Friday, August 5, 2022

 जिल्ह्यातील 50 हजार शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून

दीड लाख गरिब कुटुंबासाठी तिरंगा वाटपाचा शुभारंभ

 

·       पत्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी माहिती प्रसारासाठी देणार योगदान  

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्याने घरोघरी तिरंगा अभियानासाठी अभिनव व कल्पक उपक्रम हाती घेऊन लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबालाही आपल्या घरावर स्वाभिमानाने तिरंगा फडकविता यावा यासाठी शासनाच्या सुमारे 50 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन या प्रमाणे सुमारे दीड लाख तिरंगाचे वाटप केले जात आहे. त्याचा प्रातिनिधीक शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आला.

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष विजय जोशी, उर्दू संपादकांच्यावतीने अल्ताफ सानी, संपादक प्रदिप नागपूरकर, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जिल्ह्यातील बचतगटांना आपण जाणीवपूर्वक तिरंगा वितरणाची, तिरंगा विक्री करण्याची जबाबदारी दिली आहे. सुमारे दीड लाख तिरंगा त्यांच्यामार्फत आपण घेत आहोत. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय परिसरात त्यांना तिरंगा विक्रीसाठी जागाही देत आहोत. अप्रत्यक्षरित्या त्यांना यातून मदत व्हावी हा उद्देश आहे. तिरंगाबाबत शासनाचे निर्देश व त्याबाबतच्या नियमांची स्पष्ट कल्पना सर्वांना दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या अभिनव उपक्रमासाठी माध्यमांचे प्रतिनिधी आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास तत्पर आहेत. या उपक्रमात लोकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यासाठी व्यापक प्रसिद्धीवर आम्ही भर देऊ असे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी सांगितले.  

 

यावेळी प्रातिनिधी स्वरुपात उपस्थित सर्व सन्माननिय पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना तिरंगा देण्यात आला. प्रत्येक शासकीय अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या योगदानातून गरीब तीन कुटुंबांना तिरंगा देणार आहेत.

00000




 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

हर घर तिरंगा अंतर्गत रॅलीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीच्या वेळी रस्ता सुरक्षेचे महत्व नागरिकांना कळावे म्हणून सुरक्षित वाहतुकीचे महत्व पटवुन देणारे स्लोगनचे बॅनर लावण्यात आले होते. या मोटार सायकल रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी हिरवा झेंडी दाखवुन रॅलीला मार्गस्थ केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे यांची उपस्थिती होती. या मोटार सायकल रॅलीचे मार्गक्रमण जिल्हाधिकारी कार्यालय पासून पोलीस अधिक्षक कार्यालय, वजिराबाद, शिवाजी नगर, आयटीआय, तरोडा नाका, फरांदे मोटार्स नांदेड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

या मोटार सायकल रॅलीमध्ये जिल्हयातील मोटार वाहन वितरकामध्ये फरांदे मोटार्सचे कौस्तुफ फरांदे, राईडवेल मोटार्सचे कमल कोठारी, एमएफ मोटार्सचे अब्दुल वहिद, जिल्हयातील सर्व वाहन वितरक व त्यांचे कर्मचारी यांनी उर्स्फूतपणे सहभाग घेतला.

 

यावेळी कार्यालयातील कार्यकारी अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक रत्नकांत ढोबळे, अमोल अवाड, गणेश तपकिरे, सहा. मोटार वाहन निरीक्षक पंकज यादव, अडकलवार, डुब्बेवार, श्री. रहाणे, श्री. टिळेकर, श्री. राठोड, श्री. जावळे, श्री.कंतेवार, श्री. राजुरकर, श्री. पानकर, श्री. गायकवाड, श्री ठाकुर, श्री सोमदे, श्रीम.कलाले, तसेच लिपिक कर्मचारी श्री, गाजुलवाड, श्री. केंद्रे, श्री. कंधारकर, श्री. शिंदे, श्री. पवळे, श्री. देवदे, श्री. काकडे, श्री.कुंडगीर, श्री.सातपुते, श्री. बुरुकुले, व असंख्य नागरिक उपस्थित होते.

0000





 ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे

- विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

· ग्रामीण भागातील 6 लाख विद्यार्थी घरच्या तिरंगासाठी उत्सुक

· नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी विविध उपक्रम

· जिल्हा परिषदेत बचतगटांचा गौरव व तिरंगाचा प्रातिनिधीक शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत आज घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या ग्रामीण भागातील प्रभावी आयोजनाचा शुभारंभ व जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून घेण्यात आलेल्या तिरंगाचे प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. या छोटेखाणी समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 6 लाख 86 हजार 821 विद्यार्थी संख्या आहे. जवळपास 24 हजार 343 शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांनी समर्थपणे पेलून दाखविल्याचे गौरवउद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी काढले.

