Thursday, April 20, 2017

जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना
उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार
नागरी सेवा दिन व राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान निमित्त
मुंबईत आज पुरस्कार वितरण

नांदेड दि. 20 :- जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी तीन महत्त्वपुर्ण पॅटर्न, वंचितांसाठी अन्न सुरक्षा आणि उज्ज्व नांदेड अशा अभिनव संकल्पनांना मुर्त
रूप देण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न करणारे नांदेड जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त व राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत राज्य सरकारने जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार 21 एप्रिल 2017 रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या निवडीसाठी आज येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अर्जून खोतकर यांनीही जिल्हाधिकारी काकाणी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनही केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड जिल्ह्यात रूजू झाल्यापासूनच लोकाभिमुख तसेच अनेक नाविन्यपुर्ण संकल्पना राबविण्यात सातत्य ठेवले आहे. या सर्व कामांचा या पुरस्कारासाठी निवड करताना विचार करण्यात आला. विशेषतः मे 2015 मधील दुष्काळाच्या झळा तसेच टंचाईचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी विविधस्तरावर प्रयत्न केले. विविध यंत्रणांचा समन्वयही साधला. यामुळे पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करता आली. त्यासाठी इसापूर धरणातून थेट बाभळी बंधाऱ्यापर्यंत कमीतकमी खर्चात, आणि पाण्याचा कमीत कमी अपव्यय होऊन पिण्याचे पाणी उपलब्ध करता आले होते. नांदेड शहरासाठीही येलदरी धरणातून विष्णुपुरीपर्यंत पाणी आणण्यात आले होते.
नांदेड जिल्ह्याने जलयुक्त शिवार अभियानातून राज्यासाठी नाविन्यपुर्ण असे पॅटर्न देण्याचा मान पटकाविला आहे. या पॅटर्नच्या विकासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यंत्रणांना प्रोत्साहन दिले. यातूनच उगम ते संगम नाला पुनरुज्जीवन, जलपुनर्भरण स्तंभ (रिजार्च शॅाफ्ट), विहीर पुनर्भरण अशा संकल्पना विकसित झाल्या. यामुळे नांदेडमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामही वैशिष्ट्यपुर्ण ठरले. त्यातूनच जिल्ह्यात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी लागणाऱ्या उन्हाळ्यातील टँकर्सची संख्याही लक्षणीयरित्या घटली. आता अवघे सहा ते सात टँकरने जिल्ह्यात पाणी पुरविले जाते, या तुलनेत गतवर्षी ही संख्या शेकड्यावर होती. विशेषतः कंधार-लोहा या भागातील टँकर्सची संख्या कमी झाल्याबाबत लोकप्रतिनीधींनीही थेट जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी व विविध यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी स्वच्छ भारत मिशनमध्येही जिल्ह्यातील चौदाही नगरपालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान प्रभावीरित्या राबविले. यामुळे या नागरीक्षेत्रातील स्वच्छतेसाठीही जिल्ह्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. टंचाईच्या परिस्थितीतही जिल्ह्याची महसुली वसुली 105 टक्क्यांवर नेण्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यश मिळविले आहे. याशिवाय प्रलंबित महसुली प्रकरणे निकाल काढण्यातही आघाडी ठेवली आहे. माहूर विकास प्राधिकरण आराखड्यासाठी 216 कोटी रुपयांचा भरीव निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. विष्णुपूरी उपसा जलसिंचनास चालना देण्यामुळे लोहा-कंधार भागातील कालवे पुनरूज्जीवत झाले, त्यातून खरीपासह, रब्बी आणि उन्हाळी पिके घेण्याचे नियोजन, त्या परिसरातील शेतकऱ्यांना करता आले आहे. जिल्ह्यातील पीक पद्धतीत सकारात्मक बदल व्हावा, शेतकऱ्यांनी कृषी पूरक उद्योगांसाठीही प्रयत्न करावेत यासाठी जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी विविध यंत्रणांना एकात्मिक पद्धतीने काम करण्यासाठी प्रोत्साहीत केले आहे. शेतकरी गटही स्थापन केले.  
