Monday, October 16, 2023

 विशेष वृत्त


मुलींनो स्वातंत्र्य व जबाबदारीचे भान जपण्यातच भविष्यातील उज्ज्वल वाटा
- विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर
▪️नांदेड जिल्ह्यातील शेतीपासून ते प्रशासनात अपूर्व ठसा उमटविणाऱ्या
नवदुर्गांचा जिल्हा पोलीस विभागातर्फे विशेष सन्मान
  • एक हजार मुलींनी घेतली प्रेरणा
नांदेड, (जिमाका) दि. 16 :- शिक्षणाचे द्वार हे आपल्या जीवनाचा मार्ग समृद्ध करणारे असतात. आपल्याला नेमके काय व्हायचे आहे हे आगोदर ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा याचा विसर पडू देऊ नका. स्वातंत्र्याचा खरा अन्वयार्थ हा शिक्षणातून समृद्ध होत जातो. आपले स्वातंत्र्य ओळखून, वास्तवाचे भान ठेवून, स्वातंत्र्य जपण्यातच भविष्यातील उज्ज्वल वाटा आहेत. कोणत्याही स्थितीत आपल्या चारित्र्याशी तडजोड करू नका, असे वडिलकीचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांनी आज शालेय व महाविद्यालयीन मुलींना केले.
नांदेड जिल्ह्यातील शेतीपासून जिल्हा प्रशासनापर्यंत आपल्या कार्यातून अपूर्व ठसा निर्माण करणाऱ्या महिलांना जिल्हा पोलीसदलातर्फे “नवदुर्गा सन्मान” देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिला सुरक्षा व जनजागृतीच्या उद्देशाने कुसूम सभागृह येथे मुलींसाठी हा विशेष उपक्रम घेतला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, श्री. धरणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यादव, अश्विनी जगताप व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुलींच्या मनात आत्मविश्वास व प्रेरणा देण्यासाठी नवदुर्गा सन्मानाचे आयोजन
-जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
आपले घर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलून प्रत्येक महिला ही सशक्त नारीची भूमिका निभावत आहे. बदलत्या परिस्थितीत महिलांवर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या या आलेल्या आहेत. स्वत:चा विकास व ध्येय साध्य करण्यासाठी आपल्यावर कुठले दडपण येत असेल, मनात भिती निर्माण होत असेल तर ती जुगारून आत्मविश्वासाने बोलायला शिका, असा मंत्र जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुलींना दिला. सार्वजनिक जीवनात वावरतांना महिलांसाठी सुरक्षितेची भावना व वातावरण खूप अत्यावश्यक असते. ते वातावरण अश्वासीत ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाने समर्थपणे पेलून धरली आहे. भरोसा सेल हा याच सुरक्षितेसाठी, मदतीसाठी तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींचा मनात आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने “नवदुर्गा सन्मान” हा उपक्रम आम्ही जिल्ह्यातील विविध भागातही घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले.
नशीब नव्हे तर कठोर परिश्रमच आपल्याला मोठे करतात
- दलजीत कौर जज
कोणत्याही व्यक्तीला कठोर परिश्रमाशिवाय यश साध्य करता येत नाही. मोठे होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी नशीब नव्हे तर कठोर परिश्रम आवश्यक असते यावर विश्वास ठेवून आपल्या ध्येयासाठी तत्पर रहा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांनी मुलींना केले. प्रत्येक ठिकाणी आपण सावधानता व चौकश असले पाहिजे. सदैव दक्ष असल्यास कोणत्याही अडचणी येऊ शकत नाहीत. कोणत्याही आव्हानात आपला आत्मविश्वास आपल्याला शक्ती देतो हे विसरू नका, असे त्यांनी सांगितले. मुलांशी मैत्री यात चुक नाही. मैत्रीमध्ये पावित्र्य हवे. याचबरोबर आपल्या पालकांचा विश्वास संपादन करणे हे मुलींनी विसरता कामा नये. तुमच्या सुरक्षिततेसाठी असंख्य कायदे असून अन्याय होत असल्यास तो सहन करू नका, असे दलजीत कौर जज यांनी सांगितले. यावेळी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी मुलींशी संवाद साधला. तुम्हाला जे क्षेत्र निवडायचे आहे ते क्षेत्र तुम्ही निवडू शकता. आपण हे करू शकतो असा मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर येथे बचतगटाच्या माध्यमातून पुदिना व कोथींबीरची यशस्वी शेती करणाऱ्या रफिया बी शेख आरीफ, किनवट तालुक्यातील पैंदा व परिसरात एकल शाळा चालविणाऱ्या छाया रामराव कांगणे, भरोसा सेल येथे कार्यरत सुचित्रा भगत, रामनगर परिसरात अनाथ मुलींचे वसतीगृह समर्थपणे चालविणाऱ्या प्रिती अनिल दिनकर, प्राध्यापक कल्पना जाधव, भाग्यश्री जाधव, स्नेहा पिंपरखेडे, किनवट येथील कोलाम जमातीच्या दामोबाई भिमराव कोडपे आणि नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांना त्यांच्या क्षेत्रातील अपूर्व योगदानाबद्दल “नवदुर्गा सन्मान” मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
00000














 न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचा 18 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा दौरा  

                                                                                    

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) न्यायाधीश उच्च न्यायालय व समिती सदस्य यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

 

बुधवार सकाळी 10.50 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे बैठकीस उपस्थिती. दुपारी. 1 ते 2 वा. राखीव. दुपारी 2 ते 4 वा. नागरिकांकडून पुरावे स्वीकारणे.  स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड . सायं. 4.10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वा. राखीव.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...