Monday, November 28, 2016

कामगारांचे बँक खाते उघडण्याचे
कामगार आयुक्तांचे आवाहन
नांदेड दि. 28 :-  जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आस्थापनांनी कामगारांचे बँक खाते उघडावेत, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
याबाबतच्या आवाहनात म्हटले आहे की, कामगारांचे वेतन नियमित व वेळेवर होण्यासाठी बँक खाते आवश्यक आहेत. तसेच कामगारांना आर्थिक प्रक्रियेत समाविष्ट करणे आवश्यक त्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे. किमान वेतन अधिनियम 1948 व वेतन प्रदान अधिनियम 1936 अंतर्गत कामगारांचे वेतन त्यांचे बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे. असोसिएशन, संघटनेचे सभासद असलेल्या आस्थापनांना, मालकांना त्यांचेकडील कायम, कंत्राटी, हंगामी स्वरुपाच्या कामगारांची बँक खाते उघडण्याबाबत संबंधित कामगारांना सूचित करावे. यासाठी शासनाने बँकांना कामगारांचे खाते उघडण्यासाठी विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासंदर्भात कामगारांना मार्गदर्शन करावे. तसेच कामगारांचे वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त बी. एम. मोरुडे यांनी केले आहे.

000000
जिल्‍ह्यात खरीप हंगामासाठी
आधारभूत किंमत खरेदी केंद्रांना मान्‍यता
नांदेड, दि. 28 :- जिल्‍ह्यातील सन 2016-17 खरीप पणन हंगामासाठी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्‍य, धान खरेदी केंद्रांना शासनाकडून मंजूरी देण्‍यात आली आहे. शेतक-यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा याहेतून खरेदी केंद्र उघडण्‍याकरीता व ज्‍वारी, बाजरी, मका ही भरडधान्‍य व भाताची खरेदी करण्‍यासाठी जिल्‍ह्यात 17 केंद्रांना मंजूरी देण्‍यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नांदेड जिल्‍ह्यात मार्केटींग फेडरेशनने प्रस्तावित केल्‍यानुसार 13 आधारभू‍त खरेदी केंद्रास तर आदिवासी विकास महामंडळाने प्रस्‍तावित केलेल्‍या 4 आधारभूत केंद्रांना मान्‍यता देण्‍यात आली आहे. ही मंजूर केंद्रे अशी तालुका सहकारी शेतीमाल खरेदी विक्री संघ कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, नायगाव, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, भोकर. नांदेड जिल्‍हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदी विक्री संघ नांदेड तसेच आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्र किनवट, मांडवी, इस्‍लापूर व वाई असे एकूण 17 केंद्रांना मंजुरी दिलेली आहे या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000000
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 मधील
स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 28 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयोगाचे अवर सचिव सु. ह. अवताडे यांनी दिली आहे.  
            सन 2017 मध्ये विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धापरीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे : (१) राज्यसेवा परीक्षा 2017 ची जाहिरात डिसेंबर, 2016 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 एप्रिल, 2017 रोजी होईल तर मुख्य परीक्षा दि. 16,17,18 सप्टेंबर, 2017 अशी तीन दिवस असेल. (2) पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 12 मार्च, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 11 जून, 2017 रोजी होईल. (3) सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2017 ची जाहिरात जानेवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 एप्रिल, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 06 ऑगस्ट, 2017 रोजी होईल. (4) लिपिक टंकलेखक परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी,2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 14 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 03 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. (5) दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 21 मे, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 08 ऑक्टोबर, 2017 रोजी होईल. (6) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा 2017 ची जाहिरात फेब्रुवारी, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 02 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 15 ऑक्टोबर 2017 रोजी होईल. (7) महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 04 जून, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 24 सप्टेंबर, 2017 रोजी होईल. (8) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात मार्च, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 09 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017 व महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 26 नोव्हेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी, महाराष्ट्र विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2017, दि. 24 डिसेंबर, 2017 रोजी होईल. (9) सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 25 जून, 2017 रोजी होईल. 10) सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 16 जुलै, 2017 रोजी होईल. त्यापैकी पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 05 नोव्हेंबर,2017 रोजी, सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा 2017, दि. 10 डिसेंबर, 2017 रोजी, विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2017, दि. 07 जानेवारी,2018 रोजी होईल. (11) कर सहायक परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 31 डिसेंबर, 2017 रोजी होईल. (12) महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा 2017 ची जाहिरात एप्रिल, 2017 प्रसिद्ध होईल. याची पूर्व परीक्षा दि. 30 जुलै, 2017 रोजी तर मुख्य परीक्षा दि. 17 डिसेंबर, 2017 रोजी होईल.(13) विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017 ची जाहिरात सप्टेंबर, 2017 मध्ये प्रसिद्ध होईल. याची मुख्य परीक्षा दि. 05 नाव्हेंबर, 2017 रोजी होईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या www.mpsc.gov.in, https://mahampsc. mahaonline.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी. शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत परिपूर्ण मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे वरील अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकाबाबतची अद्ययवत माहिती वेळोवेळी आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