सैनिक हा देशाचा श्वास तर शिक्षक हा देशाचा विश्वास असल्याचा उल्लेख या समारंभात शिक्षकांनी केला होता. याचा धागा पकडून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घरोघरी तिरंगाचा आणि भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रशासनातर्फे टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवाल, असे सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामपातळीवरील ग्रामसेवकापासून, शिक्षकांपासून ते तालुका पातळीवरील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांच्या परस्पर समन्वयातून घरोघरी तिरंगासाठी व्यापक नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
0000


 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात

बुधवारी रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन

-         जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. :-  भारतीय स्वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवा निमित्‍त व जागतिक अदिवासी दिनाचे औचित्‍य साधून रानभाजी महोत्‍सवाचे आयोजन बुधवार 10 ऑगस्‍ट 2022 रोजी सकाळी 10 ते सायं. 6 या कालावधीत जिल्‍हाधिकारी कार्यालय परीसरात केले आहे. या महोत्‍सवात शहरातील ग्राहकांनी सहभाग घेवून लाभ घ्यावा. तसेच थेट शेतकऱ्यांकडून रानभाजी खरेदी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

 

मानवी आरोग्‍यामध्‍ये सकस अन्‍नाचे अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. सकस अन्‍नामध्‍ये विविध भाज्‍यांचा समावेश आवश्‍यक आहे. सध्‍या परिस्थितीमध्‍ये रानातील म्‍हणजेच जंगलातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिकरित्‍या उगवल्‍या जाणाऱ्या रानभाज्‍यांचे/ रानफळांचे महत्‍व व आरोग्‍यविषयक माहिती सर्वसामान्‍य नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. रानभाज्‍यांचा समावेश हा त्‍या- त्‍या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो.

 

रानभाज्‍यांमध्‍ये विविध प्रकारचे शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक अन्‍नघटक असतात. रानभाज्‍या नैसर्गिकरित्‍या येत असल्‍यामुळे त्‍यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्‍यात येत नाही. त्‍यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्‍याने या संपत्‍तीचा योग्‍य वापर आवश्‍यक आहे. शहरी लोकांमध्‍ये याबाबत जागृती करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. यासाठी नांदेड येथे रानभाजी महोत्‍सव आयोजित करण्‍यात येत आहे.

यामध्‍ये जिल्‍हयातील शेतकरी गट व महिला गटांचा सक्रिया सहभाग या महोत्‍सवात राहणार आहे. विक्रीच्‍या ठिकाणी आपल्‍या जिल्‍हयातील उपलब्‍ध होणाऱ्या सर्व रानभाज्‍यामध्‍ये कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, गुळवेल, तांदुळजा, रानमाठ, पांढरी वसु, गोखरु, बिव्‍याचे फुले,  उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्‍या व सेंद्रीय हिरव्‍या भाज्‍या, फळभाज्‍या व फूलभाज्‍या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्‍पादीत केलेला माल सेंद्रीय उत्‍पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्‍याचे करडीचे तेल, मध, बांबुपासुन तयार करण्‍यात आलेल्या वस्‍तु, गहू, डाळीचे व यासोबत भुईमुगच्‍या शेंगा, मुगाच्‍या शेंगा व केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. शहरातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घेण्याचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्‍प संचालक (आत्‍मा) रविशंकर चलवदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 35 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 211 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, किनवट 24, पंजाब 1  तर ॲटीजन तपासणीद्वारे किनवट 6, धर्माबाद 1 असे एकूण 35 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 261 एवढी झाली असून यातील 1 लाख 484 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 85 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 4  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 8 असे एकूण 12  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 66, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 85 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 13 हजार 883
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 93 हजार 230
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 261
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 484
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.31 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-85
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह

पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रमुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट 2022 या काळात येलो अलर्ट जारी केलेला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असेआवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

 

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनीछत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपणविजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

 

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळपाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

 जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 24.80 मि.मी. पावसाची नोंद

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात शुक्रवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 24.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 797.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 33.10 (804), बिलोली-27.50 (767.60), मुखेड- 19.40 (719), कंधार-28 (744.50), लोहा-26.50 (734.70), हदगाव-25.20 (750.30), भोकर-20.70 (905.90), देगलूर-6.30 (665), किनवट-8.20 (874.90), मुदखेड- 39.10 (968.70), हिमायतनगर-44.30 (1073.70), माहूर- 3.40 (694.60), धर्माबाद- 44.30 (936.60), उमरी- 28.10(965.50), अर्धापूर- 38.60 (755.70), नायगाव-36.70 (726मिलीमीटर आहे.

0000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...