Friday, August 5, 2022

 ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षक व विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे

- विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी

· ग्रामीण भागातील 6 लाख विद्यार्थी घरच्या तिरंगासाठी उत्सुक

· नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी विविध उपक्रम

· जिल्हा परिषदेत बचतगटांचा गौरव व तिरंगाचा प्रातिनिधीक शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 5 :- कोरोनाच्या कालावधीत हिरमुसलेले विद्यार्थी आता नियमित शाळा सुरू झाल्याने विविध उपक्रमाप्रतीही तेवढेच उत्सूक आहेत. शालेय शिक्षणासमवेत लोकशिक्षणात आणि व्यापक जनजागृतीत कृतीशील सहभाग विद्यार्थ्यांएवढा कोणाचा असू शकत नाही. राष्ट्राची लोकशिक्षणाच्या प्रती ही एक संपत्ती आहे. ग्रामीण भागाच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांचेही योगदान तेवढेच मोलाचे आहे, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेत आज घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या ग्रामीण भागातील प्रभावी आयोजनाचा शुभारंभ व जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानातून घेण्यात आलेल्या तिरंगाचे प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. या छोटेखाणी समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले आदी मान्यवर उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे 6 लाख 86 हजार 821 विद्यार्थी संख्या आहे. जवळपास 24 हजार 343 शिक्षक आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत वेळोवेळी शिक्षकांवर विविध जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत. या सर्व जबाबदाऱ्या शिक्षकांनी समर्थपणे पेलून दाखविल्याचे गौरवउद्गार विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी काढले.

सैनिक हा देशाचा श्वास तर शिक्षक हा देशाचा विश्वास असल्याचा उल्लेख या समारंभात शिक्षकांनी केला होता. याचा धागा पकडून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घरोघरी तिरंगाचा आणि भारतीय स्वातंत्र्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रशासनातर्फे टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवाल, असे सांगितले.

नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेतील ग्रामपातळीवरील ग्रामसेवकापासून, शिक्षकांपासून ते तालुका पातळीवरील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांच्या परस्पर समन्वयातून घरोघरी तिरंगासाठी व्यापक नियोजन केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...