Friday, September 23, 2016

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे
26 सप्टेंबर पासून आयोजन
नांदेड दि. 23 :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेड व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यात उद्योग व्यवसाय सुरु करणाऱ्या युवक व युवतींसाठी सोमवार 26 सप्टेंबर 2016 पासून उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगटातील  युवक-युवती, महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी कार्यक्रम आयोजक रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन  शिवाजीनगर नांदेड  येथे संपर्क साधावा, असे आवाहन  नांदेड एमसीईडीचे  प्रकल्प शंकर पवार यांनी केले आहे.   
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यामातून जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न, फळ प्रक्रिया उद्योग व संधी यामध्ये दालमिल, ऑईलमिल, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, केळी प्रक्रिया उद्योग, कांदा प्रक्रिया, आद्रक प्रक्रिया, हळद प्रक्रिया उद्योग, मिरची प्रक्रिया, गुळ उद्योग, मशरूम उद्योग, टमाटा प्रक्रिया, आलू प्रक्रिया, बेकरी उत्पादने पापड उद्योग ,लोणचे उद्योग, त्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  तसेच प्लास्टिक उद्योग,  इलक्ट्रिकल उद्योग, एलईडी, सोलार एनर्जी, लेदर इंडस्ट्रीज, गारमेंट इंडस्ट्रीज याबाबत ही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
              याशिवाय  उद्योजकीय गुण, संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, उद्योग व्यवस्थापन, मार्केट सर्वे, उद्योगसंधी,  शासकिय-निमशासकिय व इतर महामंडळच्या कर्ज योजना,  बँकेची भुमिका,  प्रकल्प अहवाल, सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण,  कारखाना भेट, उद्योग नोंदणी,   इत्यादीबाबत  मार्गदर्शन करण्यात येणार आहे. किमान 18 ते 50 वर्ष वायोगातील   युवक-युवती,  महिलांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी  कार्यक्रम आयोजक  रमेश बहादुरे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उद्योग भवन  शिवाजीनगर नांदेड  येथे संपर्क साधावा, असे आवाहन  नांदेड एमसीईडीचे प्रकल्प  शंकर पवार यांनी केले आहे.

000000
महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणासाठी
अर्ज करण्याचे एमसीईडीचे आवाहन
नांदेड दि. 23 :- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली (डी.एस.टी.), भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद पुरस्कृत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.), जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा अग्रणी बँक यांच्या सहकार्याने महिलांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार 29 सप्टेंबर पासून करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार 26 सप्टेंबर 2016 आहे. गरजू बेरोजगार महिला युवतीनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमसीईडी प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी केले आहे.  
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 30 दिवस असून प्रशिक्षण कार्यक्रमात अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, कृषिमाल प्रक्रिया उद्योग, रासायनिक उद्योग, औषध निर्मिती उद्योग, सौदर्य प्रसादान निर्मिती उद्योग, वस्त्रोद्योग, लेदर उद्योग (शाळेची बॅग  व पर्स ) उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.    
     या कार्यक्रमात विविध उद्योग संधी बाबद मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, बाजारपेठ पाहणी तंत्र,  शासनाच्या विविध कर्ज योजना, प्रकल्प अहवाल इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मुलाखती घेऊन पात्र व्यक्तीची निवड करण्यात येईल. प्रशिक्षण नियमितपणे उपस्थित राहून पूर्ण केल्यानंतर शासन नियमाप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येईल.
         किमान 18 ते 35 वर्ष वयोगटातील विज्ञान शाखेतील, अभियांत्रिकी शाखेतील डिग्री, डिप्लोमाधारक युवती व महिलांनी प्रवेश, अधिक माहितीसाठी रमेश बहादुरे कार्यक्रम समन्वयक संपर्क, एम.सी.ई.डी उद्योग भवन शिवाजी नगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन प्रकल्प अधिकारी पवार यांनी केले आहे.

