Tuesday, July 10, 2018


शेतकऱ्यांना अनुदानावर कृषि साहित्य  
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 9 :-  जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर डीबीटी व कॅशलेस पद्धतीचा अवलंब करुन पॉवर स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच व पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) इतयादी कृषि साहित्यांचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. गरजू शेतकऱ्यांनी अनुदानावर औजारे / कृषि साहित्य मिळण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्फत जिल्हा परिषद कृषि विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
औजार निहाय देण्यात येणारे अनुदान व लाभार्थी निवडचे निकष पुढील प्रमाणे आहेत. सुरुवातील औजाराचे / कृषि साहित्याचे नाव (कंसात देय उच्चतम अनुदान मर्यादा प्रति औजार) कंसाबाहेर एकुण लाभार्थी संख्या. पॉवर स्प्रेअर- (2 हजार 500 रुपये) 200. ताडपत्री (2 हजार रुपये) 750. 3एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच (10 हजार रुपये) 133. 5एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंपसंच (15 हजार रुपये)- 133. पॉवर ऑपरेटेड चाफ कटर / कडबा कटर- (15 हजार रुपये) 133.
लाभार्थी निवडीचे निकष- लाभार्थी शेतकरी हा नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असावा. शेतकऱ्याचे स्वत:चे नावे शेतजमीन असलेला सातबारा व आठ-अ होल्डींग जोडावी. शेतकरी संयुक्त खातेदार असल्यास तलाठी यांचे अर्जदाराचे कुटुंबातील एकुण जमीन धारणेचे प्रमाणपत्र. शेतकरी अनुसूचित जाती / जमातीचा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले जात प्रमाणपत्र. शेतकऱ्यास थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने डीबीटी औजारांची पुर्ण किंमत अधिकृत विक्रेत्यांचे खात्यावर कॅशलेस पद्धतीने भरणा करुन उत्पादक कंपनीच्या कोणत्याही अधिकृत विक्रेत्याकडून कृषि साहित्य औजार खरेदी करण्याची मुभा राहिल. या योजनेंतर्गत खरेदी केलेल्या कृषि साहित्याची / औजाराची तपासणी केली असल्याबाबत बीआयएस प्रमाणपत्र अथवा केंद्र / राज्य शासनाच्या अधिकृत संस्थांनी तपासणी केलेला अहवाल जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड करतांना अल्पभुधारक, मागासवर्गीय, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्य, अपंग लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत खरेदी करावयाच्या ताडपत्रीचा आकार 6 बाय 6 मिटर पेक्षा कमी नसावा व त्याची जाडी कमीतकमी 400 जीएसएम असावी. कडबा कटरचा लाभ घेणेसाठी शेतकऱ्यांकडे जनावरे असल्याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. विद्युत पंप संच लाभ घ्यावयाचा असल्या, सिंचनाचे साधन असल्याबाबतचा पुरावा सातबारा विहिरीचा उल्लेख / तलाठी यांचे सिंचनाचे स्त्रोत असल्याबाबतचे प्रमाणपत्र / नदी नाल्यावरुन ओलीत असलेल्या शेतकऱ्यांना संबंधीत विभागाचा अधिकृत परवाना / प्रमाणपत्र तसेच शेतकऱ्याकडे अधिकृत विद्युत कनेक्शन असल्याबाबतचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत आधार संलग्न बॅक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी लागेल. अर्जदार अपंग असल्यास ऑनलाईन नोंदणी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्राची प्रत जोडावी लागेल. अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्य असल्यास तहसिलदार यांचे प्रमाणपत्र जोडावे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...