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने सुरु करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाला उज्ज्वल नांदेड म्हणून आगळ्या पद्धतीने पुढे नेले. त्यामुळे हा उपक्रम आता अव्याहतपणे सुरु आहे. ज्याद्वारे नांदेड जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांतील विविध विषयांचे थेट विषयाशी निगडीत मार्गदर्शन मिळणे सुरु झाले आहे. यातून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षांचे यश मिळाले आहे. विविध उपक्रमात सामाजिक संस्थांचाही उत्कृष्ट सहभाग मिळविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. ज्यामध्ये सगरोळीची संस्कृती संवर्धन समिती, सिद्धीविनायक ट्रस्ट, नाम फाऊंडेशन यासह स्थानिक विविध स्वयंसेवी संस्थांचाही समावेश आहे.
जिल्ह्यासाठीच्या विकास आराखड्यातील निधींचे काटेकोर नियोजन, तसेच पुरेपूर विनीयोग करतानाच जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रशासनातील मानवी आस्थाही विविध उपक्रमानी वृद्धींगत केली आहे. यामध्ये वंचितासाठी अन्न सुरक्षा या उपक्रमास थेट राष्ट्रपती भवनातील सादरीकरणासाठी निमंत्रित कऱण्यात आले आणि त्याच्याविषयी कौतुकोद्गारही काढण्यात आले. प्रशासकीय रेट्यातही जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी प्रचंड थंडीच्या दिवसात निराधारांना शालींचे वाटप, निराधार मुलींसाठी दंगल चित्रपट दाखविण्याचा उपक्रम यातून संवेदनशील प्रशासनाचा पायंडाही घालून दिला आहे. यासह विविध बाबींचा सर्वंकष विचार करून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्हावासीयांनाच - जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड जिल्ह्याने नाविन्यपुर्ण उपक्रम राबविताना आपल्या पाठीशी सकारात्मक पाठबळ उभे केले, त्यामुळेच हा गौरव मिळू शकल्याची प्रतिक्रीया जिल्हाधिकारी श्री. काकाणी व्यक्त केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणासाठी श्री. काकाणी सध्या मसूरी येथे आहेत. या पुरस्काराबाबत त्यांनी तेथून प्रतिक्रीया नोंदविली. ते म्हणाले की, या पुरस्काराचे श्रेय नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना, विविध पदाधिकारी, लोकप्रतिनीधी, सर्व विभागांचे प्रमुख, महसूल आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहकाऱ्यांना आहे. माझ्यासह हा गौरव नांदेड जिल्हावासियांचाच आहे, असे मी मानतो.

000000
पत्रकार संरक्षण कायद्यामुळे सत्य मांडण्याचे बळ
– पालकमंत्री खोतकर
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे खोतकर यांचा हृदय सत्कार
नांदेड दि. 20 :- पत्रकारितेसमोर लोकांसमोर सत्य मांडण्याचे दायित्त्व असते. हे दायित्त्व निभाविण्यासाठीचे बळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्यातून मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. राज्य सरकारने पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पारित केलेला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच अभिनंदन करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने पालकमंत्री श्री. खोतकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर बोलत होते.
नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहातील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आदींही उपस्थिती होते.
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता, राज्याच्या हिताकरिता आणि विकासाची दीशा दाखविण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून काम करीत असतात. जगात भारतीय पत्रकारितेचे एक आगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही ओळखले जाते. यातून नेतृत्त्वालाही दीशा देण्याची पत्रकारितेने भुमिका बजावली आहे. पत्रकार सामान्यांच्या न्याय्यासाठी लढा देत असतात. यातूनच प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींनाही धोरणे आखता येतात. त्यामुळेच सरकार म्हणून पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी येते. सत्य असेल, ते लोकासमोर मांडण्याचे दायित्त्व पत्रकारितेकडे येते. हे दायित्त्व पार पाडण्यासाठीचे बळ या संरक्षण कायद्यामुळे मिळेल, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. खोतकर यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेकविध प्रयत्नही केल्याचे नमूद केले. तसेच या सत्काराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनाही अवगत केले जाईल, असे सांगितले.