0000000
प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर पंचत्त्वात विलीन
नांदेड, दि. 23:-   जेष्ठ  शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्य सेनानी, राज्यसभेचे माजी खासदार प्राचार्य डॉ. गो. रा. म्हैसेकर यांचे गुरुवार 22 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 10.30 च्या दरम्यान येथे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर व नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप  म्हैसेकर यांचे ते वडील होत. राज्यपाल चे. विद्यासागर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते यांनी प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना प्रकट केली असून, संदेशाद्वारे आदरांजलीही वाहिली आहे.  
प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांच्या पार्थिवावर येथील गोवर्धनघाट स्मशामनभुमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सुभाष साबणे, तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संस्था, संघटनांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. राज्यपाल चे. विद्यासागर यांच्या तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोकसंदेशांचेही वाचन करण्यात आले. राज्यपाल महोदयांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी  सुरेश काकाणी यांनी म्हैसेकर  यांच्या  निवासस्थानी  पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली  वाहिली  तसेच म्हैसेकर कुटुंबियांचे सांत्वनही केले.
मराठवाड्याच्या प्रागतीक वाटचालीसाठी ध्येयासक्त असणाऱ्यांमध्ये ज्या लोकांनी महत्वाची कामगिरी बजावली त्यांच्यापैकी डॉ. गो. रा. म्हैसेकर एक होते. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यानी ऊल्लेखनीय कामगिरी बजावली. 1976 ते 1982 या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. राज्य नियोजन समीती , राज्य तांत्रिक शिक्षण मुल्यमाप समिती, पंचायतराज मुल्यमाप समिती, राज्य एनसीसी कमिटी, ग्रामीण रोजगार हमी योजना- पागे समिती यामध्येही त्यांनी काम केले होते. मराठवाडा विकास परिषद व जनता विकास परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. नेरली येथे कुष्ठधाम उभारणीत मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र शिक्षण सल्लागार मंडळ, शिक्षण संशोधन परिषदेवरही प्राचार्य डॅा. म्हैसेकर यांनी काम केले होते.
गोवर्धनघाट स्मशानभुमी येथे झालेल्या शोकसभेत उपस्थित  विविध  संस्था, संघटनांचे पदाधिकारी, नागरीक आदींनी आदरांजली वाहिली.

000000
मराठवाड्यात शैक्षणिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञास मराठवाडा मुकला  : पालकमंत्री दिवाकर रावते
 संबंध मराठवाड्यात शैक्षणिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या एका जेष्ठ शिक्षण तज्ज्ञास मराठवाडा मुकला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांनी दिलेले योगदान त्याचप्रमाणे राज्यसभेत काम करीत असताना त्यांनी शैक्षणिक चळवळीला दिलेले महत्व, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देत असतानाच त्यांच्या शिक्षणाबद्दल कणव असलेल्या म्हैसेकरांनी अनेक विद्यार्थी घडविले. प्राचार्य म्हणून जी शिस्त त्यांनी अंगिकारली तसेच विद्यार्थ्यांना देखील शिस्तीचे धडे दिले. मराठवाडा जनता विकास परिषद त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समित्यांवर काम करीत असताना त्यांनी दिलेले योगदान मराठवाडा विसरु शकणार नाही. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो , या शब्दात नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कै. डॉ. गो. रा. म्हैसेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000000

लेख

पशुसंगोपन व्यवसायाच्या प्रोत्साहनासाठी विविध योजनांचा आधार

नैसर्गिक आपत्ती, अनियमित पर्जन्यमान यासारख्या अनेकविध कारणाने कृषी उत्पादनात घट होते, त्यातूनच शेतकरी अडचणीत सापडतो. अशावेळी शेतीला जोडधंदा व पुरक व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना आधार मिळतो. म्हणून राज्य शासनाने पशुसंगोपन, शेळीपालन व कुक्कूट पालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना सुरु केल्या आहे. नांदेड जिल्ह्याने या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. त्याविषयी….

