Thursday, November 3, 2016

विधानपरिषद निवडणुकीसाठी
तीन उमेदवारांचे अर्ज वैध
नांदेड, दि. 3 :- महाराष्ट्र विधान परिषद, नांदेड स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2016  साठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची आज छाननी करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र  वैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड जिल्हा स्थानीक प्राधिकारी मतदारसंघ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.
 वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये  अमरनाथ अनंतराव राजूकर (इंडियन नॅशनल काँग्रेस), गजानन श्रीराम पवार (अपक्ष), शिंदे शामसुंदर दगडोजी (अपक्ष) यांचा समावेश आहे. निखाते संदीप विजय (अपक्ष) यांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरले आहे.


0000000
एसएमएसद्वारे धान्य वितरणाची माहिती देणाऱ्या
ईपीडीएस प्रणालीचे उद्घाटन, राज्यातील पहिलाच उपक्रम
नागरिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या धान्य व शिधापत्रिकावरील वस्तुंच्या उपलब्धता- पुरवठा विषयक माहितीसाठीची EPDS SMS GATEWAY या अत्याधुनिक प्रणालीचे आज जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. राज्यात नांदेड जिल्ह्याने ही प्रणाली कार्यान्वीत करण्याचा पहिला उपक्रम यशस्वी केला आहे.
या प्रणालीमध्‍ये रास्‍त भाव दुकानदार व गावातील पदाधिकारी व सामान्‍य लाभधारक यांच भ्रमणध्‍वनी क्रमांक एकत्र करून गट तयार करण्यात आले आहेत. या गटातील सदस्यांना ग्रुप मेसेंजींगद्वारे त्‍यांच्‍या गावातील रास्‍त भाव दुकानदार यांना त्या-त्या माहिन्यात मंजुर करण्‍यात आलेले धान्‍य, संबंधीत दुकानदाराने शासकीय गोदामातुन उचलेले धान्‍य, त्याचे प्रमाण, दिनांक, वाहन क्रमांक व वेळ याबाबतची इत्यंभूत माहिती EPDS SMS GATEWAY प्रणालीतील SMS पाठविण्‍यात येते. तालुक्यातील शासकीय गोदामांच्या गोदामपाल यांच्‍या मार्फत ही प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे.
या प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्‍हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड तालुक्यातील रास्‍त भाव दुकानदार तुकाराम गजभारे मौ. बळीरामपुर दुकान क्र.3 यांच्‍याशी संबंधीत 25 सदस्यांच्या गटास एक क्लिकद्वारे SMS पाठविला. या प्रणालीचा उपयोग सर्व गावातील अन्‍नसुरक्षा योजनेतील लाभधारक यांना वेळीच माहिती मिळण्‍यासाठी मदत होईल. त्यामुळे पुरवठा यंत्रणेत पारदर्शकता निर्माण होईल असे नमुद करुन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्‍ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी संबंधीत तहसिल कार्यालयात जाऊन  या  प्रणालीमध्‍ये नाव नोदणी करुन घ्‍यावी असे आवाहन केले.  जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी प्रास्ताविकात नागरीकांना पुरवठा विभागाशी निगडीत माहितीसाठी व मदतीसाठी Online SMS Gateway या प्रणालीसाठी व तक्रारीसाठी  1967 आणि 1800224950 हे निशुल्क दुरध्वनी क्रमांकही उपलब्‍ध असल्‍याचेही यावेळी सांगितले. 
सहायक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, नांदेडचे तहसिलदार पी.के. ठाकूर, जिल्हा पुरवठा निरिक्षण अधिकारी एम.एम.काकडे,तांत्रिक अधिकारी कुलदीप जे.जोशी, नायब तहसिलदार, गोदामपाल, आदींची उपस्‍थीती होती. श्री. काकडे यांनी सुत्रसंचालन केले, तर नायब तहसिलदार विजय चव्‍हाण यांनी आभार मानले.  

0000000
विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे
काटेकोर पालन व्हावे –निरिक्षक डॅा. पाटील
नांदेड, दि. 3 :-  विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, तसेच मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकार, संशयास्पद आर्थिक व्यवहार यांच्याबाबत विविध यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करावी , असे निर्देश नांदेड स्थानीक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे दिले. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्या बैठकीत डॅा. पाटील बोलत होते.
 बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल काळभोर, उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त वृंदा मतकरी, अग्रणी बँके जिल्हा व्यवस्थापक बी. यु. वाघमारे आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध शासकीय विभागाचे प्रमुख, यंत्रणा आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
 आज झालेल्या बैठकीत निवडणूक निरिक्षक डॅा. पाटील यांनी विविध  यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. मतदारांची संख्या मर्यादीत असली तरीही या निवडणुकीसाठी सर्वच यंत्रणांनी निवडणूक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. उमेदवार आणि मतदार यांची संख्या अन्य निवडणुकीच्या तुलनेने मर्यादित असल्याने, उमेदवार व मतदार यांच्यातील थेट संपर्क राहतो. त्यामुळे याबाबत सतर्क राहून, गैर प्रकाराबांबत वेळीच कारवाई करावी. निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी जिल्हा आणि लगतच्या राज्याशी संबंधित सीमारेषांवरील तपासणी चौक्यांवर चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, आचार संहिता भंग झाल्यास संबंधितावर तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशा सुचनाही डॅा. पाटील यांनी दिल्या.
निवडणूक  निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही निवडणूक काळातील बॅनर-पोस्टर, सभा, रॅली, उमेदवारांची कार्यालये याबाबत विहीत पद्धतीने रितसर परवानगी देण्याबाबत तसेच अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. आचारसंहिता कक्ष, भरारी पथकांशी समन्वय, अवैध मद्य विक्री  व वाहतूक याबाबत तपासणी नाक्यांवर सज्जता ठेवावी याबाबतही सूचना केल्या.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यात  निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा 1077 हा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

00000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...