मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर
संशयास्पद व्यवहारांवर नजर राहणार
जिल्हाधिकारी काकाणी यांचे जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठकीत निर्देश
नांदेड, दि. 24 :- विधानपरिषद आणि नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी जिल्ह्यात
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी
मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकारांवर, आर्थिक बळाचा वापर, संशयास्पद आर्थिक
व्यवहार, दारुचा अवैध वापर यांच्यावर नजर राहणार आहे. त्यासाठी आज जिल्हास्तरीय
सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात बैठक झाली.
बैठकीस नांदेड
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय
येनपुरे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश
पिनाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी
संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी, नगरपरिषद प्रशासन अधिकारी विद्या
गायकवाड, उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त
वृंदा मतकरी, अग्रणी बँकेचे प्रतिनिधी श्री. वरणकर आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक
आयोगाकडून विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा
तसेच नऊ नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य
निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी
आहेत, तर नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठीही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील
जिल्हास्तरीय समितीद्वारे सनियंत्रण केले जाणार आहे.
या दोन्ही निवडणुकांच्या अनुषंगाने आज झालेल्या
बैठकीत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश
दिले. यामध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी विविध यंत्रणांवर
जबाबदाऱ्या सोपविण्याचे नियोजन करण्यात आले. विशेषतः संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर
बँक आणि आयकर विभागाच्या समन्वयाने नजर ठेवणे, जिल्ह्यात पाहणीसाठी फिरते तसेच
स्थानिक पथकांची नियुक्ती करणे, तसेच
निवडणूक काळातील शांतता-सुव्यवस्थेसाठी अवैध अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी
संयुक्तपणे प्रयत्न करणे, त्यासाठी माहितीची देवाण-घेवाण समन्वयनासाठी
अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैधरित्या मद्यविक्री किंवा
विहीत कालमर्यादेनंतरही मद्यविक्री, अवैध साठे शोधणे, प्रचार-प्रसिद्धी दरम्यान
विरूपणास प्रतिबंध करणे यासाठीच्या नियोजनाबाबतही निर्देशित करण्यात आले.
निवडणूक काळातील
आर्थिक व्यवहारांबाबत व्यावसायीक, व्यापारी तसेच अन्य प्राधिकरणांनी, व्यक्तींनी
बँकीग नियमन तरतुदीनुसार सोबत दस्तऐवज, अनुषांगीक माहिती ठेवावी. बँकींग
नियमावलीनुसार मोठ्या स्वरुपाच्या आर्थिक व्यवहारासाठीची विहित पद्धतीचा काटेकोर
अवलंब करावा, जेणेकरून अशा नियमित व्यवहारांबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही,असेही
आवाहन सनियंत्रण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू
असल्याने, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा
1077 हा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर येणाऱ्या
तक्रारीबाबत संबंधित यंत्रणांना दर दोन तासांनी अद्ययावत माहिती देण्यात यावी,
असेही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी निर्देशित केले. या तक्रारीबाबत केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवालही वेळोवेळी
सादर करण्यात यावा, अशा सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.
0000000