Monday, August 21, 2023

 वृत्त 

ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळावी यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेऱ्याची अचूक नोंद करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

खरीप हंगाम 2023 साठी क्षेत्रीय स्तरावरुन पीक पाहणी (रियल टाइम क्रॉप डाटा) संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच हा डाटा/माहिती संकलन करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग असणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रीया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचुक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप सुरु करुन त्यात पीक पाहणी नोंदवावी, असे जिल्हा प्रशासच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक , पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी, तंत्र साक्षर स्वयंसेवकांनी ई-पीक पेरा नोंदविण्यासाठी सहकार्य करावे.

00000

 वृत्त 

अंगणवाडी मदतनीस पदभरती यादीत

आक्षेप असल्यास 1 सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते.

 

त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांची यादी http://nanded.gov.in या संकेतस्थळावर 21 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी प्रसिध्द यादीबाबत काही आक्षेप असल्यास 1 सप्टेंबर 2023 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर वि.सि. बोराटे यांनी केले आहे.

00000

 पशुपालकांनी लम्पी पासून सुरक्षिततेसाठी

आजारी पशू विलगीकरणासह लसीकरण आवश्यक

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

लम्पी चर्मरोग सनियंत्रण समितीच्या बैठकीत आढावा

20 टक्के सुश्रृषा व 80 टक्के काळजी हा लंम्पीवर प्रभावी उपचार

 

नांदेड (जिमाका), दि. 21 :- जिल्ह्यात पशुमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. याला नियंत्रणात ठेवण्यासाठी पशुपालकांसह ग्रामपंचायत पातळीपर्यंत पशु संवर्धन विभागाने योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. शंभर टक्के लसीकरण व आजारी जनावरे वेगळी काढून त्यांच्या सुश्रृषेसह लसीकरण व काळजी घेण्यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

लम्पी चर्मरोग सनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात आजच्या घडीला 512 पशुंमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. यात वासरांचे प्रमाण अधिक आहे. पशुपालकांमध्ये लम्पी बाबत अधिक जागृती करण्यावर पशुसंवर्धन विभागाने भर देण्यासमवेत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर त्यांच्या सहभागातून जनावरांचे गोठे व जनावरांची फवारणी करणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले. मृत जनावरांची विल्हेवाट ही दिलेल्या निर्देशाप्रमाणे केली पाहिजे. याचबरोबर आपला जिल्हा दोन राज्यांच्या सीमांवर असल्यामुळे जिल्ह्यात अन्यत्र ठिकाणावरून आजारी जनावरे येणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेतील पाहिजे. आठवडी बाजाराच्या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प लावून पशुपालकांना जनावरांच्या निगा व सुश्रृषेबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात आजवर एकुण 75 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी चर्मरोग बाधित गावांची संख्या 197 असून बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 643 एवढी आहे. एकुण बाधित गावे 480 एवढे असून 3 हजार 618 बाधित पशुधनापैकी 2 हजार 638 पशुधन आजारातून बरे झाले आहेत. 513 पशुधनावर औषोधोपचार सुरू असून 10 पशुधन अत्यवस्थ रुग्णामध्ये गणले आहेत. 466 पशुधन मृत पावले आहेत. आजवर सुमारे 1 कोटी 95 लाख 5 हजार एवढ्या रक्कमेचे अर्थसहाय्य मृत झालेल्या पशुधनाच्या पशुपालकास वितरीत करण्यात आले आहे.

000000   







  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...