत्र म्हणून कृषि व संलग्न सेवा यानंतर उद्योग व खानकाम आणि पर्यटन या तीन क्षेत्रांना प्राधान्याने अधोरेखित केले आहे. या बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

00000









 वृत्त क्र. 26


नांदेड येथे दोन दिवस रंगणार बाल कलावंताचा नाट्य आविष्कार

·         बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

नांदेड (जिमाका), दि. 8 :- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित 20 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेड येथे 10 व 11 जानेवारी 2024 रोजी कुसुम सभागृहात सकाळी 11 ते सायं. 5 या वेळेत संपन्न होणार आहे. या स्पर्धेत नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील एकूण 11 संघांचा समावेश आहे. या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बाल कलावंताना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 10 जानेवारी रोजी दुपारी १२ वा. केंब्रीज माध्यमिक विद्यालयनांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखितवैभव देशमुख दिग्दर्शित चिऊताई माझ्याशी बोल नादुपारी 1.15 मिनिटांनी बालगंधर्व सांस्कृतिककलाक्रीडा व युवक मंडळपरभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखितमधुकर उमरीकर दिग्दर्शित काहीतरी चुकतंय वाटतयदुपारी 2.30 वा. ज्ञानभारती विद्यामंदिरनांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखितराहुल जोंधळे दिग्दर्शित बुद्धाची गोष्टदुपारी 3.45 मिनिटांनी जिंतूर शिक्षण संस्था संचलित डॉ. सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिरजिंतूरच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखितनागेश कुलकर्णी दिग्दर्शित मदर्स डे दुपारी 5 वा. नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयपोखरणीच्या वतीने जड झाले ओझे या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलनांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखितस्वाती घाणेकर दिग्दर्शित एलियन्स द ग्रेटदुपारी 12 वा. राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयधर्माबादच्या वतीने नाथा चितळे लिखित श्रीनिवास दर्शन दिग्दर्शित चिऊताई माझ्याशी बोल नादुपारी 1.15 मिनिटांनी शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सनांदेडच्या वतीने आसिफ अन्सारी लिखितमहेश घुंगरे दिग्दर्शित वडाळा ब्रिजदुपारी 2.30 मिनिटांनी टायनी एंजल्स स्कूलनांदेडच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित,गौतम गायकवाड दिग्दर्शित करामती पोरदुपारी 3.45 मिनिटांनी राजीव गांधी युवा फोरमपरभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित उपेंद्र दुधगावकर दिग्दर्शित जगण्याचा खो आणि दुपारी 5 वा. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळाफुलकळसपरभणीच्या वतीने गोविंद गोडबोले लिखित डॉ. सिद्धार्थ मस्के दिग्दर्शित गोष्टीची गोष्ट या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे असे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे.

0000



 वृत्त क्र. 25

 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी

 22 जानेवारीपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 8 :क्रीडा विभागाच्यावतीने राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 29 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 2023 विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हयातील इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर 22 जानेवारी, 2024 च्या मध्यरात्रीपर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 

 

या पुरस्कारासाठी  राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांचेद्वारा अर्ज मागविण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिसाठी जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

0000

 वृत्त क्र. 24 

मराठा समाजाच्या सर्वेक्षणात

हलगर्जी केल्यास होणार नियमानुसार कार्यवाही

 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण युद्धपातळीवर व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कामासाठी आयोगाला आवश्यक शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य तसेच अन्य संस्थामधील आवश्यक सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे. असे असताना काही विभाग प्रमुख सर्वेक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी यांचा अचूक तपशील नोडल अधिकारी यांना सादर करीत नसल्याचे निर्देशनास आले आहे.

 

राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित केले आहेत. त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगास मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणार सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करावयाचे सक्त निर्देश आहेत. या सर्वेक्षणाच्या कालावधीत जिल्ह्यातील कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना रजा अनुज्ञेय करता येणार नाहीत तसेच मुख्यालय सोडता येणार नाही. जिल्हा/उपविभाग/तालुका/नगर-परिषद/पंचायत स्तरावरील सर्व विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी परस्परांचे समन्वयात राहून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे अधिकारी, कर्मचारी, वाहन व्यवस्था, आवश्यक साधन सामग्री, माहिती इत्यादींची उपलब्धता हयगय न करता नोडल अधिकारी यांना तात्काळ करुन द्यावी. याकामी विलंब अथवा हलगर्जी केल्यास संबंधीताविरुध्द नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.  

0000

 वृत्त क्र. 23 

शासकीय योजनांवर आधारित कार्यक्रमाचे

आकाशवाणी केंद्राद्वारे दररोज प्रसारण

 

नांदेड (जिमाका), दि. 8 :-जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन शासनाच्या विविध योजनांवर आधारित कार्यक्रम 5 जानेवारी 2024 पासून दररोज सकाळी 8.15 वाजता आणि रात्री 8 वा. प्रसारित करण्यात येत आहे. शासनाच्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच योजनाची माहिती नागरिकांना होवून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेता यावा यासाठी 15 मिनीटाचे हे कार्यक्रम प्रसारित होत आहे.

 

श्रोत्यांना हे कार्यक्रम एफएम बँड 101.1 मेगाहर्टसवर आणि न्युज ऑन एअर या मोबाइल अप्लीकेशनवर ऑनलाईन ही ऐकता येतील. पर्व विकासाचे जनसामान्यांच्या कल्याणाचे या सदरात विविध विभागप्रमुख शासकीय योजनांच्या माहितीसह याचा लाभ कसा घेता येईल याबाबत माहिती देत आहेत.  विभाग प्रमुखांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाबाबत शंकाचे निरसण व समाधान या कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व नागरिक, श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे व जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...