प्रभावी संपर्क आणि तत्परता यातच आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
· मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे दक्षतेचे निर्देश
नांदेड (जिमाका) दि. 15 :- येणारा मान्सून हा काही प्रमाणात दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात जरी दर्शविला असला तरी संभाव्य आपातकालिन परिस्थिती केंव्हाही उद्भवू शकेल हे गृहीत धरुन सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, ए. बी. बिराजदार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विद्युत, अग्निशमन, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या नद्या व या नद्याच्या उपनद्या यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील पूरप्रवण गावाची संख्याही मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 337 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावातील शासकीय यंत्रणानी विशेषत: गाव पातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना परस्परात समन्वय ठेवून कोणत्याही स्थितीत एकत्रित दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.
गोदावरी नदीवर पूर नियंत्रणासाठी असलेली महत्वाची ठिकाणे व त्या-त्या ठिकाणावरुन अतिवृष्टी झाल्यास पूर वहणाचा सर्वसाधारण कालावधी हा संबधीत अधिकाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियत्रंण कक्ष कार्यान्वित करुन त्यावर जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या बैठका घेवून यात गावातील लोकांनाही विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारी औषधे, पाण्यातून होणारे आजार लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडर, स्वच्छतेच्यादृष्टीने नगर/महानगर पालिका क्षेत्रातील नाले सफाई, वीज वितरणात अडथळा होणार नाही यादृष्टीने आपतकालिन व्यवस्थापन या बाबीवर त्यांनी भर देवून सर्व यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांनी प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन बाबत सविस्तर सादरीकरण केले.
0000