Friday, October 18, 2019


अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची रविवारी तपासणी
नांदेड, दि. 18 :- सोमवार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी अपॉईंमेंट घेतलेल्या सर्व वाहन मालक, चालकांनी त्यांचे वाहन रविवार 20 ऑक्टोंबर 2019 रोजी योग्यता प्रमाणपत्रासाठी नूतनीकरणाच्या तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान निमित्त सोमवार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी  रोजी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे सोमवार 21 ऑक्टोंबर रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या वाहनांची तपासणी रविवार 20 ऑक्टोंबर 2019 रोजी करण्यात येणार आहे.
00000


हरवलेल्या व्यक्तीचा शोध 
नांदेड दि. 18 :-  पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत बळीरामपुर वाडी येथील गंगाधर दत्ता कदम (वय 27 वर्षे) हा इसम मतीमंद असून त्यास फिट्स (घुरा) येतात. सदर व्यक्ती 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वा. बळीरामपूर वाडी येथून बेपत्ता आहे. त्याचे वर्णन रंग सावळा असून चेहरा लांबट, उंची 4 फुट 5 इंच, बांधा मध्यम, पोशाख पिवळा शर्ट, लालसर रंगाचा पॅट, केस काळे, नाक सरळ जाड, दाढी उगवती, विशेष ओळख मतीमंद आहे. बोली भाषा मराठी येते. या व्यक्तीची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण 02462-226373 मो. 9637706877 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड यांनी केले आहे.
00000


दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी
आवश्यक सोयी सुविधा मिळणार  
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 18 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये सामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
सामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्विप कक्षामार्फत प्रशासन प्रयत्नकरीत आहे. त्याअनुषंगाने नांदेड उत्तर मतदारसंघाचा स्वीप कक्ष व दिव्यांग सहायता कक्ष तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ऑक्टोंबर 2019 रोजी नेरली कुष्ठाधाम येथे अंध, मतिमंद, कुष्ठरोगी यांच्यासाठी मतदार जनजागृती मेळावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे बोलत होते.
या मेळाव्यास उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, निवडणुक निर्णय अधिकारी 86 नांदेड उत्तर तथा उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मतदार यादीत दिव्यांग मतदार चिन्हांकित केल्याचे सांगून विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 करिता सर्व प्रकारच्या व दिव्यांग व्यक्तींनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रोहयो सदाशिव पडदुणे यांनी दिव्यांग मतदार यांच्यासाठी नांदेड उत्तर मतदारसंघात मतदानासाठी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती देवून दिव्यांगांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
यानंतर सर्व उपस्थितांना मतदान करण्याची प्रतिज्ञा स्विप कक्षातील श्रीमती कविता जोशी यांनी दिली. कार्यक्रमास उपस्थित सर्व अंध, मतिमंद, कुष्ठरोगी यांना प्रशासनाकडुन अल्पोपहार देण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन दिव्यांग सहायता कक्षातील श्री निर्मल व इतर सदस्य, सावित्रीबाई फुले अंध विद्यार्थीनींची कर्मशाळा नांदेड, नंदनवन प्रौढ मतिमंदांची कृषी कार्यशाळा, नेरली व कुष्ठधाम नेरली नांदेड यांचे सहकार्याने 86 नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर यांनी केले.
000000


मेरा नांदेड व्होट करेगा, सारा नांदेड व्होट करेगा, व्होट कर नांदेडकर,
घोषवाक्याने दुमदुमली नांदेड नगरी




नांदेड, दि. 18:-जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले.  याचाच एक भाग म्हणून आज नांदेड शहरात मतदान जनजागृती साठी भव्य पदयात्रा काढण्यात आली. व्होट करेंगा, व्होट करेंगा, सारा नांदेड व्होट करेंगा, व्होट कर नांदेडकर या घोषवाक्यांनी नांदेडनगरी दुमदुमून गेली.
या पदयात्रेस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवली. जुना मोंढा येथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. आज सकाळी 6-30 वाजता पदयात्रा मार्गस्थ होवून जुना मोंढा, महावीर चौक, वजिराबाद, एस.पी. ऑफिस, कलामंदिर, शिवाजी नगर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय परिसर येथे समारोप करण्यात आला. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदारांसाठीची प्रतिज्ञा घेतली.
यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके , लायन्स क्लबचे पदाधिकारी, नागरिक, महिला ,शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी स्वीप जिल्हा कक्ष प्रमुख शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रलोभ कुलकर्णी, रवी ढगे, स्काऊटचे दिगंबर करंडे, शिवकाशी तांडे, दत्ता धुतडे, यांनी परिश्रम घेतले.
कै. नाना पालकर प्राथमिक शाळा, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर, नागार्जुना पब्लिक स्कूलविद्या निकेतन पब्लिक स्कूल, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, स्केटिंगची मुले, लाइन्स क्लब, रोटरी क्लब ,विविध शिक्षक संघटना, सेवाभावी संस्था, नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंडळ आदींचा रॅलीमध्ये सहभाग होता.
नांदेड लायन्स क्लब नांदेड मिटटाऊनच्यावतीने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर पुष्पवृष्टीकरुन पदयात्रेचे स्वागत केले. यावेळी उभारण्यात आलेल्या आकर्षक सेल्फी कॉर्नर छायाचित्र काढण्याचा आनंद घेतला.              श्री विद्यानिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयावर पथनाट्य सादर केले.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...