Tuesday, July 10, 2018


गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी
गणेश मंडळांची सोमवारी बैठक
नांदेड, दि. 11 :- जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी याबाबत माहिती देण्यासाठी धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांच्या उपस्थितीत गणेश मंडळांची बैठक सोमवार 16 जुलै 2018 रोजी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, चौधरी पेट्रोल पंपाच्या शेजारी, रेल्वे स्टेशन समोर, गवळीपुरा नांदेड येथे दुपारी 2 वा. आयोजित केली आहे. जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणित श्रीनीवार यांनी केले आहे.   
00000


शेतकऱ्यांना अनुदानावर कृषि साहित्य  
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 :-  जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पद्धतीचा अवलंब करुन पॉवर स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच व पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) इतयादी कृषि साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर औजारे / कृषि साहित्य मिळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषद कृषि विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
औजार निहाय देण्यात येणारे अनुदान व लाभार्थी निवडचे निकष पुढील प्रमाणे आहेत. सुरुवातील औजाराचे / कृषि साहित्याचे नाव (कंसात देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार) कंसाबाहेर एकुण लाभार्थी संख्या. पॉवर स्प्रेअर- (2 हजार 500 रुपये) 200. ताडपत्री (2 हजार रुपये) 750. 3एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच (10 हजार रुपये) 133. 5एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंपसंच (15 हजार रुपये)- 133. पॉवर ऑपरेटेड चाफ कटर / कडबा कटर- (15 हजार रुपये) 133.
लाभार्थी निवडीचे निकष- लाभार्थी शेतकरी हा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असावा. शेतकऱ्याचे स्वत:चे नावे शेतजमीन असलेला सातबारा व आठ-अ होल्डींग जोडावी. शेतकरी संयुक्त खातेदार असल्यास तलाठी यांचे अर्जदाराचे कुटुंबातील एकुण जमीन धारणेचे प्रमाणपत्र. शेतकरी अनुसूचित जाती / जमातीचा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जात प्रमाणपत्र. शेतकऱ्यास थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने डीबीटी औजारांची पुर्ण किंमत अधिकृत विक्रेत्यांचे खात्यावर कॅशलेस पद्धतीने भरणा करुन उत्पादक कंपनीच्या कोणत्याही अधिकृत विक्रेत्याकडून कृषि साहित्य औजार खरेदी करण्याची मुभा राहिल. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या कृषि साहित्याची / औजाराची तपासणी केली असल्याबाबत बीआयएस प्रमाणपत्र अथवा केंद्र / राज्य शासनाच्या अधिकृत संस्थांनी तपासणी केलेला अहवाल जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड करतांना अल्पभुधारक, मागासवर्गीय, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्य, अपंग लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत खरेदी करावयाच्या ताडपत्रीचा आकार 6 बाय 6 मिटर पेक्षा कमी नसावा व त्याची जाडी कमीतकमी 400 जीएसएम असावी. कडबा कटरचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. विद्युत पंप संच लाभ घ्यावयाचा असल्या, सिंचनाचे साधन असल्याबाबतचा पुरावा सातबारा विहिरीचा उल्लेख / तलाठी यांचे सिंचनाचे स्त्रोत असल्याबाबतचे प्रमाणपत्र / नदी नाल्यावरुन ओलीत असलेल्या शेतकऱ्यांना संबंधीत विभागाचा अधिकृत परवाना / प्रमाणपत्र तसेच शेतकऱ्याकडे अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत आधार संलग्न बॅक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी लागेल. अर्जदार अपंग असल्यास ऑनलाईन नोंदणी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्राची प्रत जोडावी लागेल. अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्य असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र जोडावे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000

