Wednesday, October 31, 2018


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौडमध्ये विविध घटकांचा सहभाग ;
सरदार पटेल यांना अभिवादन
नांदेड दि. 31 :- विविधतेतील एकतेचा मंत्र घेवून लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज शहरात एकता दौड संपन्न झाली. या दौडमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसह विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उत्साहात सहभागी झाले. महात्मा गांधी पुतळा परिसर वजिराबाद ते जुना मोंढा टॉवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत एकता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये सुरेख वेशभूषेतील विद्यार्थी, अग्निशमन व पोलीस दलाच्या पथकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.   
एकता दौडच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर एकता दौडचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. 
दौडमध्ये महापौर श्रीमतीर शिलाताई भवरे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर,  प्रवीस साले, दिलीप ठाकूर, प्रा. नंदू कुलकर्णी, छायाचित्रकार विजय होकर्णे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आदि सहभागी होते.
तसेच पोलीस दलाच्या पथकाने वाद्य वृदांसह संचलन करत या दौडमध्ये सहभाग घेतला. महात्मा गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक ते वजिराबाद मार्केट रस्ता, महावीर चौक, जुना मोंढा टॉवर या ठिकाणाहून एकता दौड मार्गक्रमण झाली. या दौडमध्ये सहभागी घटकांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या घोषणा दिल्या. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीपर फलक घेवून दौडमध्ये सहभागी झाले.  
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात दौडमध्ये सहभागी पथके, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांनी  एकतेच्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा व दक्षता जनजागृती दिनानिमित्त शपथ दिली. दौडमध्ये विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  
00000


लोकशाही दिनाचे 5 नोव्हेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 5 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पुढील महिण्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000


सैनिकी शाळा सातारा येथील प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड दि. 31 :- सैनिकी शाळा सातारा येथे इयत्ता 6 वी व 9 वीसाठी सन 2019-20 सत्राच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. ऑनलाईन परिपूर्ण भरलेले अर्ज 26 नोव्हेंबर 2018 रोजी पर्यंत भरावयाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी sainikschooladmission.in www.sainiksatara.org.in या संकेतस्थळाला भेट दयावी.  प्रवेश  परिक्षा रविवार 6 जानेवारी 2019 रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षा ओएमआर या पद्धतीने घेतली जाणार आहे. यातील उत्तरे बहुपर्यायी असतील. शाळेचे माहितीपत्रक वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
इयत्ता सहावीसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 1  एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. निवड पद्धत लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी परीक्षेद्वारे व प्रवेश गुणवत्तेवर दिला जाईल. अंदाजे जागा 63 आहेत.
इयत्ता 9 साठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2006 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. सध्या मान्यता प्राप्त शाळेत इयत्ता 8 वीत शिकत असावा. निवड पद्धत लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी परीक्षेद्वारे व प्रवेश गुणवत्तेवर दिला जाईल. अंदाजे जागा 7 आहेत. अंदाजे जागांची संख्या शाळेतून उत्तीर्ण व सोडून जाणाऱ्या संख्येनुसार कमी जास्त होईल. 
ऑनलाईन अर्ज जमा होण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2018. प्रवेश परिक्षा नोंदणी शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे. परिक्षा नोंदणी शुल्क सामान्य वर्ग, संरक्षण दलातील आजी / माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 400 रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील मुलांसाठी 250 रुपये राहील. राखीव जागा अनुसूचित जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती 7.5 टक्के यातून उरलेल्या जागांपैकी 67 टक्के जागा महाराष्ट्रातील मुलांसाठी तर 33 टक्के जागा इतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील मुलांसाठी पुरुष लोकसंख्येवर आधारीत राखीव आहेत. आजी व माजी सैनिकांच्या मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव राहतील. प्रवेश परिक्षा केंद्र इयत्ता 6 वीसाठी अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि इयत्ता 9 वीसाठी सातारा येथे राहील.
अपूर्ण भरलेले अर्ज रद्य केले जातील. मुदतीनंतर ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. तसेच ऑनलाईन भरलेला अर्जाच्या रक्कमेची परतफेड होणार नाही. अधिक माहितीसाठी शाळेच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट दयावी किंवा शाळेच्या 02162-235860 / 238122 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. सैनिक शाळा सातारा हे प्रवेश परिक्षेसंदर्भात कोणत्याही मार्गदर्शन केंद्राला किंवा एजंटला प्रोत्साहन देत नाही. शाळेत प्रवेश फक्त लेखी परीक्षा व वैद्यकीय चाचणीच्या आधारे दिला जातो. धोरणात वेळोवेळी बदल झाल्यात ते बदल करण्याचे अधिकार शाळा प्रशासनास आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000


जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे
सहावीच्या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरु   
 नांदेड दि. 31 :- बिलोली तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर  येथे इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी शनिवार 6 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया  25 ऑक्टोंबर पासून सुरु झाली आहे. यासाठी संबंधितांनी www.navodaya.gov.in www.jnvnanded.com या वेबसाईटवर click here to registration for admission class vi 2018-19 वर जावून विनामुल्य अर्ज करता येणार आहे.
नांदेड जिल्हयातील चालू शैक्षणिक वर्षात 2018-19 मध्ये वर्ग 5 वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या  सर्व शासकीय / निम शासकिय  मान्यता प्राप्त शाळेतील विद्यार्थी सलग्न तीन शैक्षणिक वर्ष 2016-17, 2017-18, 2018-19 मध्ये वर्ग तीसरी, चौथी व पाचवी या वर्गात खंड न पडता उतीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करतांना विद्यार्थ्यांचे वय जन्म दिनांक  1 मे 2006 ते 30 एप्रिल 2010 दरम्यान असणे आवश्यक आहे.
सर्व वर्गवारीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश परिक्षेचे ऑनलाईन अर्ज वरील संकेतस्थळावर करता येईल. विद्यर्थ्यांचे अर्ज ऑनलाईन करताना विद्यार्थ्यांचा फोटो 10-100 केबीपेक्षा कमीमध्ये जेपीजी फाईलसह व स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी व शाळा मुख्याध्यापकांचे सही व शिक्यासह प्रमाणपत्र स्कॅन कॉपी अपलोड करावे लागेल.  तसेच इयत्ता  5 वी शिक्षण घेत असलेल्या चालू  विद्यार्थ्यांची शाळा जर ग्रामपंचायत हद्यीतील असेल तर ग्रामीण म्हणून उल्लेख करावा. जर शाळा नगरपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका हद्दीतील  असेल तर शहरी म्हणून  ऑनलाईन अर्जामध्ये उल्लेख करावा.  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही अडचण आल्यास जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे हेल्पलाईन नंबर 9689711060 वर कार्यालयीन वेळेत सकाळी 9.30 ते दुपारी 1.40 व दुपारी 3 ते 5.30 पर्यंत संपर्क करु शकता. अशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2018 आहे. 
ही प्रवेश परिक्षा शनिवार 6 एप्रिल 2019 रोजी प्रवेश परिक्षा नांदेड जिल्हयातील तालुकानिहाय संबंधित परिक्षा केंद्रावर घेण्यात येईल. संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, पालक  व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन  शंकरनगर जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
0000000