विविध पत्रकार संघटनांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन पालकमंत्री श्री. खोतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात पत्रकार सर्वश्री किरण कुलकर्णी, नंदकुमार कांबळे, कमलाकर बिराजदार, विश्र्वनाथ देशमुख, भास्कर धम्मा, अब्दूल सत्तार, रुपेश पाडमुख, कालिदास जहागिरदार आदींच्या हस्तेही सत्कार झाला. सुरवातीला पत्रकार विजय जोशी यांनी प्रास्ताविक केले व आभारही मानले. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आदी उपस्थित होते.       
000000    
खरीप हंगामातील बियाणे, खतांसाठी
काटेकोर नियोजन करावे - पालकमंत्री खोतकर
नांदेड दि. 20 :- शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात उत्तम दर्जाचे बियाणे, रासायनीक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी वेळीच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय पूर्व तयारी आढावा बैठक खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर व उपाध्यक्ष समाधान जाधव, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील, प्रदीप नाईक, डॅा. तुषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती दत्तू रेड्डी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडीतराव मोरे, आत्माचे संचालक एस. व्ही. लाडके, मोहिम अधिकारी श्री. हांडे आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यातील येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे, खतांचा आढावा घेऊन श्री. खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा झाला पाहिजे. त्यामध्ये कोणतीही कमतरता भासू नये. पीक कर्ज वितरणामध्येही अडचण येऊ नये असे नियोजन करावे. पीक कर्ज वितरण व शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठनही करण्यात यावे, असेही श्री. खोतकर यांनी सांगितले.  
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी नांदेड जिल्ह्याच्या येत्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. नांदेड जिल्ह्यात येत्या खरीप हंगाम 7 लाख 72 हजार 575 हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी अधीक क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट ठरविले आहे. ज्वारी- 70 हजार हेक्टर, तूर- 78 हजार हेक्टर, सोयाबीन- 2 लाख 83 हजार हे., कापूस 2 लाख 65 हजार हे. व इतर पिके 76 हजार 575 हे. क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट असून त्यासाठी लागणारे 1 लाख 15 हजार 598 क्विंटल बियाणे तर कापूस बियाण्याचे 13 लाख 50 हजार पाकिटे महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनीक खताची 2 लाख 58 हजार 100 मे. टन  मागणी असताना 2 लाख 85 हजार 700 मे. टन खते उपलब्ध होणार आहेत. मागील रब्बीतील 78 हजार 500 मे. टन शिल्लक आहेत. त्यामुळे बियाणे व खताची टंचाई भासणार नाही. सन 2016-17 च्या खरीप हंगामामध्ये पीक कर्जाचे 90.19 टक्के वितरण करण्यात आले होते. तर 2017-18 मध्ये 1925.28 कोटी पीक कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनींधीनी सहभाग घेतला. यावेळी कृषी विभागाच्या विविध पत्रिका, माहिती पुस्तिकांचेही पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

000000
जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी
– पालकमंत्री खोतकर
जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकोर विनियोगाचे निर्देश

नांदेड दि. 20 :- जलयुक्त शिवार अभियान सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत व अभियानातील कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. खोतकर बोलत होते. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या 2017-18 च्या प्रारूप आराखड्यासही मान्यता देण्यात आली. या आराखड्यातील कामांबाबत लोकप्रतिनीधींना विश्र्वासात घेऊन वेळोवेळी सुधारीत कामेही प्रस्तावित करण्यासही श्री. खोतकर यांनी निर्देशित केले.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनातील मुख्य सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील, प्रदीप नाईक, डॅा. तूषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांच्यासह, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,  जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री खोतकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील विविध बाबींचा सर्वंकष आढावा घेतला. जलयुक्त शिवार अभियानाच्या चर्चेच्या अनुषंगाने ते म्हणाले की, हे अभियान सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी समन्वयाने अभियानात निवडलेल्या गावांत पुर्ण क्षमतेने कामे करावीत. त्यासाठी लोकसहभागही वाढवावा व कामांना गती द्यावी. कामे दर्जेदार आणि वेळेत व्हावीत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत आमदार चिखलीकर यांनी कंधार लोहा परिसरात जलयुक्तची कामे उत्कृष्ट झाल्याने यंदा टंचाईची परिस्थितीची तीव्रता जाणवत नसल्याचे सांगितले तसेच आमदार साबणे यांनीही देगलूर परिसरात उत्कृष्ट कामे झाल्याचे नमूद केले. जलयुक्तच्या कामांमुळे अजूनही टँकर सुरू करावे लागले नाही. यात जिल्हा प्रशासन आणि अभियानातील कार्यान्वयन यंत्रणांनी उत्कृष्ट कामे केल्याचे नमूद करून, त्यांनी अभिनंदनाचा ठरावही मांडला.
