Tuesday, January 30, 2024

 वृत्त क्र.  90

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789, एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158, ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

000000

 वृत्त क्र.  89

दहावी परीक्षेच्या ऑनलाइन प्रवेश पत्राबाबत आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 30 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,  शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींसाठी आवाहन करण्यात आले आहे की,  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परिक्षा मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळा मार्च 2024 च्या माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार 31 जानेवारी 2024 पासून स्कुल लॉगईन मध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. असे आवाहन राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करुन घेण्यासाठी मार्च 2024 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र हॉल तिकीट उघडताना काही त्रुटी आल्यास सदर प्रवेशपत्र गुगल क्रोम मध्ये उघडावे.

प्रवेशपत्र हॉल तिकीट ऑनलाईन पध्दतीने प्रिंट करुन देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत. प्रवेश पत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र द्यावयाचे आहे. मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक,  सर्व माध्यमिक शाळांनी वरील बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र.  88

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदपाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.

 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतीलअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

00000

 वृत्त क्र.  87

 

क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मविश्वास

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

·         स्पर्धेत जिल्ह्यातील 611 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा, अभ्यासासोबत त्यांच्यातील इतर कला गुण जोपासले जावेत यासाठी दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धामध्ये सहभागी झालेल्या दिव्यांगांनी सर्वसामान्यांसारखे आपण सर्व गोष्टी करु शकतो हा आत्मविश्वास बाळगून या स्पर्धेत उतरावे व येथून एक नवी आठवण घेवून जावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा-2024 पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे आदी अधिकारी यांची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यातील दिव्यांग शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

आजच्या घडीला दिव्यांगांनी प्रत्येक क्षेत्रात आपली नवी ओळख बनविलेली आहे. समाज कल्याण विभागाने मागील काही दिवसात दिव्यांगांची मतदार नोंदणी व जागृती केली. दिव्यांगाना मतदान करण्यासाठी आता मतदान केंद्रावर जाण्याची गरज नसून घरी बसल्या-बसल्या मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शासकीय विभागांनी दिव्यांगाना अनेक उपक्रमात सेवा-सुविधा पुरविण्यात पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

 

दिव्यांगामध्ये एक अलौकिक, दिव्य  शक्तीचा समावेश असतो. त्या अलौकिक शक्तीचा वापर करुन या स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे प्रोत्साहनपर आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना केले. तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने शुभेच्छा दिल्या. यावेळी 50 मीटर कुबडीवर चालणाऱ्या दिव्यांगांच्या धावण्याच्या स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.

 

यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते अद्भूत असे पथसंचलन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील मुकबधीर 156 विद्यार्थीअस्थिव्यंग 220, अंध 145, मतिमंद 90 असे एकूण 611 दिव्यांग विर्द्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत मुकबधिर विद्यार्थी 50 व 100 मीटर धावणे,  लांब उडी, गोळा फेक आणि मतिमंद विद्यार्थ्यांसाठी स्वाप्ट बॉल थ्रो, गोळा फेक, लांब उडी, पळत येवून लांब उडी, 50, 100, 200 मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहेत. तसेच अस्थिव्यंग साठी  50, 100, 200 मीटर धावणे, पोहणे, व्हिल चेअर रेष, कुबडीवर चालणे, सरपटत चालणे, बास्केट मध्ये बॉल टाकणे इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहेत.अंध विद्यार्थ्यांसाठी बुध्दीबळ, धावणे, 50, 100, 200 मीटर धावणे, गोळा फेक, पासिंग द बॉल इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहेत, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. तर सुत्रसंचलन मुरलीधर गोडबोले यांनी केले.

00000

छायाचित्र- पुरूषोत्तम जोशी, नांदेड 






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...