Monday, October 29, 2018


नियोजन समितीच्या बैठकीत आढावा
जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांवर
54 टक्के खर्च ; उर्वरित निधी खर्च करा
- पालकमंत्री रामदास कदम
नांदेड दि. 29 :- नांदेड जिल्ह्यातील विविध विकास कामांवर चालु वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेतील सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना (ओटीएसपीसह) मिळून वितरीत केलेल्या तरतुदीच्या 54 टक्के खर्च झाला असून उर्वरित निधीतून तातडीने विकास कामे हाती घेऊन शंभर टक्के खर्च होईल यादृष्टिने सर्व विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.
नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शिलाताई भवरे, आमदार डी. पी. सावंत, आमदार हेमंत पाटील, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार वसंत चव्हाण, आमदार अमर राजूरकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार विक्रम काळे, आमदार प्रदिप नाईक, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनास मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेच्या चालु वर्षीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर अखेर झालेल्या खर्चानुसार सर्वसाधारण योनजेच्या 74 कोटी 79 लाख रुपयांच्या वितरीत तरतूदी पैकी 84 टक्के खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेच्या 62 कोटी 78 लाख 27 हजार रुपये वितरीत तरतूदीपैकी 32 टक्के खर्च झालेला आहे. याशिवाय आदिवासी उपयोजनेच्या 23 कोटी 69 लाख रुपयांच्या वितरीत तरतूदीपैकी 16 टक्के खर्च संबंधित यंत्रणांकडून झाला असल्याची माहिती देण्यात आली.
सन 2018-19 च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतील बांधकाम स्वरुपाच्या कामांच्या यादीस या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या विकासाची कामे समाविष्ट आहेत. विजेच्या वाढत्या भारनियमनाचा प्रश्न या बैठकीत चर्चिला गेला. महावितरणने 299 रोहित्र खरेदी करण्यासाठी 4 कोटी 16 लाख 84 हजार रुपयांच्या अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. या बैठकीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यात झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थितीचा नजिकच्या काळात सामना करावा लागणार असल्याने त्यासंबंधीची दुष्काळ निवारणाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री कदम यांनी यावेळी सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नाविषयी सविस्तर विवेचन केले. यावेळी बावरीनगर दाभड येथील बौद्धविहार या स्थळास "क" वर्ग तिर्थक्षेत्र पर्यटनस्थळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवंडेश्वर मंदिर व भवानी मंदिर तळणी ता. हदगाव आणि महादेव मंदिर शिऊर ता. हदगाव, शेंबोली ता. मुदखेड येथील खंडोबा मंदिर, भिमटेकडी व इदगा मैदानाला "क" दर्जाचे तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आले. याशिवाय तिर्थक्षेत्राच्या प्रस्तावांनाही यावेळी मान्यता देण्यात आली. धर्माबाद परिसरातील विकासाच्या 12 कोटी रुपयांच्या कामांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीस समितीचे सदस्य असलेले लोकप्रतिनिधी तसेच विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...