लवादा नामतालिका तयार करण्यासाठी
अर्ज करण्याची 1 ते 30 नोव्हेंबर मुदत
 नांदेड दि. 31 :- बहूराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी लवाद नामतालिका (Arbitrator Panel) तयार करण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शिवाजी चौक लातूर ता. जि. लातूर यांचे कार्यालयात दिनांक 1 नोव्हेंबर 2018 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आहे.
बहूराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी लवाद नामतालिका (Arbitrator Panel) तयार करणेसाठी पुढील व्यक्तिंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  सर्व न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग डव्होकेटस्, चार्टर्ड अकौंन्टंट, कॉस्ट अकौंन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे), सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षावरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी (ज्यांना सेवानिवृत्त होऊन दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे).
अशा व्यक्तींची नियुक्ती करताना उक्त अधिनियमामध्ये नमूद नसले तरीही पुढील प्रमाणे जादा अर्हता / पात्रता असाव्यात. त्यांचेवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय / बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत (Black List) मध्ये समाविष्ट नसावी. सदर व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. (लातूर, उस्मानाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यातील). सदर व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते.
               प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी प्रारुप लवाद नामतालिका प्रसिध्द होईल. सदर प्रारुप नामतालिका यादी संबंधीत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामीकेवर हरकती असल्यास drcslaw@gmail.com या ई-मेल वर पूराव्यासह हरकती दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत सादर कराव्यात. हरकतीचा निर्णय करुन दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी अंतीम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहिर सूचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे लातूर सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
000000


केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 31 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश देण्यात येत आहे.
केळीच्या पिकाच्या पानावर छोटे, छोटे पिवळे डाग बुडाकडील पानावर आढळुन येत असतील तर कार्बेन्डॅझिम 50 डब्लु पी 0.1 टक्के द्रावण म्हणेच 1 ग्रॅम + 1 मिली स्टीकर प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे जर पानावरील ठिपके यांचा आकार वाढुन एकमेकात मिसळुन मोठे करडे आकाराचे ठिपके आढळुन येत असतील तर कार्बेन्डॅझिम 0.5 टक्के 0.5 ग्रॅम+  मिनरल ऑईल 1 टक्के 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळुन फवारावे, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000


निवृत्ती वेतनधारकांना आवाहन
नांदेड दि. 31 :- जिल्हा कोषागार अंतर्गत निवृत्ती वेतन घेणारे निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी 1 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2018 या कालावधीत ते त्यांच्या बँकेतून निवृत्ती वेतन घेत असलेल्या बँकेत अद्ययाक्षर निहाय यादी बँकेकडे पाठविली आहे.
निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत उपस्थित राहून यादीतील त्यांचे नावासमोर स्वाक्षरीच्या रकाण्यात शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा ठसा उमटवावा. पूर्नविवाह तसेच पूर्ननियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवावी. या पद्धतीशिवाय बायोमॅट्रीक्स पद्धतीने जीवन प्रमाण दाखला देता येतो. http://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर 1 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत सादर करण्याची सुविधा आहे. या यादीत ज्यांचे हस्ताक्षर नसतील त्यांचे माहे डिसेंबर 2018 चे निवृत्ती वेतन अदा केले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


धर्माबाद कृ.उ.बा.समिती निवडणूक क्षेत्रात
शनिवारचा आठवडी बाजार बंद राहणार
नांदेड दि. 31 :- धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे मतदान शनिवार 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणूक क्षेत्रात जारीकोट व चिकाना या ठिकाणी भरणारा आठवडी बाजार शनिवारी 3 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केला आहे.  
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी मार्केट ॲड फेअर ॲक्ट 1862 चे कलम 5 अन्वये या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यादृष्टिकोनातून हा आदेश काढला आहे. याठिकाणचा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार 4 नोव्हेंबर 2018 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000


