Tuesday, November 22, 2016

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या
निवडणुकीत काँग्रेसचे राजुरकर विजयी
मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न
नांदेड, दि. 22 :-  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमरनाथ अनंतराव राजुरकर यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी आज येथे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे पार पडली. मतमोजणीनंतर श्री. राजूरकर यांनी आवश्यक मताधिक्य मिळवत विजय संपादन केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील उपस्थित होते.
नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमरनाथ अनंतराव राजुरकर व अपक्ष उमेदवार श्यामसुंदर दगडोजी शिंदे असे दोन उमेदवार होते. निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 472 पैकी 471 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज बचत भवन येथे कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली.
मतमोजणीपुर्वी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांना निर्देश दिले. यावेळी दोन्हीही उमेदवार तसेच त्यांचे मतमोजणी प्रतिनीधीही उपस्थित होते. तीन टेबलवर मतमोजणी अधिकारी, सहायक अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत 459 मते वैध ठरली. त्यापैकी अमरनाथ राजूरकर यांना 251 मते मिळाली. तर श्यामसुंदर शिंदे यांना 208 मते मिळाली. मतमोजणीत 12 मते अवैध ठरविण्यात आली.
मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी श्री. काकाणी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार यांना विजयी घोषित केले. विजयी उमेदवार श्री. राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्यासह मतमोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी आदींसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
मतमोजणी प्रक्रिया तसेच स्थानिक प्राधिकारी निवडणुकीची सर्वच प्रक्रिया शांतता व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच विविध घटकांचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले.

00000
26 नोव्हेंबर रोजी संविधान
दिन साजरा करावा - जिल्हाधिकारी
नांदेड, दि. 22 :- भारतीय संविधानची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी हा दिवस साजरा करावा, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी परिपत्रक जारी केले आहे.
या दिनानिमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेतील उद्देशिकेचे सामुहीक वाचन करावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच जनजागृती व्हावी म्हणून शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने व इतर कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे परिपत्रकात आदेशित करण्यात आले आहे.

000000000
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2016  या वर्षासाठी शनिवार 10 डिसेंबर 2016 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
        जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे ईएम भाग-2 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे व कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शनिवार 10 डिसेंबर 2016 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावाअसे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000


रास्तभाव धान्य दुकानात
डिसेंबरसाठी साखर उपलब्ध
नांदेड दि. 22 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी डिसेंबर 2016 साठीची साखर रास्तभाव धान्य दुकानात उपलब्ध झाल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी  नांदेड  यांनी कळवले आहे
या नियतनानुसार  प्रती  व्यक्ती 500 ग्रॅम प्रमाणे साखर प्रौढ अथवा मुल-बालक अशा भेदभाव न करता शिधापत्रिकाधारकांना साखर वितरीत करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्याला आवश्यक 4 हजार 575 क्विंटल साखरेचा पुरवठा उपलब्ध झाला आहे. तालुका निहाय उपलब्ध साखर पुढील प्रमाणे क्विंटल मध्ये : नांदेड-511, हदगाव-381, किनवट-546, भोकर-177, बिलोली-294, देगलूर-271, मुखेड-523, कंधार-358, लोहा-318, अर्धापूर-126, हिमायतनगर-190, माहूर-188, उमरी-150, धर्माबाद-152, नायगाव-251, मुदखेड-139. याची शिधापत्रिकाधारकांनी नोंद घेवून स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहनही  जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...