Monday, September 19, 2022

 लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी

पशुधनाची अशी घ्यावी काळजी 

नांदेड (जिमाका) दि. 19 : नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील बरबडा, सोमठाणा या गावात लम्पी  आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पशुवैद्यकिय विभागाकडून ग्रामपातळी पर्यंत नियोजन केले आहे. पशुपालकांनी पशुधनाची  काळजी कशी घ्यावी याविषयी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून तज्ज्ञामार्फत जागृती  करण्यात येत आहे. 

पशुपालकांनी आवश्यकतेप्रमाणे तात्काळ करावयाची कर्तव्य  

गोठा व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, शेण, लघवी, आणि सांडपाणी यांचा योग्य निचरा करावा जेणे करून गोठ्याची जागा स्वच्छ राहील. त्यामुळे माशा, डास, गोचिड व चिलटे, या रोग पसरविण्याऱ्या वाहकांचे प्रमाण कमी होईल. गोठ्यातील गाय बाधित असल्यास तिची व्यवस्था निरोगी जनावरांपासून वेगळी करावी. जनावरांची हाताळणी केल्यानंतर हात साबणाच्या पाण्याने धुवावेत किंवा सॅनिटायझरने साफ करावेत. बांधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना व पशुवैद्य यांनी आपले कपडे, व साहित्य यांचे योग्य त्या द्रावणाने निर्जतुकीकरण करावे. रोगग्रस्त जनावर दगावल्यास त्याचे शरीर 8 फुट खोल खड्डा खणून त्यात पुरावे. नजिकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्याने योग्य तो उपचार व लसीकरण करून घ्यावे.

 हे करू नका

आजारी जनावरांचा शिल्लक राहीलेला चारा,  पाण्याची भांडी तसेच औषधोपचारासाठी वापरलेले साहित्य निरोगी जनावरांसाठी वापरू नका. नविन गाय विकत आणली तर पाच आठवडे पर्यत तिचा समावेश कळपात करू नका. आजारी जनावरांचे दूध धारा सुरूवातीस काढू नका. आजारी जनावरांच्या गोठ्यात सर्वाना मुक्त प्रवेश नको. रोगाचा प्रादूर्भाव असलेल्या परिसरातून जनावरांची खरेदी विक्री करू नये असे आवाहन पशुवैद्यकीय विभाग यांनी केले आहे.

0000

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144   

नांदेड (जिमाका) दि. 19 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून मंगळवार 19 ऑक्टोंबर 2022 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.   

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा दिनांक 20 सप्टेंबर 2022   रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 ऑक्टोबर  2022  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.   

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांचा नांदेड दौरा

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद ह. काळे, लक्ष्मण सोपान हाके यांचा नांदेड दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 

गुरूवार 22 सप्टेंबर रोजी  सायंकाळी 6 वाजता पुणे येथून नांदेडकडे प्रयाण. रात्री 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. प्र. कुलगुरू व उपकुलसचिव (आरक्षण कक्ष) स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, विभागीय सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) औरंगाबाद विभाग, औरंगाबाद समवेत बैठक. सायंकाळी 6 वा. खाजगी वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

00000

 जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत सेवा पंधरवडा

·        नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे शासनाचे निर्देश 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- सामान्य नागरिकांच्या तक्रारी व अर्जावर कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा प्राधान्याने हाती घेतला आहे. या पंधरवाड्यात नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे निर्देश उप आयुक्त जगदीश मिनीयार यांनी दिले आहेत. 

राज्य शासनाद्वारे 2015 मध्ये आपले सरकार पोर्टल सुरु केले होते. परंतु नागरिकांचे कामे मुदतीत होत नसल्याने सर्व प्रलंबित तक्रारी, अर्जाचे निपटारा करण्यासाठी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील विविध 14 सेवांचा समावेश आहे. 