6 नोव्हेंबरपासून रंगणार ! बंदा घाटवर दिवाळी पहाट
नांदेडच्या रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नांदेड दि. 31 :- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, वाघाळा शहर मनपा व सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या गोदावरी नदीच्या रम्य तीरावर बंदाघाट येथे दरवर्षी घेतला जाणारा दिवाळी पहाट  हा कार्यक्रम यावर्षी दि. 6, 7, 8 नोव्हेंबरपर्यंत संपन्न होणार आहे. गेल्या काही वर्षापासून बंदाघाट वरील या रम्य दिवाळी पहाट   ची किर्ती दूरवर पसरली आहे. त्यामुळे नांदेड शहरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील रसिक मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. आतापर्यंत नांदेडच्या दिवाळी पहाट   या कार्यक्रमात राहुल देशपांडे, राजा काळे, हेमा उपासनी, अनुजा वर्तक , अरविंद पिंगळे, त्यागराज खाडीलकर, आरती दिक्षित, पं. ब्रजेश्वर मुखर्जी या दिग्गज कलावतांनी या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे.
यावर्षी दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.45 वाजता "गौरव महाराष्ट्राचा" या मालिकेतील विजेती महागायिका सौ. धनश्री (देव) देशपांडे हिच्या संघाची "स्वर दिवाळी" ही सुगम संगीताची सुरेल मैफील सादर होणार असून याच कार्यक्रमात झी सारेगामाचा अंतिम विजेता मयुर सुकळे व उपविजेता अक्षय घाणेकर यांचीही हजेरी लागणार आहे. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन सुप्रसिध्द निवेदक डॉ. नंदकुमार मुलमुले हे करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता "सांज दिवाळी" साजरी होणार असून या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती निलकंठ पाचंगे यांची आहे. यात सुप्रसिध्द बासरीवादक ऐनोद्दीन वारसी तसेच सुप्रसिध्द तबलावादक  खंडेराव मुळ्ये (उस्मानाबाद) यांची जुगलबंदी सादर होणार आहे. तसेच नव्याने महाराष्ट्रात प्रसिध्द झालेली नांदेडची कन्या गुंजन शिरभाते हिचे व्हायोलीन वादन होणार आहे. त्यानंतर नांदेडचे सुप्रसिध्द नर्तक डॉ. भरत जेठवाणी आणि सुप्रसिध्द नृत्यांगना ईशा जैन व युवा नर्तक अथर्व चौधरी यांचे भरत नाट्यम् व कुच्चीपुडी नृत्य सादर होणार आहे. तसेच प्रथित यश नृत्य सम्राज्ञी व अभिनेत्री शर्वरी जनेनीसची शिष्या व मराठवाड्यातील एकमेव महिला संगितकार आंनदी विकास यांची कन्या भार्गवी देशमुख हिच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द गझलकार बापु दासरी हे करणार असून या कार्यक्रमाचे निर्मितीसाथ पत्रकार विजय बंडेवार यांनी केली आहे.
दुसरे दिवशी दि. 7 नोव्हेंबरला सकाळी 5.45 वाजता कोलकत्याचे सुप्रसिध्द शास्त्रीय गायक पं. ओंकार दादरकर यांची संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात बंदीश, ठुमरी, दादरा व नाट्यगीते अशा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.
तिसरे दिवशी दि. 8 नोव्हेंबर रोजी गुरुवार "दिवाळी पाडवा पहाट" आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी पहाटे 5.45 वाजता सुप्रसिध्द निवेदक ॲड गजानन पिंपरखेड यांची संकल्पना व निवेदन असलेला "रामप्रहर" हा संगीतकार राम कदम यांनी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती पत्रकार विजय जोशी यांची असून डॉ. प्रमोद देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. झी सारेगम फेम योगेश रनमले तसेच औरंगाबादच्या सुप्रसिध्द गायिका सौ. धनश्री सरदेशपांडे सहभागी होत असून नांदेडचे स्थानिक कलावंत, विलास गारोळे, सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर, सौ. माधुरी पाटील वाकोडकर व कु. माधवी पाठक हे कलावंत सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, लेखाधिकारी उच्च शिक्षण तथा समन्वयक निलकंठ पाचंगे, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. वाधवाजी तसेच महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी तसेच प्रसार माध्यम सांभाळणारे प्रजावावणीचे संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी, स्वयंवर प्रतिष्ठानचे सुनिल नेरलकर , रत्नाकर अपस्तंभ आनंदी विकास, हर्षद शहा, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, सरेश जोंधळे, विजय होकर्णे, लक्ष्मण संगेवार, बापू दासरी, विजय बंडेवार, गिरीश देशमुख आणि ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...