Monday, August 16, 2021

 

जिल्ह्यातील 84 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 84 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. मंगळवार 17 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर रेल्वे हॉस्पिटल येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस तर स्त्री रुग्णालय येथे 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, हदगाव व ग्रामीण रुग्णालय उमरी या 3 केंद्रावर प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, हिमायतनगर, कंधार, धर्माबाद, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 44 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 8 प्राथमिक आरोग्य केद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 50 डोस देण्यात आले आहेत.

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2021 पर्यंम एकुण 8 लाख 97 हजार 441 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 16 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 7 लाख 50 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 44 हजार डोस याप्रमाणे एकुण 9 लाख 94 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

स्वच्छता, चांगले अन्न आणि प्रत्येकांचा सन्मान

ही शासकिय रुग्णालयाची त्रीसूत्री ठरावी

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         वैद्यकिय महाविद्यालयात 150 खाटांच्या बाल व नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

·         मलशुद्धीकरण प्रकल्पाचाही शुभारंभ   

नांदेड (जिमाका) दि. 16 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीपासून प्रत्येक टप्प्याचा मी साक्षीदार राहिलो आहे. आपल्या भागातील गोर-गरीबांना चांगल्या वैद्यकिय सुविधा इथेच उपलब्ध व्हाव्यात ही दूरदृष्टी स्व. शंकरराव चव्हाण यांनी ठेवली होती. त्यातूनच विष्णुपुरी येथील 112 एकर जागेवर हे महाविद्यालय आणि रुग्णालय साकारले. राज्यातील एक आदर्श वैद्यकिय सेवा-सुविधेचे केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. कोविड-19 सारख्या महामारीच्या काळात नांदेड जिल्ह्यातील वैद्यकिय सेवा-सुविधांची पायभूत सुविधा उपलब्धता असल्याने आपण हजारो लोकांचे प्राण वाचवू शकलो, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

विष्णुपुरी येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात मलशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) व बाल अतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग (कोविड-19) च्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी कार्तिकेएन, बालविभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शासकिय रुग्णालयातील सेवा-सुविधा अतिशय चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात हा माझा सुरुवातीपासूनचा ध्यास राहिला आहे. या महाविद्यालय व रुग्णालयाशी माझे भावनिक नाते आहे. शासकिय रुग्णालय म्हणजे गोर-गरीबांसाठी मोठा आसरा आहे. याचबरोबर इथे असलेल्या वैद्यकिय सेवा-सुविधा या खाजगी रुग्णालयाच्या तोडीस तोड देणाऱ्या असून यात कुठलीही कमतरता आपण पडू देणार नाही. आज लोकार्पण करण्यात आलेले बाल अतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग हा कोकीळाबेनमध्ये गेल्यासारखा आनंद झाला या शब्दात त्यांनी कामाचे कौतूक केले. तथापि शासकिय रुग्णालयाच्या यशस्वीतेसाठी स्वच्छता, चांगले अन्न आणि रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान ही त्रीसूत्री कटाक्षाने पाळली पाहिजे याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोविड-19 च्या काळात शासकिय रुग्णालयांची महत्वपूर्ण उपलब्धता नागरिकांच्या आरोग्यासाठी आपल्याला करुन देता आली. यासाठी आपण युद्धपातळीवर नांदेड जिल्ह्यात आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करण्यावर भर दिला. जिल्हा रुग्णालयात मागील 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या बाह्य रुग्ण इमारतीचे काम तातडीने पूर्ण करुन त्याठिकाणी आदर्श असे शंभर खाटाचे सर्व सेवा-सुविधेसह कोविड-19 रुग्णालय सुरु केले. सिव्हील हॉस्पिटलची जुनी इमारत कालबाह्य झाल्याने त्या ठिकाणी आता आपण 300 बेडचे नवीन हॉस्पिटल बांधत आहोत. सुमारे 250 कोटी रुपयांचा निधी यासाठी आपण उपलब्ध करुन देत आहोत. शासकिय वैद्यकिय महाविद्यालया कॉर्डीओलॉजी विभागासाठी 12 कोटी रुपयांचा निधी, कॉन्सर व रेडिओलॉजी विभागासाठी 15 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करुन दिला असून हे विभाग लवकरच सुरु करणार आहोत. याचबरोबर नर्सींग कॉलेजला मान्यता घेतली असून त्यासाठी लागणारा मनुष्यबळही मंजूर करुन घेतले आहे. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीत फर्निचरसाठी 17 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून हे कामही लवकर मार्गी लावल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.  

आज लोकार्पण करण्यात आलेल्या बालअतिदक्षता व नवजात शिशू अतिदक्षता विभाग (कोविड-19) सुविधेत 150 बेड्सचे तीन वार्ड आहेत. यात ऑक्सिजन सुविधा असलेले 50-50 बेड्सचे दोन वार्ड आहेत. पन्नास बेड्स असलेला एक आयसीयू वार्ड आहे. यात 10 बेड हे नवजात शिशूसाठी आहेत. आयसीयूमध्ये 30 व्हेंटिलेटरर्स, 50 मल्टीपॅरा मॉनिटर्स व सिरींज पंम्पची सुविधा असल्याची माहिती बालरोग विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. जमदाडे यांनी केले. यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांचे समयोचित भाषण झाले.

0000000  




 

नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे     

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 68 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 670 एवढी झाली असून यातील 87 हजार 959 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 52 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 2, लोहा 1 असे एकुण 4 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात किनवट कोविड रुग्णालय 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 52 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 33, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 125, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 89 हजार 914

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 87 हजार 93

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 670

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 959

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.1 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-8

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-52

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

 शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा सुधारित दौरा 

नांदेड दि. 16 (जिमाका) :- राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

मंगळवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 वा. भोकर तालुक्यातील राहाटी येथून भोकर मार्गे मोटारीने श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.45 वा. श्री. गुरुगोबिंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सकाळी 10.45 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...