नांदेड तालुक्यातील
स्थलांतरीत मतदारांची यादी प्रसिद्ध
मुदतीत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन   
नांदेड, दि. 9 :-  नांदेड तालुक्यातील स्थलांतरीत मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारांनी स्वत: किंवा नातेवाईक, मित्रमंडळींनी यादीवर आक्षेप असल्यास सात दिवसात तहसिल कार्यालय किंवा संबंधीत तलाठी कार्यालयात नोंदवावा. मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास संबंधीत मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत समजून मतदार यादीतून नावे वगळण्यात येतील, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.  
नांदेड उत्तर-86 व नांदेड दक्षिण-87 या मतदारसंघात बीएलओ मार्फत 15 मे ते 21 जून या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादी अद्यावत करण्याचे काम केले. यावेळी त्या यादी भागात आढळून न आलेल्या मतदारांची यादी संबंधीत तलाठी मार्फत त्या-त्या यादी भागात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच नांदेड जिल्हा संकेतस्थळावर टाकण्यात आली असून राष्ट्रीय राजकीय पक्षांना सॉफ्टकॉपी पुरविण्यात आली आहे.
नांदेड उत्तर मतदारसंघात 3 हजार 880 तर नांदेड दक्षिण मतदारसंघात 3 हजार 26 स्थलांतरीत मतदारांचा अहवाल बीएलओ मार्फत निवडणूक विभागास प्राप्त झाला आहे. दि. 7 मे 2018 च्या मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. ज्या मतदारांना बीएलओ आपल्या मोहिमेत शोधू शकले नाहीत अशा मतदारांना सामूहिक जाहीर सुचनाद्वारे अंतिम संधीची नोटीस देऊन आक्षेप प्राप्त न झाल्यास नावे वगळण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना प्राप्त आहेत.
ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत अशा मतदारांची यादी यापुर्वीच संबंधीत बीएलओ  व तलाठी मार्फत प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुदतीत आक्षेप प्राप्त न झालेल्या मतदारांना ही अंतिम सूचना असून अशी नावे मतदार यादी भागात राहत नसल्याचे समजून नावे वगळण्यात येतील, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.
0000000

जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 4.53 मि.मी.पाऊस
नांदेड, दि. 10 :- जिल्ह्यात मंगळवार 10 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 4.53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 72.54 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 332.72 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 35.24 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 10 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 1.63 (396.42), मुदखेड- 5.00 (505.01), अर्धापूर- 1.67 (351.01), भोकर- 7.50 (488.75), उमरी- निरंक (350.31), कंधार- 0.67 (329.33), लोहा- 00.67 (339.65), किनवट- 14.14 (280.27), माहूर-17.25 (357.25), हदगाव- 7.43 (462.87), हिमायतनगर- 12.00 (441.02), देगलूर- निरंक (131.00), बिलोली- 1.00 (209.60), धर्माबाद- 1.67 (244.32), नायगाव- 1.20 (256.80), मुखेड- 0.71 (179.83). आज अखेर पावसाची सरासरी 332.72 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 5323.44) मिलीमीटर आहे.  
00000


पत्रकार परिषद निमंत्रण                                                       ई-मेल संदेश
दि. 10 जुलै 2018

प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्‍तपत्र / दूरचित्रवाणी / केबल टि.व्‍ही.
नांदेड जिल्‍हा

विषय - पत्रकार परिषदेचे निमंत्रण...
 महोदय ,
            मा. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि. 7 जुलै 2018 रोजीच्या  पत्राच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समिती धर्माबाद व मुदखेड जिल्हा नांदेड या बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम दिनांक 12 जुलै 2018 ते दि. 12 ऑगस्ट 2018 या कालावधीचा घोषीत झाला आहे.
            या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी बुधवार दि. 11 जुलै 2018 रोजी जिल्हाधिकारी मा. श्री. अरुण डोंगरे यांची पत्रकार परिषद जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्षात दुपारी 4.00 वा. आयोजित केली आहे.
कृपया पत्रकार परिषदेस आपण किंवा आपला प्रतिनिधी, छायाचित्रकार, कॅमेरामन यांनी वार्तांकनासाठी उपस्थित रहावे, ही विनंती.   
वार व दिनांक     -  बुधवार, दि. 11 जुलै 2018    
स्थळ                 -  मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे कक्षात
वेळ                  -  दुपारी 4.00 वा.     

                                                                                                                   आपला विश्वासू
                 स्वा /-
       ( अनिल आलूरकर )
      जिल्‍हा माहिती अधिकारी,
                नांदेड  


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...