Friday, December 6, 2019


कारागृहात आरोग्य तपासणी संपन्न
नांदेड दि. 6 :- श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथील राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृह वर्ग-2, नांदेड येथील एकूण 75 कैद्यांचे उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच मानसिक आरोग्य यांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले.
यासाठी जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता राठोड, मानसोपचार तज्ञ डॉ. प्रणद जोशी, चिकित्सालयीन मानसशास्त्र डॉ. कैलास चव्हाण, प्रयोगशाळा अधिकारी संतोष बेटकर, अधिपरिचारिका सारिका तथोडे, रुपाली मस्के, यांनी उपस्थित राहून कैद्यांची तपासणी केली.
सदरील आरोग्य तपासणी शिबिरास कारागृह अधीक्षक चांदणे यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, यांनी परिश्रम घेतले.
000000


राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान
योजनेसाठी अर्ज करण्यास 20 डिसेंबर मुदत
         नांदेड दि. 6 :- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान योजनेसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी नमूद कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव विहित मार्गाने मुदतीत आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास शुक्रवार 20 डिसेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन सुभाष राठोड प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता  यांच्या असमान निधी योजनेतर्गंत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. त्या संदर्भांतील नियम, अटी अर्जाचा नमुना राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील इच्छूक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना सदर संकेतस्थळावर उपलब्ध करुन घ्यावा.
सन 2019-20 साठीच्या असमान निधी योजना (Non Matching scemes) पुढील प्रमाणे आहे. ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. "राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा" विकसीत करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग जागरुकता कार्यक्रम आयोजनांसाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालय राजा राममोहन रॉय ग्रंथालय कोपरा स्थापन करण्याकरीता अर्थसहाय्य.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in  हे संकेतस्थ्ळ पहावे. आवश्कता असल्यास संबंधीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क  साधावा.
000000


राष्ट्रीय लोकअदालतीचे
14 डिसेंबरला आयोजन
नांदेड दि. 6 :- राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेडच्यावतीने शनिवार 14 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 
याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करुन सर्व संबंधित पक्षकारांनी शनिवार 14 डिसेंबर 2019 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिपक अ. धोळकिया   जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.
000000


शस्त्र परवाना नुतनीकरणाचे आवाहन
नांदेड दि. 6 :- नांदेड जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारकांना सुचित करण्‍यात येते की, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड यांचे मार्फत निर्गमीत/अभिलेखात नोंद असलेले शस्‍त्र परवाने, ज्‍याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2019 रोजी संपुष्‍टात येत आहे. अशा शस्‍त्र परवानाधारकांनी त्‍यांचा शस्‍त्र परवाना पुढील कालावधीसाठी नुतनीकरण करुन घ्‍यावा.
परवानाधारकाने 6 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत आपला शस्‍त्र परवाना नुतनीकरण करुन घेण्‍यासाठी नुतनीकरण शुल्‍क (चलनाने) शासन जमा करावे. आपले शस्‍त्र परवान्‍यातील असलेले अग्निशस्‍त्राची पडताळणी या कार्यालयात करुन, विहित नमुन्‍यातील अर्ज, जन्‍म तारखेचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो व मुळ शस्‍त्र परवाना सेतू समिती, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी कार्यालय, नांदेड येथे दाखल करावा. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


बंद पडलेल्या पीएलआय,
आरपीएलआय पॉलिसींचे पुनरुज्जीवन
 नांदेड दि. 6 :- बंद पडलेल्या पीएलआय, आरपीएलआय पॉलिसी प्रीमियमच्या तारखेपासून 5 वर्षाची मर्यादा ओलांडलेल्या पॉलिसींना 31 डिसेंबर 2019 पर्यंत पुनरुज्जीवनासाठी एक विशेष योजना राबविली जात आहे, असे आवाहन अधीक्षक डाकघर नांदेड विभाग नांदेड यांनी केले आहे.
या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करतांना विमाधारकाचे आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे  आवश्यक आहे. अशा पॉलिसीचे पॉलिसीधारक ज्यांना विमा लाभ मिळविण्यासाठी पॉसिली पुनरुज्जीवित करण्याचा विचार आहे त्यांनी जवळच्या कोणत्याही पोष्ट कार्यालयामध्ये लेखी अर्ज करावा. मंगळवार 31 डिसेंबर 2019 नंतर अशा प्रकारच्या पॉलिसींचे पुनरुज्जीवन केले जाणार नाही.
पोष्ट कार्यालय लाईफ विमा नियम 2011 च्या अटी व शर्तीमध्ये केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने अधिसूचना 19 सप्टेंबर 2019 नुसार टपाल जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण टपाल जीवन विमा (आरपीएलआय) धारकांना आवाहन करण्यात आले आहे की,  ज्या पॉलिसीधारकांच्या पॉलिसी बंद, खंडीत झालेल्या असतील तसेच सतत 5 वर्षे भरणा न केल्याने बंद पडल्या असतील त्याचे पुनरुज्जीवन 1 जानेवारी 2020 नंतर करता येणार नाही, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000


डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना;
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतर्गत
नवी विहीर, इतर बाबीचा लाभ देण्यासाठी लाभार्थी निवड सभा संपन्न
 नांदेड दि. 6 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचीत्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनाबिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतर्गत नवी विहीर, इतर बाबीचा लाभ देण्यासाठी लाभार्थी निवड सभा आज जिल्हा परिषदेत संपन्न झाली.  
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. शरद कुलकर्णी, उपाध्यक्ष समाधान जाधव, सभापती (कृषि पशुसंवर्धन) दत्तात्रय रेड्डी, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, विजयकुमार बास्टेवाड, मधुकरराव राठोड, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समितीचे सर्व सदस्य प्रभारी जिल्हा कृषि अधिकारी संभाजी कऱ्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नविन विहीर इतर बाबींचा लाभ देणेसाठी लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात लॉटरी पध्दतीने इन कॅमेरा करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत 1 हजार 658 लाभार्थ्यांची, राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत नवीनच सुरु झालेल्या राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत 48 लाभार्थ्यांची अनुसूचित जमातीचे लाभार्थीसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) अंतर्गत 259 लाभार्थ्यांची, क्षेत्रांतर्गत योजनेसाठी 64 लाभार्थ्यांची राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत किनवट माहूर तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या 57 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षा, उपाध्यक्ष सभापती (कृषि) यांनी बैठकीच्या वेळी सुचना दिल्याप्रमाणे शासनाच्या उद्दिष्टापेक्षा दीडपट लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यामुळे पात्र प्रस्तावापैकी एकही लाभार्थी निवडीपासून वंचित राहिलेला नाही.
या सभेस योजनेच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थी शेतकरी, पंचायत समिती स्तरावरील सर्व कृषि अधिकारी (विघयो) विस्तार अधिकारी (कृषि) उपस्थितीत होते. शेवटी उपस्थितांचे आभार अनिल शिरफुले जिल्हा कृषि अधिकारी (सा.) यांनी मानले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...