नांदेड जिल्ह्याच्या टंचाई निवारणास प्राधान्य
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा
प्राधान्याने पिण्यासाठी आरक्षित
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 29 :- उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा कालावधी लक्षात घेऊन
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी
शहरी व ग्रामीण भागातील पिण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढे पाणी आरक्षित
करण्यात आले.
पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणी
आरक्षणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील,
आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार वसंत चव्हाण, आमदार अमर
राजूरकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार विक्रम काळे, आमदार प्रदिप नाईक,
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका
आयुक्त लहुराज माळी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार आदि
मान्यवर तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याला संपूर्ण जिल्ह्यातील प्रकल्पातील जलाशयामध्ये सर्वोच्च
प्राधान्य राहिल असे सांगून पालकमंत्री कदम यांनी जिल्ह्यातील विविध जलाशयातील
उपलब्ध पाणीसाठा आणि शहरी व नागरी भागासाठीची संबंधित यंत्रणांची मागणी लक्षात
घेऊन पाणी आरक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सुचना
लक्षात घेण्यात आले. महानगरपालिका नांदेडसाठी विष्णूपूरी प्रकल्पात 30 दलघमी आणि
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात 15 दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. याशिवाय जिल्हा
परिषद नांदेडसाठी विष्णुपुरी प्रकल्पात 2 दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात 35
दलघमी पाणी आरक्षीत करण्यात आला. याशिवाय विष्णुपुरी प्रकल्पात 1.50 दलघमी पाणी
एमआयडीसी नांदेडसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिका व
ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील
पाणी आरक्षीत करण्यात आले. उर्ध्व पैनगंगा, निम्म मानार बारुळ, विष्णुपूरी,
पूर्णा, देवापूर या मोठ्या प्रकल्पात एकुण 93.10 दलघमी आणि उर्ध्व मानार लिंबोटी
निम्म मानार बारुळ, कुंद्राळा, करडखेड, नागरझरी, कुदळा, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प
क्र. 4, बाभळी बंधारा या मध्यम प्रकल्पातील 18.80 दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात
आला तसेच पलाईगुडा, शेख फरिदवदरा, रेणापूर सुधा, सुनेगाव व उर्ध्व मानार लिंबोटी
या लघु प्रकल्पात 4.80 दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचे
पालकमंत्री कदम यांनी जाहिर केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु
प्रकल्पातील पाणीसाठ्याची व जिल्ह्यातील पर्जन्यमानाची माहिती देऊन शहरी व ग्रामीण
भागासाठी पाण्याची यंत्रणांनी केलेली मागणी आदिची माहिती दिली. अवैध पाणी उपशावर
नियंत्रणासाठी समित्या गठित केल्या असून कार्यवाही सुरु असल्याचे सांगून
जिल्हाधिकारी डोंगरे यांनी पाटबंधारे विभागाकडे थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत जिल्हा
परिषदेला सुचना केली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देवून
अंमलबजावणी प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.
000000