सेवा पंधरवड्यात नमूद संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. आपले सरकार वेबपोर्टल-392 सेवा, महावितरण पोर्टल-24 सेवा, डीबीटी पोर्टल-46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विभागाच्या स्वत:च्या योजनाशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, याव्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद देणे, नळ जोडणी देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे,  मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा एकूण 14 विभागनिहाय सेवांचा समावेश आहे.

00000 

 जेष्ठ नागरिकांच्या हक्कांचा प्रसार

या विषयावर कायदेविषयक शिबीर संपन्न 

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्वसामान्य किमान कार्यक्रमांतर्गत प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती डी.एम.जज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या सभागृहात जेष्ठ नागरिक यांच्या हक्कांचा प्रसार करण्याबाबतचे कायदेविषयक शिबीर नुकतेच संपन्न झाले. 

या  शिबीरासाठी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अशोक तेरकर व रिटेनर लॉयर श्रीमती डोणगावकर हे उपस्थीत होते. यावेळी श्रीमती डी.डी.डोणगावकर यांनी जेष्ठ नागरीकांचे हक्क व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेबाबत मार्गदर्शन केले. ॲड .व्ही.डी.पाटनुरकर, अॅड एम.झेड. सिद्यीकी यांनी जेष्ठ नागरीकांच्या समस्या मांडल्या. मुकुंद चौधरी यांनी सामाजीक कार्य करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. अशोक तेरकर यांनी जेष्ठ नागरीकांबद्दल मनोगत व्यक्त केले. श्रीमती डी.एम.जज यांनी जेष्ठ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण केले. या शिबिरास 20 जेष्ठ नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार रिटेनर लॉयर अॅड. नयुमखान पठाण यांनी केले.

0000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

 नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  30 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 असे एकूण 1 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 462 एवढी झाली असून यातील 1 लाख 759  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 693 एवढी आहे. जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 8,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2 असे एकूण 10 व्यक्ती उपचार घेत आहेत.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 18 हजार 866
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 97 हजार 966
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 462
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 759
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 693
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00

00000

 हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा माहितीपटाची

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झाली निर्मिती    

नांदेड, (जिमाका) दि. 19 :- हैदराबाद मुक्ती संग्राम अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्षे सुरू झाले आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी या संग्रामावर माहितीपट लोकांना उपलब्ध करून देता यावा अशी मनिषा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बाळगली होती. याची जबाबदारी नांदेड जिल्ह्यावर देण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने हैदराबाद मुक्ती संग्राम : विजयगाथा हा माहितीपट अत्यल्प काळात गुणवत्तेसह निर्मिती केला. 17 सप्टेंबर 2022 रोजी या माहितीपटाचे औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधीक विमोचन करण्यात आले. 

माहितीपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे माहिती पोहचावी, या मुक्तीचे मोल व ज्यांनी लढ्यामध्ये योगदान दिले आहे त्यांची व विविध लढ्यांची माहिती या माहितीपटात घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी यांनी स्वतंत्र समिती तयार केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, संपादक शंतनू डोईफोडे, प्रा. डॉ. अशोक सिदेवाड, डॉ. महेश जोशी, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. दीपक शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अपर कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे, इनटॅच नांदेडचे सुरेश जोंधळे, तहसीलदार आर. के. कोलगने, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांचा समावेश होता. 

समितीतील सर्व सदस्यांनी उपलब्ध असलेले मनुष्यबळ व कमी कालावधीत ऐतिहासिक संदर्भ असलेला माहितीपट निर्माण करण्याचे आवाहन पेलून दाखविले. यात मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास जरी नसला तरी मुक्ती लढ्याची यात माहिती घेण्यात आली आहे. प्रा. डॉ. महेश जोशी यांनी अभ्यासपूर्ण संहिता यासाठी लिहून दिली. समितीतील सर्व सदस्यांची सहमती घेऊन हा माहितीपट अंतिम करण्यात आला. हा माहितीपट https://youtu.be/XYPXTZvWeek  या लिंकवर सर्वांसाठी मोफत उपलब्ध असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिली.  

00000 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...