000000
रब्बी हंगामातील पाणीपाळीसाठी
अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :-  शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 ऑक्टोंबरच्या उपयुक्त साठ्यावर रब्बी हंगाम सन 2016-17 मधील उभ्या पिकांना पिक संरक्षणात्मक एक पाणीपाळी 10 डिसेंबर 2016 पासून देण्यात येणार आहे. लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना नंबर 7, 7 अ , सोबत मागील थकबाकीची एक तृतीअंश पाणीपट्टी व चालू अग्रीम पाणीपट्टी संबंधीत शाखा कार्यालयात भरणा करावी. राज्य जलसंपदा विभागाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची संबंधीत लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

0000000
केळी पिक संरक्षणासाठी
कृषि विभागाचे संदेश
नांदेड, दि. 28 :-   उपविभागीय कृषि कार्यालय नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिकांवर प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. पिवळ्या रंगाचे डाग पानावर दिसून आल्यास त्वरीत कार्बेडॅझिम 50 डब्लु,. पी 0.1 टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात एक मि.ली. स्टीकर टाकुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
शासकीय अध्यापक महाविद्यालयात
  कौमी एकता सप्ताह संपन्न
नांदेड, दि. 28 :- दरवर्षी 19 ते 25 नोव्हेंबर 2016 दरम्यान कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानुसार शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात आला.
 सप्ताहानिमित्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी  व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयात दररोज परिपाठावेळी एक प्राध्यापक व एक प्रशिक्षणार्थी यांनी कौमी एकता सप्ताहानिमित्त आपआपल्या विचारानूसार व्याख्याने दिली. तसेच महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बी. एड. प्रशिक्षणार्थ्यांना निरनिराळया गटात विभाजन करून गटनिहाय भित्तीपत्रक निर्मिती व विमोचन करण्यात आले.
            कौमी एकता सप्ताह समाप्ती कार्यक्रमात प्रा. डॉ. साबळे यांनी कौमी एकता ही संकल्पना सविस्तरपणे विशद करीत असतांना भारत हे प्राचीन राष्ट्र कसे आहे हे स्पष्ट करून सागितले. सप्ताह समापन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे होत्या. प्रा. श्रीमती सत्यशिला सोळुंके यांनी सप्ताहाचे संयोजन केले.

000000
विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने
विद्यापीठात संविधान दिन साजरा
नांदेड दि. 28 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  नांदेडच्यावतीने स्कुल सोशल सायन्स, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापी, नांदेड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने कायदे विषय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव,  न्या. . आर. कुरेशी हे होते. यावेळी जिल्हा न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. सिरसाठ,  प्रा. सौ. उषा एस. सरोदे, अॅड. विजयकुमार भोपी, अॅड. सुभाष ढाले, अॅड. श्रीमती सुकेशणी वासणीक, अॅड. सिध्देष्वर खरात आदी उपस्थित होते.
            सुरूवातीस मुंबई मधील 26/11 च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्यिषिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शाहीर शेषराव वाघमारे यांच्या संविधानपर पोवाडयाने कार्यक्रमास सुरूवात झाली. न्या. कुरेशी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संविधान एक वैश्विक दृष्टी असलेले दस्तऐवज राष्ट्रग्रंथ आहे.त्यामुळे ब्रिटीश विचारवंत अनैस्ट बार्कर यांनी जग केस असावे, तर भारतीय संविधाना सारखे असावे असे गौरवोद्गार काढल्याचे त्यांनी सांगीतले. न्या. श्रीमती सिरसाठ, अॅड. सुकेशणी वासणीक, अॅड. सिध्देश्वर खरात, अॅड. सुभाष ढोले यांची भाषणे झाली. विधी सेवा प्राधिकरणातर्फे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती असलेली माहिती पत्रके वाटण्यात आली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. भोपी, अॅड. राणा सारडा, अॅड. विशाखा जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन प्रा. सौ. उषा सरोदे यांनी केले तर प्रा. बाबूराव जाधव यांनी आभार मानले.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...