Friday, July 12, 2024
वृत्त क्र. 589
“मुख्यमंत्री वयोश्री योजना”
लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 12 जुलै :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वेयोणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे उदा : चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी. खरेदी करण्याकरीता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" शासन निर्णयान्वये सुरु केली आहे. पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 10 ते 25 जुलै 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे आवश्यक
दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्ड. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो. उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे.)
स्वयं-घोषणापत्र - CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल. असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वर नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करणे.
वरिल कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी 25 जुलै 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर , नांदेडयेथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच या पूर्वी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करणे करीत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.
00000
वृत्त क्र. 588
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यात 48 हजारावर अर्ज दाखल
गोंधळून जाऊ नये ; प्रत्येकाच्या अर्जाला दाखल केले जाईल
आधार कार्ड नुसारच माहिती भरली जावी
नवविवाहितेनी लग्नाचे प्रमाणपत्र रेशन कार्ड सोबत जोडावे
आता फोटो ऑनलाईनच भरायची गरज नाही
नांदेड दि. 12 जुलै : महिला सबलीकरणाच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 47 हजार 827 महिला भगिनींनी आपले अर्ज दाखल केले आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व पात्र महिला भगिनींना हा अर्ज भरण्याची संधी मिळणार असून गोंधळ व गडबड करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
राज्य शासनाने प्रत्येक पात्र महिलेला सुलभतेने हा अर्ज भरता यावा यासाठी या योजनेमध्ये आणखी काही बदल केले आहे. या संदर्भात आज राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रालयातून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांच्यासह महिला व बालकल्याण विभाग व अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणेची आढावा बैठक घेतली असून आधार कार्ड नुसार माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नारीशक्तीदूत ॲपमध्ये लाभार्थी महिलेचे नाव भरताना त्यांच्या आधार कार्डवर जे नाव लिहिले आहे तेच अर्जात लिहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आधार कार्डनुसार अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि अन्य माहिती तंतोतंत भरावी, अशी सूचना ही सर्व यंत्रणेला देण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी यंत्रणेकडून अधिकचे कागदपत्र किंवा पैशाची मागणी करण्यात आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ऑफलाईन अर्ज व फोटो ग्राह्य
गाव पातळीवर 'नारीशक्तीदूत 'द्वारे ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र आता ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज देता येणार आहे. याशिवाय सुरुवातीला ऑनलाइन फोटो अपलोड करणे आवश्यक होते, आता तशी आवश्यकता नाही. अर्जासोबत जोडलेले फोटो ऑनलाईन अर्जासाठी ग्राह्य धरण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे.
नवविवाहितेचे मॅरेज सर्टिफिकेट
ग्रामीण भागात नवविवाहितेचे लगेच रेशन कार्ड वर नाव येणे शक्य नाही.त्यामुळे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्ड वर नसेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, असेही नव्या आदेशात म्हटले आहे. याची देखील जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000
वृत्त क्र. 587
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु
31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन
नांदेड, दि. 12 जुलै :- राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विषेस सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर विभागातील 4 जिल्ह्यातील 60 शासकिय वसतीगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या वसतीगृहात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लातूर विभागतील लातूर 25, नांदेड 16, धाराशिव 11, व हिंगोली ०८ अशी एकूण ६० वसतीगृह कार्यरत आहेत. सामाजिक विभागाच्या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासह इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या क्षमतेनुसार प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, मोफत जेवण व नाष्टा, शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य , स्पर्धा परीक्षांचे पुस्तके मोफत पुरविली जातात. या वसतीगृहासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षा करीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी लातूर विभागातील समाज कल्याण विभागाच्या, लातूर, नांदेड, हिंगोली व धाराशिव या कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांशी तसेच संबंधित वसतीगृहाच्या गृहप्रमुख व गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. असे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
0000
वृत्त क्र. 586
मुख्यमंत्री वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठांना मिळणार आधार
जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड, दि. 12 जुलै :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगणसाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठीआवश्यक सहाय्य साधने व उपकरणे(चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हिलचेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खूर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट,सर्वाइकल कॉलर इ.) खरेदी करण्यासाठी, तसेच मन:स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणसाठी एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये इतकी रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभ वितरण केले जाणार आहे. तरी विभागातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे छायाचित्र, ओळखीचा पुरावा (मतदार ओळखपत्र किंवा पारपत्र किंवा वाहन चालक परवाना), पत्त्याचा पुरावा (शिधापत्रिका किंवा सातबारा आणि ८ अ चा उतारा किंवा वीज देयकाची छायांकित प्रत), वयाचा पुरावा (जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा इतर पुरावा), आधार कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुक किंवा कॅन्सल चेकची छायांकित प्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र अथवा स्वयंघोषणापत्र, शासनाच्या इतर योजनेमधून लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, इतर स्वंयघोषनापत्र , ओळख पटविण्यासाठी अन्य कागदपत्रे पॅनकार्ड अथवा इतर पेन्शन योजनेचे ओळखपत्र सादर करावे.
लातूर विभागात ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त, यांनी सर्व सहाय्यक आयुक्त यांच्या बैठका घेऊन ग्रामीण व शहरी भागात ही योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यलयाशी संपर्क साधावा, तसेच ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 585
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
नांदेड, दि. 12:- 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.
लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवनमानाचा स्तर खालावत जावून त्याचा सामान्य नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वागिण विकासावर होणारा वितरीत परिणाम यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येकाकडून जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमूख यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश गट्टाणी यांनी केले. यावेळी त्यांनी लोकसंख्या वाढीची कारणे यावर भर दिला जसे कमी वयात लग्न लावणे, निरक्षरता, लिंगभेद, कुटुंब नियोजनाचा अभाव इत्यादी कारणामुळे आज लोकसंख्या वाढीचा आलेख हा उर्ध्वगामी दिसून येतो असे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीवर शासन स्तरावरुन तसेच नागरिकांनी व्यक्तीगत स्तरावरुन नियंत्रण आणण्यासाठी उपलब्ध शासनाच्या योजना आणि कार्यरत यंत्रणा यांच्या सहाय्याने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संतोष जोगदंड तर आभार डॉ. सुष्मिता वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्य डॉ. सुष्मिता वाघमारे, डॉ. ज्योती भिसे, समाज सेवा अधीक्षक गजानन वानखेडे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका ममता उईके, निवासी डॉक्टर्स, आंतरवासिता विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.
00000
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा
-विभागीय आयुक्त दिलीप गावडे
छत्रपती संभाजीनगर, दि. 12 : राज्य शासनाने 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजना संपूर्ण राज्यात सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यांसाठी महिलांना सहकार्य करावे तसचे विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ बाबत विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त देविदास टेकाळे, महिला व बाल विकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश पुंगळे उपस्थित होते.
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास
याबाबतची तक्रार आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी. योजनेचे संनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे विभागीय आयुक्त श्री गावडे म्हणाले. त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. असेही त्यांनी सांगितले.
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. महिलांना नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना श्री. गावडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
******
वृत्त क्र. 584
समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 जुलै रोजी महिला लोकशाही दिन
वृत्त क्र. 583
दहावी, बारावी पुरवणी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
वृत्त क्र. 582
वृत्त क्र. 581
'सिईओ' ताई 'लाडक्या बहिणीं 'च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात
नांदेड दि. 12 जुलै : एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यासंदर्भात दररोज महिला व बालविकास विभाग व अन्य सर्व संबंधित विभागासोबत सकाळी साडेदहाला बैठक होते. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचा जिल्हाभर प्रवास सुरू होतो. कधी थेट शिवारात तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, प्रत्यक्ष कॅम्पला भेटी देऊन, प्रत्यक्ष लाभार्थ्यांची चर्चा करून, सिईओ मॅडम ही योजना सामान्य लाभार्थ्यांना समजावून सांगत आहे. त्यानंतर रोज सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आढावा बैठक घेतली जात आहे.
दर महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला 18 हजार रुपये देणारी ही योजना राज्य शासनाने नुकतीच सुरू केली आहे. या योजनेचा ग्रामीण व शहरी भागावर मोठा प्रभाव दिसून येत आहे. महिला मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमविण्याच्या मागे लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा ही त्यांना यासाठी साथ देत आहेत. मात्र काही ठिकाणी काही अडचणी तयार होतात. काही ठिकाणी अशिक्षित महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अडवणूक केली जात आहे. मात्र या सगळ्या बाबी रोज जनतेमध्ये जाऊन त्या त्या फीडबॅकचा दुसऱ्या दिवशी बैठकीत चर्चेला आणून ही योजना अधिक सुलभ अधिक सुकर व्हावी यासाठी ही धडपड लक्षवेधी आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. कासारखेडा ता. नांदेड येथील ग्रामपंचायतीस भेट दिली, अडचणी जाणून घेतल्या. एवढेच नव्हे तर कर्मचारी आणि महिलांना फॉर्म भरण्यास मदत ही केली.
परवा 10 जुलै देगलूर तालुक्यात त्यांनी तालुका दौऱ्यादरम्यान खुशावाडी येथील शेताच्या बांधावर जाऊन तेथील शेतकरी महिलांशी चर्चा केली. शेतात काम करणाऱ्या महिलांनी शेतीवाडीच्या ऐन पेरणीच्या लगबगीमध्ये या योजनेकडे दुर्लक्ष करू नये म्हणून त्यांनी माहिती जाणून घेतली. प्रत्येक कामकरी महिलेला याचा लाभ भेटला पाहिजे अशा सूचना त्यांनी नंतर जिल्हा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेला केल्या आहेत.
आज 12 जुलैला येरगी देगलूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात शिबिर लावण्यात आले होते. 100 महिलांसमवेत त्यांनी यावेळी संपर्क साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय मांजरम नायगाव येथील सुरू असलेल्या शिबिराला भेट दिली. जास्तीत जास्त लाभार्थींचे फॉर्म भरण्यात यावे, याकरिता ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना आवाहन केले. सनदी अधिकाऱ्याने एखाद्या योजनेच्या लाभ मिळावा, यासाठी नेमका कोणता जनसंपर्क केला पाहिजे याचा वस्तूपाठ यानिमित्ताने निर्माण होत आहे.
0000
वृत्त क्र. 580
संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या एनएसएफडीसी च्या
योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
नांदेड दि. 12 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी यांच्या योजनांचे भौतीक उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात 1 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील.
विशेष घटक योजना 20 , बीज भांडवल 16, मुदती कर्ज योजना 5 लाख- 2 महिला अधिकारीता योजना 5 लाख- 2, महिला समृध्दी योजना 1.40- 10 लघुऋण वित्त योजना 1.40, शैक्षणिक कर्ज योजना 10, मुदती कर्ज योजना 2 लाख- 40 महिला समृध्दी योजना 50 हजार- 20 लघुऋण वित्त योजना 50 हजार- 18 असे एकूण 122 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या सर्व योजना एन.एस.एफ.डी.सी नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात. चांभार समाजा अंतर्गत असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा चालू वर्षाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे/ मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक जीएसटीचे कोटेशन, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचा सिबील क्रेडिट स्कोअर 500 च्यावर असावा रिपोर्ट, अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समा
00000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...