Tuesday, April 11, 2017

शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या
वाहनांची फेरतपासणी करावी
नांदेड दि. 11 :- उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षा विषयक फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांनी कळविले आहे.
शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी नोंद केलेली वाहने  (स्कूल बस) वाहन हे सुरक्षाविषयक तरतुदीचे काटेकोरपणे पालन करतात किंवा कसे याबाबत ही तपासणी करण्यात येणार आहेतपासणी पूर्णत: निशुल्क असून मोटार वाहन कायदा कलम 56 अंतर्गत वाहनाचे जारी केलेले योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरीही स्कूल बसची चाचणी करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच जे स्कूलबस धारक या तपासणीसाठी वाहन कार्यालयात सादर करणार नाहीत त्यांचा परवाना रद्द करण्यात येवून वाहन तपासणीमध्ये जप्त करण्यात येईल.
सर्व स्कूल बसचे चालक, मालक यांनी आपल्या वाहनाचे वैध कागदपत्रे व वाहनाचा परवाना इत्यादीसह वाहनासोबत  कार्यालयात तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000
जिल्ह्यात 14 एप्रिलला दारु दुकाने बंद 
नांदेड दि. 11  :-  नांदेड जिल्ह्यात व शहरात शुक्रवार 14 एप्रिल 2017 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्सव प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दारु विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड निर्गमीत केले आहे.
या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुसूचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी यांनी शुक्रवार 14 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.  

00000000
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना
अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार प्रदान
नांदेड, दि. 11- जिल्ह्यात शुक्रवार 14 एप्रिल ते रविवार 30 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरा केली जाणार आहे. त्याकरीता मिरवणुका, विविध कार्यक्रम यांच्या अनुषंगाने या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्थानकांचे प्रभारी अधिकारी, बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना शुक्रवार 14 एप्रिल ते रविवार 30 एप्रिल 2017 च्या मध्यरात्री पर्यंत अंमलबजावणी अधिकारी म्हणून अधिकार प्रदान केला आहे.  
या अधिकारान्वये संबंधीत अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे अधिकारी राहणार आहेत. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणून ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणेचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलम 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्थनकांचे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिरसभा, मोर्चे, मिरवणूक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्वपरवानगी शिवाय आयोजीत करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करावेत. जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांची शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप कर्णिक यांच्या आदेशात म्हटले आहे.

                                                        00000000

लेख -

नांदेडवासियांसाठी विरंगुळा आणि पर्यावरण
पर्यटनाची संधी : बोंडारचे जैवविविधता उद्यान
नांदेड शहरापासून निळा रोडवर 8 कि.मी. अंतरावर असलेले स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान बोंडार हे पर्यटन स्थळ बनत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या 10 हेक्टर क्षेत्रावर उद्यान उभारले जात आहे. बोंडार, चिखली, नेरली, चिमेगाव व पुयनी हे पाच गावे उद्यानाच्या दोन ते अडीच कि.मी. परिसरालगत आहेत. शहराबरोबर या परिसरातील नजिकच्या गावातील नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, निसर्गप्रेमी या उद्यानास आवर्जून भेट देवून जैवविविधतेचा अनुभव व आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
बोंडार येथे या उद्यानाचे काम सन 2015-2016 मध्ये सुरु करण्यात आले असून सन 2018-2019 मध्ये पूर्ण होणार आहे. परंतू जानेवारी 2016 पासून सुरुवात होवून जवळपास एक वर्षात या उद्यानात विविध प्रजातीच्या वृक्षाची लागवड, लोकासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा, वृक्ष संवर्धनाची घेतलेली विशेष दक्षता यामुळे वृक्षवाढ ही चांगली होत आहे व निसर्ग प्रेमींना ही पर्वणी ठरत आहे. सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत. तसेच 2.25 टीसीएम क्षमतेचे शेततळे, 80 मीटर्सचा माती नाला बांधही बांधण्यात आला आहे. उद्यानात आँक्सीजन वन, तसेच नक्षत्रवन तसेच विविध फळ, औषधी वनस्पती, सर्वधर्म वृक्ष वन आदीं वने समाविष्ट आहेत.
या उद्यानात सर्वधर्म समभाव वनात एकूण 27 प्रजातीचे 279 वृक्ष, करंज वन, निम वन, ऑक्सीजन वन, डिंक वन, आम्र वन, जांभुळ वन, जांब वन, आवळा वन, बांबू वन, नक्षत्र वन, औषधी वन, बाल उद्यान या बरोबरच दहा प्रकारच्या प्रजातीचे वृक्षाची लागवड केलेले तुळशी वृंदावन यासारखी विविधतेने हे उद्यान नटलेले आहे.
या उद्यानात वृक्ष लागवडी बरोबर भेटी देणाऱ्यासाठी विविध निरिक्षण कुटी, स्वच्छता गृह, पाणी / सिंचन व्यवस्था, आसन व्यवस्था, उर्जा व्यवस्था, पाण्याचे कारंजे, भांडारगृह, स्वच्छता कचरा, रोपे ठेवण्याची व्यवस्था, कॅक्टस गृह, लोखंडीपूल, ध्यानकेंद्र, बालउद्यानात खेळाचे साहित्य, पार्किंग ग्रॉऊड आदी सारख्या विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या बोंडार येथील उद्यानात रोपेही तयार केली जात आहे. मानगा बाबुची शास्त्रीय रोप निर्मितीही केली जाते. रेनट्री, काशीद, वड, पिंपळ, चंदन, आवळा सारख्या 18 प्रजातीच्या वृक्षांची रोपेही तयार केली जातात. त्याची संख्या सुमारे 1 लाख 17 हजार 600 एवढी आहे. सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत.  
तापमानात झालेली प्रचंड वाढ आणि ऋतुचक्रातील बदल हा जागतीक पातळीवर चिंतेचा विषय बनत आहे. अनियमित पाऊस त्यातून निर्माण होणारी पाणीटंचाई सारख्या समस्या निर्माण होवून लागल्या आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीतलावरील जीवसृष्टी सुरक्षित रहाण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनही काळाची गरज निर्माण झाली आहे. शासन स्तरावर वृक्ष लागवडीच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध उपक्रम योजनाच्या आधाराने वृक्ष लागवड व संवर्धन केले जात असतांना त्यात जनतेचाही सहभाग महत्वाचा आहे. वृक्षामधील काही प्रजाती दुर्मिळ होत आहे. त्याची संख्या वाढावी, जैवविविधता टिकावी म्हणून बोंडार येथील जैवविविधता उद्यानाचा सामाजिक वनीकरण विभागाचा हा उपक्रम निश्चित दिशादर्शक आहे.
 - दिलीप गवळी
 जिल्हा माहिती अधिकारी , नांदेड

*********

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...