पालकमंत्री खोतकर यांनी आगामी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेतला. यात त्यांनी मागणी झाल्यास तातडीने टँकर सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात यावी, विंधन विहीरींचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करण्यात यावे, जिल्ह्यातील कोल्हापूरी बंधाऱ्यांसाठी वैजापूर पद्धतीचे गेट बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, नदी पुनरूज्जीवनासाठीचे प्रस्ताव तयार करावेत अशा सूचनाही दिल्या. बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या गत बैठकीच्या इतिवृत्तातील अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक योजनेच्या 2016-17च्या झालेल्या खर्चास, तसेच त्यातील पुनर्विनियोजनास, सन 2017-18च्या आराखड्यास मान्यताही देण्यात आली.
आयत्या वेळच्या विषयात जिल्ह्यातील रस्ते विकास, तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही बैठकीत सर्वंकष चर्चा झाली. याशिवाय तीर्थस्थळ विकास, पर्यटन विकास, महावितरण, पथदिवे, तूर खरेदी केंद्र तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उठाव, सांसद आदर्श ग्राम, आमदार आदर्श ग्राम योजनांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी सर्वच कार्यान्वयन यंत्रणांना दरमहा कार्य अहवाल तसेच योजनेतील निधीच्या खर्चाबाबत तसेच त्याच्या विनीयोगाबाबत वेळेत अहवाल देण्याचे निर्देशीत केले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनिंधीसह, समितीच्या सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या.
जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी बैठकीचे संयोजन केले. प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्याचा टंचाई आराखडा व त्यातील विविध उपाय योजनांबाबतही माहिती दिली.

0000000
विधी साक्षरता शिबीर घेण्यासाठी
अशासकीय संस्थांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून विधी साक्षरता शिबीरे घेण्याकरीता प्रत्येक वर्षी अशासकीय संस्थेस अनुदान देण्यात येते. सन 2017-2018 या आर्थिक वर्षात नांदेड जिल्हयातून एका अशासकीय संस्थेचा प्रस्ताव विधी साक्षरता शिबीरे घेण्यासाठी अनुदानाकरीता अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, नांदेड यांच्या शिफारशीने महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई येथे पाठविण्यात येणार असून यासाठी विधी साक्षरता शिबीरे घेणाऱ्या अनुभवी अशासकीय संस्थेच्या प्रस्तावाची निवड करण्यात येईल. नांदेड जिल्हयातील इच्छूक अशासकीय संस्थांनी आपले प्रस्ताव सोमवार 8 मे 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेपूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, नांदेड यांचेकडे सादर करावीत.