शेतीला जोडधंदा पुरक व्यवसाय म्हणून पशुसंगोपन , शेळीपालन कुक्कूटपालन व्यवसाय करण्यात येतो.  पशुपालन व्यवसाय करुन स्वयंरोजगार निर्मिती होते. मानवी आहरासाठी दुध दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी , लोकर इत्यादी तसेच शेतीसाठी शेणखत यासाठी पशुधनाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आता पशुसंगोपन करणे हा जोडधंदा किंवा पुरक व्यवसाय राहता स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत आहे.
दारिद्रयरेषेखालील कुटुंबासाठी, अत्यल्प अल्प कुंटुंबातील पशुपालकांसाठी पशुसवंर्धनाच्या विविध योजना रोजगाराचे मुख्य साधन निर्माण झाले आहे. पशुपालकांनी स्वत:कडील पशुचे जातीने लक्ष देवून पालन पोषण करणे आगत्याचे आहे. त्यांना वेळेवर लसीकरण, औषधोपचार वेळेच्यावेळी करुन घेण्यासाठी जिल्हयाचे ठिकाणी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय  तसेच तालुक्याचे ठिकाणी तालुका लघु पशुवेद्यकीय सर्व चिकित्सालये अर्धापूर, कंधार, देगलूर, नायगाव धर्माबाद या 5 ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय स्थानिक स्तरावरील श्रेणी एकचे 74 पशुवैद्यकीय दवाखाने व श्रेणी-2 चे  104 पशुवैद्यकीय दवाखाने असे एकूण 184 पशुवैद्यकीय संस्था जिल्ह्यात कार्यान्वित आहेत.
जनावरांना घटसर्प, फ-या, लाळखुरकुत तसेच शेळया मेंढयाना आंत्रषिार , पीपीआर कुक्कूट वर्गीय पक्षांना लासोटा, राणीखेत, कोंबडयाची देवी इत्यादी ससंर्गजन्य आजार होत असतात. या जिवघेण्या आजारापासून संरक्षण व आर्थिक उत्पन्नाला बाधा येवू नये यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे 
पशुपालकांसाठी राज्य शासनाने पशुधन विमा योजना ही देखील एक वरदान ठरणारी योजना आहे. नुकताच 1 ऑगस्ट 2016 ते 15 ऑगस्ट 2016 या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा करण्यात आला. यामध्ये पशुपालकांकडील दुभत्या जनावराचा तसेच शेळया मेंढया इत्यादीचा विमा काढण्याची मोहिम राबविण्यात आली. पशुपालकांनी स्वताकडील बहुमुल्य जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी पशुधन विमा करणे आगत्याचे आहे. यामुळे पशुपालकांना नुकसान भरपाई विमा कंपनीकडून तात्काळ मिळू शकेल.
शेतक-यांचे दारात कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पशुधनाची वंशावळ टिकून रहावी यासाठी अनुवंशीक सुधारणा हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अधिक दुध उत्पादन देणा-या गाई म्हशीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येते. तसेच त्यांना उच्च वंशावळीच्या रेतनापासून कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यापासून जन्मलेल्या कालवडीसाठी 5 हजार रुपये धनादेशाद्वारे देण्यात येतात.
पशुपालकाकडे असलेल्या जनावरांना हिरवा चारा, कडबा हा बारीक कुटी करुन खाऊ घालणेसाठी 50 टक्के अनुदानावर 500 लाभार्थीना 2 एचपी विदयुत चलित कडबाकुटी यंत्राचे वाटप सन 2015-16 मध्ये करण्यात आले व सन 2016-17 मध्ये 500 कडबाकुटी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे वाया जाणा-या वैरणीची 40 टक्के बचत होईल.
जिल्ह्यात या वर्षातील आतापर्यत  पाऊस चांगला झालेला आहे. निसर्गाची साथ मिळालेली आहे. पावसाचे पाणी टिकवून ठेवणे त्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. ज्यामुळे किमान खरीप रब्बी या दोन हंगामामध्ये पिकांची लागवड चांगल्या प्रकारे होऊन अन्नधान्याचे व जनावरासाठी सकस चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. उन्हाळयातील चा-याची कमतरता भासू नये म्हणून मुबलक होणा-या चा-याचे उत्पादनातून मुरघास तयार करणे फायदयाचे ठरेल. यासाठी प्लास्टीकच्या चारा बॅगचाही वापर करता येईल. अतिरिक्त वैरणीचे उत्पादन मुरघासचे रुपात साठवून ठेवता येईल त्याचा वापर उन्हाळयाच्या दिवसात तसेच चा-याची कमतरता असलेल्या दिवसात करता येऊ शकेल.
शहरातील पशुपालकासाठी जमिनी अभावी वैरण उत्पादन घेणे शक्य नसते अशावेळी शहरानजिकच्या पशुपालकांकडून हिरवी, वाळलेली वैरण कुटी करुन विक्री करणे हा देखील व्यवसायरुपाने करता येवू शकेल उत्पन्नात वाढ करता येईल. शेतीला पुरक ठरणारा हा पशुसंवर्धन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून ओळखला जात आहे. या पूरक व्यवसायासाठी मिळणाऱ्या सोयी-सुविधा आर्थिक मदत, शेतकऱ्यांचा त्यामध्ये असणारा सहभाग या सर्व बाबींचा विचार केला तर नजिकच्या कालावधीत पशुसंवर्धन हा जोड व्यवसाय न रहाता मुख्य व्यवसाय म्हणून नावारुपास येईल.  
-         दिलीप गवळी,
जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

0000000
जिल्ह्यात हंगामात 90.99 टक्के पाऊस
गत 24 तासात सरासरी 22.97 मि.मी. 

           नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात  शुक्रवार 23 सप्टेंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 367.57 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 22.97 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 869.47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.   
जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. ( सर्वाधिक ते उतरत्या क्रमाने ) लोहा- 123.72, अर्धापूर- 106.87, भोकर- 105.93, नांदेड- 105.45, हदगाव- 98.75, कंधार- 94.41, मुखेड- 93.40, बिलोली- 92.10, माहूर- 89.80, नायगाव- 86.78, हिमायतनगर- 86.49, मुदखेड- 80.96, धर्माबाद- 80.17, उमरी- 75.30, देगलूर- 72.98, किनवट- 72.70. जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची  टक्केवारी  90.99 इतकी झाली आहे.     
जिल्ह्यात शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस  : नांदेड- 29.25 (961.64), मुदखेड- 23.33 (691.02), अर्धापूर- 33.00 (929.33) , भोकर- 9.75 (1055.50), उमरी- 18.67 (750.27), कंधार-12.17 (761.48), लोहा- 56.00 (1031.00), किनवट- 0.57 (901.46), माहूर-4.75 (1113.50), हदगाव- 6.86 (965.12), हिमायतनगर- 3.00 (845.31), देगलूर- 37.33 (657.01), बिलोली- 38.60 (891.60), धर्माबाद- 17.00 (734.05), नायगाव- 32.00 (794.60), मुखेड- 45.29 (828.56) आज  अखेर  पावसाची सरासरी 869.47  (चालू वर्षाचा एकूण पाऊस 13911.45) मिलीमीटर आहे. 

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...