            प्रस्तावा सोबत सहायक अनुदान संपूर्ण भरलेला अधिस्विकृती र्म असावा, अशासकीय संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अशासकीय संस्थेचा स्थापना लेख अधिसंघ नियमावलीची प्रत, मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल, संस्थेचा मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक, अशासकीय संस्थांचा विधी साक्षरता शिबीरामध्ये कामकरीत असल्याचा अनुभव कागदपत्रे, निती आयोग पोर्टलवर नोंदणीकृत असल्याबाबतचा पुरावा दाखल असणे आवश्यक आहे. सन 2017-2018 मध्ये जिल्हयात घेण्यात येणाऱ्या शिबीराचे ठिकाण आदी कागदपत्रासह 3 प्रती मध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रस्तावा संबंधी नियमावलीसाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.          

0000000
ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदराचे अभिप्राय
ऑनलाईन नोंदविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडेदर सुत्र समितीचे महाराष्ट्रातील जनतेचा अभिप्राय, ऑटोरिक्षा चालक अभिप्राय, टॅक्सी चालक अभिप्राय, ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्व्हेक्षण करण्यासाठी www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Maij Menu - सूचना - फिडबॅक फॉर्म यानुसार मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, ग्राहक प्रतिनिधी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, चालक व संघटनांनी रविवार 30 एप्रिल 2017 पर्यंत आपले अभिप्राय परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदवावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा / टॅक्सी भाडे सुत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन ऑटोरिक्षा / टॅक्सी संघटनाचे मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते आजमवली आहेत. यादरम्यान विविध मुद्दावर संबंधितामध्ये दिलेल्या मतांमध्ये मत भिन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर ऑटोरिक्षा / टॅक्सी व्यवसायिकांना त्यांच्या संघटनाना तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत याकरीता समितीने संगणकीय सर्व्हे घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार अध्यक्ष यांनी निर्देश दिले आहेत की विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑटोरिक्षा / टॅक्सी सर्व्हे नमुने ऑनलाईन भरणा करण्यासाठी अपलोड करावेत.

0000000
कुष्ठरुग्णांचे कार्य करणाऱ्या संस्थांना
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 20 :- राज्य आरोग्य अभियानांतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी एनजीओ स्कीम अंतर्गत कुष्ठरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या व सार्वजनिक आरोग्यसेवेत मागील 3 वर्षापासून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी शुक्रवार 21 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावीत, असे आवाहन सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग नांदेड यांनी केले आहे.  
अधिक माहितीसाठी सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग नांदेड  ईश्वरराव भोसीकर बिल्डिंग मुक्तेश्वर आश्रमाच्यामागे, वसंतनगर, नांदेड (दूरध्वनी क्र. 02462-285128) या कार्यालयाशी संपर्क साधून प्रस्ताव सादर करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000
दहावी विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचे
25 एप्रिल पासून आयोजन  
नांदेड, दि. 20 :- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कल अहवालाद्वारे अधिकचे मार्गदर्शन हवे असल्यास त्यांच्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्था श्रीनगर नांदेड येथे मार्गदर्शन, समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्र मंगळवार 25 एप्रिल ते सोमवार 15 मे 2017 या कालावधीत कार्यान्वित राहील. या केंद्रावर जिल्ह्यातील शिक्षक समुपदेशक विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांनी केंद्राचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड व्यावसायिक विकास संस्था जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्णचे प्राचार्य यांनी केले आहे.
सन 2017 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे फेब्रुवारी 2017 मध्ये कलमापन चाचणी घेण्यात आली आहे. मंगळवार 25 एप्रिल 2017 पासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा कल अहवाल संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कल अहवाल स्वयंस्पष्ट असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल. परंतू ज्या विद्यार्थ्यांना कल अहवालाद्वारे अधिकचे मार्गदर्शन हवे असल्यास त्यांच्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समुपदेशक म्हणून बी. एम. कच्छवे मो. 9371261500, बी. एम. कारखेडे- 9860912898, पी. जी. सोळंके- 9860286857, बी. एच. पाटील-9767722071, एस. एल. बिंगेवार- 9860869919, टी. एम. मुंगरे- 8421293272 हे मार्गदर्शन करतील.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...